सर्वसामान्यांचा नेता

0
45

वेध
अमित शाह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, पंतप्रधान व राष्ट्रीय अध्यक्ष दोघेही एकाच राज्यातले झाले होते. आता भाजपाचे काय होणार, याची चिंता खुद्द भाजपासमर्थकांनाच लागली होती. त्यातच, अमित शाह राष्ट्रीय राजकारणात नव्हते. गुजरातचे काही काळ राज्यमंत्री होते, बस्स. अशी व्यक्ती भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसणे, अनेकांना मानवत नव्हते. पण, ज्या पद्धतीने त्यांनी सत्तारूढ पक्षाची सूत्रे सांभाळलीत, त्याने सर्व जण आश्‍चर्यचकित झाले आहेत. मणिपूरसारख्या भाजपासाठी खडकाळ असलेल्या छोट्याशा राज्यातील विधानसभा निवडणुकीत हा माणूस घरोघर हिंडत होता. आज मणिपुरात भाजपा आघाडीचे सरकार आहे. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भाजपाने पक्षविस्ताराचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी देशभरात २० हजार पूर्णवेळ कार्यकर्ते तयार करण्यात आले असून, ते, त्यांना आवंटित क्षेत्रात कामाला लागलेही आहेत. प्रत्येकच पक्ष असे कार्यक्रम आखत आणि राबवीत असतो. पण, अमित शाहंचे इथेही वेगळेपण आहे. राष्ट्रीय अध्यक्ष असूनही तेदेखील घरोघरी जाऊन भाजपाचा प्रचार करीत आहेत. जिथे भाजपा अत्यंत कमकुवत स्थितीत आहे, नेमकी तीच स्थाने त्यांनी निवडलीत. तिथे जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष तीन-तीन दिवस मुक्काम ठोकतात आणि घरोघरी जाऊन भाजपाचा प्रचार करत आहेत. हे नवलच नाही काय! स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष इतकी मेहनत घेत असेल, तर त्या पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता किती उत्साहाने पक्षकार्यात रुची घेत असेल, याची कल्पना आपण करू शकतो. अशा या लोकविलक्षण राष्ट्रीय अध्यक्षाचे एक नवे रूप एवढ्यात उघड झाले आहे. अमित शाह प्रवासासाठी चार्टर्ड विमानाचा वापर करीत नाही. अगदी लेह-लडाखला गेले तेव्हाही नाही. ते नियमित विमानसेवेनेच भारतभर प्रवास करतात. फक्त निवडणुकीच्या प्रचार-काळात, वेळेची सांगड घालण्यासाठी खाजगी विमानाचा वापर करतात. एवढेच नाही, तर ज्या ठिकाणी जातील, तिथे मुक्काम हॉटेलमध्ये न करता कुणा कार्यकर्त्याच्या घरीच करतात. यामुळे तिथली वास्तव परिस्थिती लक्षात येते, असे त्यांचे म्हणणे आहे. केवळ तीन वर्षांच्या काळात, अमित शाह यांनी ही जी स्थिती प्राप्त केली आहे, त्यावरून ज्यांनी कुणी त्यांची निवड केली असेल, त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते. भाजपात केवळ गुणवत्तेलाच स्थान आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

अतिमहत्त्वाकांक्षा
कॉंग्रेस पक्ष सोडल्यामुळे गुजरातचे कॉंग्रेस नेते शंकरसिंह वाघेला सध्या चर्चेत आहेत. गुजरातमध्ये जनसंघापासून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. १९९५ साली गुजरातमध्ये भाजपाला बहुमत मिळाले. वाघेलांना मुख्यमंत्री व्हायचे होते; परंतु केशुभाई पटेल मुख्यमंत्री झाले. यामागे गुजरात भाजपाचे संघटनमंत्री नरेंद्र मोदी होते, असा वाघेलांचा आरोप होता. वाघेला स्वस्थ बसणार्‍यांपैकी नव्हते. काही महिन्यांतच त्यांनी आपल्या समर्थक ४७ आमदारांसह बंडखोरी केली आणि भाजपा नेतृत्वाला वाकायला लावले. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे होते; परंतु मधला मार्ग म्हणून केशुभाईंना हटवून, वाघेलांचे समर्थक सुरेश मेहता यांना मुख्यमंत्री करण्यात आले आणि नरेंद्र मोदींना गुजरातबाहेर हिमाचल, हरयाणा, पंजाब आदी राज्यांची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली. मे १९९६ मध्ये वाघेलांनी भाजपाचा त्याग केला आणि राष्ट्रीय जनता पार्टी हा नवा पक्ष स्थापन केला. एवढेच नव्हे, तर कॉंग्रेसच्या पाठिंब्याने स्वत: मुख्यमंत्री झाले. एक वर्षानंतर ऑक्टोबर १९९७ मध्ये कॉंग्रेसने वाघेला यांचा पाठिंबा काढण्याचे संकेत दिले, तेव्हा वाघेला यांनी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होत दिलीप पारेख यांना मुख्यमंत्री केले. पारेख यांनी चार महिन्यांनंतर विधानसभेच्या नव्याने निवडणुका घेण्याचे ठरविले. या निवडणुकीत भाजपा १८२ पैकी ११७ जागा जिंकून पुन्हा बहुमताने निवडून आली. आधी ४७ आमदार असलेल्या राष्ट्रीय जनता पार्टीचे केवळ ४ जण निवडून आले होते. त्यानंतर वाघेलांनी १९९८ साली आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. १९९९ व २००४ साली ते कॉंग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले. २००४ साली संपुआ सरकारमध्ये वस्त्रोद्योग मंत्री बनले. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून त्यांच्या राजकीय आलेखाने वरची दिशा पकडली नाही. सुमारे १५ वर्षांनंतर कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वाघेला पुन्हा एका वळणावर उभे आहेत. ते भाजपात येतील, असा सर्वांचा अंदाज आहे. ते भाजपात येतील तेव्हा नियतीने त्यांच्यावर एक प्रकारचा सूड उगवलेला असेल. ज्या नरेंद्र मोदींना त्यांनी हट्टाखातर गुजरातच्या बाहेर पाठविले, तेच नरेंद्र मोदी आता पंतप्रधान आहेत. मोदींचे मुख्यालय दिल्ली झाले आणि तिथे मोदींनी आपल्या कार्यशैलीने भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना प्रभावित केले. त्यांची गुणवत्ता बघून भाजपाने त्यांना २००१ साली गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपविलीत. त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. वाघेला यांनी मोदींना गुजरातबाहेर पाठविले नसते, तर कदाचित मोदींचा इतिहास वेगळा राहिला असता. शंकरसिंह वाघेला भाजपातच राहिले असते, तर ते भाजपाचे मुख्यमंत्रीही राहिले असते आणि आज भाजपाच्या सुवर्णकाळात त्यांना पक्षात फार मोठे व महत्त्वाचे स्थान राहिले असते. केवळ अतिमहत्त्वाकांक्षेने वाघेला यांची आज अशी गत झाली आहे. मूळ जनसंघी वाघेला यांचा हा उंच-सखल राजकीय प्रवास, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सदैव ध्यानात ठेवण्यालायक आहे.
– श्रीनिवास वैद्य
९८८१७१७८३८