हेचि मागणे देवा…

0
30

वाचकपत्रे
हे परमेश्‍वरा, काही काळ माझ्या देशावर संकटामागून संकटं येऊ देत! निदान त्यामुळे तरी सारे भारतीय गुण्यागोविंदाने नांदतील! आज कुणाला गोमांसभक्षण करायचे आहे, कुणाला कर्जमाफी हवी आहे, कुणाला वेतन आयोग हवा आहे, कुणाला आरक्षण हवे आहे! कुणाला आपल्या पोराबाळांना राजकारणात काहीही करून स्थिरस्थावर करायचे आहे. कुणाला जातीसाठी माती खायची आहे, कुणाला अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली गटारात लोळायचे आहे. कुणाला काश्मीर स्वतंत्र हवा आहे, कुणाला कर्नाटकासाठी स्वतंत्र ध्वज हवा आहे! कुणाला सारा भारत आपल्या धार्मिक रंगाने रंगवून टाकायचा आहे. कुणाला शत्रुराष्ट्राच्या मेजवान्या झोडायच्या आहेत, भले मग त्यासाठी भाऊबंदांचे, मातृभूचे लचके तोडावे लागले तरी बेहत्तर! भारतभूरूपी ज्या विशाल वटवृक्षाच्या शीतल छायेत बसले आहेत त्या वटवृक्षाच्या बुंध्यावरच घाव घालत आहेत. म्हणून म्हणतो, हे परमेश्‍वरा, जरा यांच्या कानाखाली जाळ कर, ज्याची झळ प्रत्येकाला जाणवू दे! आपण एकेकटे राहिलो तर संपून जाऊ आणि एकवटलो तरच जगू, याची पुन्हा एकदा कान उघाडणी कर. माता द्रौपदीने द्वारकाधीशाकडे जे मागणे मागितले होते, तेच मी तुझ्याकडे मागत आहे.
सोमनाथ देविदास देशमाने
९४२१६३६२९१

त्या बोगस कंपन्यांची
कसून चौकशी व्हावी!
देशात काहीही व्यवसाय अथवा उद्योग न करणार्‍या एक लाख ६२ हजार बोगस कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती परवा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. प्रश्‍न असा आहे की, मग या कंपन्या स्थापन करण्याची गरज काय होती? त्याचे कारण म्हणजे, राजकारणी, उद्योगपती, मीडिया चॅनेल्स यांचा काळा पैसा या कंपनीत गुंतवल्याचे दाखवून काळा पैसा पांढरा करणे. अशा सर्व बोगस कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
प्रशांत नितनवरे
नागपूर

रेल्वेमंत्र्यांची आतातरी
झोप उघडणार का?
रेल्वेच्या संदर्भात दोन बातम्या तभात वाचल्या. एक होती बुलेट ट्रेनची व दुसरी होती, रेल्वेच्या पॅण्ट्री कारमधून मिळणारे निकृष्ट आणि आरोग्याला हानिकारक जेवण व अन्नपदार्थ. रेल्वेमध्ये मिळणार्‍या खानपान व्यवस्थेबाबत देशाच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांनीच आपल्या अहवालात ही माहिती दिल्यामुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसापांसून अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे व अधिक दर घेऊन देण्यात येणारे जेवण, अन्य निकृष्ट दर्जाच्या पाण्याच्या बाटल्या, प्रवाशांच्या बॅगांच्या चोर्‍या याबाबत असंख्य तक्रारी आल्या. पण, रेल्वेने त्याकडे लक्ष दिले नाही. याला कारण, लालूंच्या रेल्वेमंत्रिकाळात नेमलेले अकार्यक्षम अधिकारी! आतातरी सुरेश प्रभू यांचे डोळे उघडले असतील. तेव्हा त्यांनी आधी वर नमूद समस्यांचे आधी निराकरण करावे व नंतरच बुलेट ट्रेनच्या गप्पा माराव्यात.
विनोद देशपांडे
अमरावती

संघसंस्कारातील त्रिमूर्ती!
आदी, अंत्य, मध्य नाही आणि निर्गुणातून सगुणरूपी देशसेवा करणारी जी देशाच्या पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर भागातून त्रिमूर्ती भारतीय जनतेने मान्य केली त्या मोदी, कोविंद आणि नायडू यांचे मनःपूर्वक अभिनंदन! जे संघाच्या संस्कारातून आणि मुशीतून तालूनसलाखून निघाले ते तिन्ही मान्यवर हे अनुभवी आहेत. आत्ताचा विजय ही २०१९ च्या निवडणुकींच्या समीकरणांची नांदी आहे, हे निश्‍चित! १२५ वर्षे वयाच्या कॉंग्रेसने जर उपराष्ट्रपतिपदासाठी सर्वसमावेशक उमेदवार निवडून पंतप्रधानांजवळ विनंती केली असती, तर कॉंग्रेसचेही उपराष्ट्रपती झाले असते. परंतु, संघाचे संस्कार त्यांच्या पचनी पडणे अवघड झाले असते, हे नक्की! ही राम, कृष्ण आणि इंद्रांची त्रिमूर्ती गरिबांचे रक्षण मनोभावे करतील, असे वाटते.
अमोल करकरे
पनवेल

केंद्र सरकारचे उत्तम पाऊल!
राजदनेते, चारा घोटाळ्यात शिक्षा झालेले लालूप्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांना आतापर्यंत विमानतळावर मिळणार्‍या अतिविशिष्ट व्यक्तींच्या यादीतून वगळण्याचा स्तुत्य निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय आधीच व्हायला हवा होता. ज्याला शिक्षा झाली आहे, त्याला सुविधा कशासाठी? आपल्या देशात अनेक राज्यांनी अशा लोकांना सुविधा प्रदान केल्या आहेत, त्या केवळ आपल्या राजकीय सुविधांसाठी. केंद्र सरकारने आणि राज्यांनीही आणखी अशाच गुन्हेगारांचा तपास करून त्यांच्याही सुविधा काढून घ्यायला हव्या.
अशोक मेश्राम
नागपूर