मुली, मुलांप्रमाणेच वागल्या!

0
25

वाचकपत्रे
क्रिकेट हा भारतीय क्रीडारसिकांचा धर्मच आहे. आता महिला क्रिकेटलाही ग्लॅमर आले आहे. मिताली राजच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्‍वचषकात अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. मुली चांगल्या खेळल्यात. सहसा पुरुषांच्या क्रिकेटचीच जास्त चर्चा होते आणि मग ‘बॉईज प्लेड वेल’ असे म्हटले जाते. मात्र, यंदा ‘गर्ल्स प्लेड व्हेरीवेल’ असेच म्हणावे लागेल! अंतिम सामन्याकडून खूपच अपेक्षा होती; पण भारतीय क्रीडा इतिहासानुसार अंतिम सामन्यात आपले संघ पेंड खातात. इथेही नेमके तेच झाले. याचे कारण आपली क्षमता नाही, असे अजीबात नाही. क्षमता असल्यानेच आधीच्या सामन्यात आपण मैदान मारत असतो. अंतिम सामन्यात मात्र आपले अवसान गळून पडते. याही सामन्यात इंग्लंडची फलंदाजी असताना अखेरच्या १० षटकांत समोरचा संघ आक्रमक झाल्यावर आपले अवसान गळाले. त्यानंतर फलंदाजीचेही तसेच. मिताली राज बाद झाली आणि तिने जणू सामना संपलाय्, अशीच भावना करून घेतली. ती पॅव्हेलियनमध्ये चेहरा पाडून बसली होती. ती केवळ खेळाडू नव्हती, तर ती कर्णधार होती, याचे भान तिला राहिले नाही. त्यामुळे अगदी जिंकत आलो असताना तिने संघासोबत उभे राहायला हवे होते, ते केले नाही. मानसिक दबावात संघ आलेला असताना अन् अननुभवी खेळाडू असताना कर्णधार म्हणून मिताली राज अपयशी ठरली.
श्याम आरगुलवार
यवतमाळ

ढोलताशे…
आता तसेही सणासुदीचे दिवस आहेत. यंदा सगळेच सण साधारण एक महिना आधीच आले आहेत. अगदी नागपंचमीपासून सणांना अन् त्या दृष्टीने बॅण्डबाजे वाजणे सुरू होते. गणपतीच्या दिवसात तर संदलचा आवाज असतोच. त्यानंतर पितृपक्षातील गणपती, देवीचे नवरात्र, दसरा अन् मग दिवाळीपर्यंत सणांचा आनंद बॅण्डबाजाने साजरा होतच असतो. पण, आता हे नवेच फॅड आलेले आहे. ‘बॅण्ड बजाओ’ आंदोलनेच सुरू झाली आहेत. बरे, विरोधकच हे करत आहेत असे नाही, तर सत्ताधारीही करत आहेत. नागपूर महानगरपालिकेने, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात करबाकी थकली आहे त्यांच्या घरासमोर बॅण्ड वाजविला. सरकारात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीसाठी बॅण्ड वाजविला. परवा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने महिला आयोगाच्या अध्यक्षा नागपुरात आल्या असताना त्यांच्यासमोर ‘बॅण्ड बजाओ’ आंदोलन केले. म्हणजे सणांच्या आधी आंदोलनानेच बॅण्ड वाजणे सुरू झाले आहे. एखादा नवा आयटेम आला की बाजारात त्याची चलती असते. आंदोलनाचा हा इनोव्हेटिव्ह प्रकार वाटल्याने जो उठला तो बॅण्ड वाजवीत सुटला आहे. त्यामुळे आता बॅण्डवाल्यांचे सुगीचे दिवस येत असताना, कार्यकर्तेच बॅण्ड वाजवू लागल्याने बॅण्डवाल्यांनी काय करावे, हा प्रश्‍न आहे. आमच्या पोटावर पाय देऊ नका, यासाठी आता व्यावसायिक बॅण्ड पथकवाल्यांनी विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर ‘बॅण्ड बजाओ’ आंदोलन करायला हवे!
अनिकेत श्रीखंडी
नागपूर

भरोसा नाही काय?
तसे हे गाणे जुने आहे, पण ते नव्याने ज्वानीत आलेले आहे. जो उठला तो एकमेकांना, ‘‘सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाही काय?’’ असे विचारू लागला आहे. सोनूने नेमका कुणाकुणावर भरवसा करावा, हा सवाल आहे. इकडे विरोधकांतही फूट पडलेली आहे. ऐन पावसाळी अधिवेशनात सरकारला अनेक विषयांवर धारेवर धरण्यासारखी परिस्थिती असताना, विरोधकांचा एकमेकांवर भरवसा राहिलेला नाही. त्यांचा सरकारवर तर भरवसा नाहीच अन् एकमेकांवरही नाही! बरे, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपावर भरवसा नाही अन् शिवसेना सत्तेत कायम राहील, यावरही भाजपावाल्यांचा भरवसा नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री म्हणतात की, अनेक अदृश्य हात आमचे सरकार सांभाळून घ्यायला तयार आहेत. त्यामुळे भाजपावाल्यांचा आणखी कुणावरतरी भरवसा आहे, असे म्हणावे अन् समाधान मानावे की, चला कुणी तर आहे की जो भरोसेमंद आहे! पण, तसेही नाही. कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणतात की, अदृश्य हात आमच्याकडेही आहेत. म्हणजे जो कोण अदृश्य हातवाला आहे त्याचाही काही भरवसा देता येत नाही.
विश्‍वास जनबंधू
चिखलदरा, जि. अमरावती

पाऊस देशात अन् विदर्भात कोरड!
देशात पावसाचा कहर असल्याच्या बातम्या येत आहेत. उत्तरप्रदेश, बिहार आणि पूर्वांचलातील राज्यांमध्ये दणक्यात पाऊस आहे. तिकडे दिल्ली, पंजाब, हरयाणातही पाऊस असल्याच्याच नव्हे, तर पुरामुळे जनजीवन विसकळीत झाल्याच्या बातम्या येत आहेत. इकडे महाराष्ट्राच्या काही भागात बरा पाऊस आहे. पुण्या-मुंबईत तर पावसाचा जोरच आहे. मुंबईचे रस्ते त्यामुळे खराब झालेले आहेत. त्याचा सारा दोष शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पावसालाच दिला आहे. ‘‘मुंबईत खूप पाऊस येतो त्याला आम्ही काय करणार?’’ असे ते मुंबई मनपाच्या बचावात म्हणाले. इकडे विदर्भात मात्र पाऊसच नाही. हवामानखाते अन् त्या विषयातले तज्ज्ञ ‘तारीख पे तारीख’ देत आहेत. आज येईल, उद्या येईल, असे करता करता पाऊस काही येत नाही. दुबार पेरणी उलटण्याची स्थिती आहे.
शंकर पाटील
अंजनगाव सुर्जी