डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह ३० पासून

0
76

– आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचा सहभाग
– स्थानिक कलाकारांचाही सहभाग
नागपूर, २४ जुलै
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार ३० जुलैपासून डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. देशपांडे यांचा स्मृतिदिन ३० जुलै रोजी असून हे या समारोहाचे २६ वे वर्ष आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हा त्रिदिवसीय समारोह रोज सायंकाळी ६.३० वाजता आयोजिण्यात आला आहे.
समारोहाची सुरुवात पारंपरिक उद्‌घाटनाने होऊन उस्ताद रशीद खान यांचे शिष्य ओम बोंगाणे यांच्या गायनाने सादरीकरणाला सुरुवात होईल. दुसरी प्रस्तुती नागपुरातील प्रसिद्ध कलाकार अवनींद्र शेवलीकर (सतार), शिरीष भालेराव (व्हायोलिन), आशिष सावू (गिटार) आणि संदेश पोपटकर (तबला) यांच्या समूह वाद्यवृंदाची राहील. समारोहाच्या पहिल्या दिवसाची सांगता किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विनायक तोरवी यांच्या गायनाने होईल. समारोहाच्या दुसर्‍या दिवसाचा प्रारंभ कर्नाटक शैलीच्या युवा गायिका धारिणी वीरराघवन् यांच्या गायनाने होईल. दुसरी प्रस्तुती पंसुहास व्यास यांच्या शास्त्रीय गायनाची राहणार असून संगीत सभेचा समारोप प्रख्यात कथ्थक नृत्यांगना अनुराधा सिंग यांच्या एकल आणि समूह कथ्थक नृत्याविष्काराने होईल.
समारोहाच्या तिसर्‍या आणि समारोपीय मैफलीची सुरुवात पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य कृष्णा साळुंके यांच्या पखावज वादनाने होईल. त्यानंतर, पुण्याच्या समापन भरतनाट्य संशोधन मंदिर निर्मित, रणजित देसाई लिखित आणि रवींद्र खरे दिग्दर्शित ‘हे बंध रेशमाचे’ या संगीत नाटकाच्या सादरीकरणाने समारोहाचा समारोप होईल. नाटकाचे संगीत स्व. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे असून नाटकात चारुदत्त आफळे, संजीव मेहेंदळे, उत्तरा पेंडसे, कविता टिकेकर आणि गौरी पाटील यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या त्रिदिवसीय समारोहाकरिता प्रतिदिन १०० रुपये देणगी शुल्क आकारण्यात येणार असून प्रवेशपत्र मंगळवार २५ जुलैपासून दमक्षेच्या सिव्हिल लाईन्स कार्यालयात तसेच समारोहादरम्यान वसंतराव देशपांडे सभागृहात उपलब्ध राहणार आहेत.