महिला सुरक्षा आणि उपाययोजना…

0
32

प्रासंगिक
आजच्या काळात महिलांवरील अत्याचार दिवसागणिक वाढतच चालले आहेत. मग तो कौटुंबिक हिंसाचार असो अथवा लैंगिक अत्याचार. महिलांवरील लैंगिक अत्याचार ही बाब अत्यंत गंभीर असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न सध्या ऐरणीवर आला आहे. लैंगिक अत्याचार म्हणजे साधारणत: लैंगिक छेडछाड, लैंगिक छळ, विनयभंग, पाठलाग करणे आणि अत्यंत किळसवाणी अशी शेवटची पायरी म्हणजे बलात्कार! बलात्कारित महिलेचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते, तिचे भावविश्‍व करपून जाते, तिचा आत्मविश्‍वास हरवतो, इतकेच नाही, तर काही वेळा ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते. काही वेळा बलात्कार केल्यानंतर आरोपींकरवी तिला मारून टाकले जाते. लैंगिक अत्याचार कोणत्याही प्रकारचा असला, तरी त्यामध्ये महिलेचा आत्यंतिक अपमान होतो; तिच्या घटनात्मक आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन होते.
लैंगिक अत्याचारांपासून महिलांचे संरक्षण करण्याकरिता आपल्या देशात कठोर कायदे आहेत. भारतीय महिला वेळोवेळी कायद्याची मदत घेऊ शकतात. परंतु, त्याआधी महिला स्वत: आपल्या सुरक्षेकरिता काही उपाययोजना करू शकतात. उनाड युवकांना महाविद्यालयीन युवतींचा/मध्यमवयीन महिलांचा पाठलाग करण्याची सवय असते. काही वेळा सुरुवातीला महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. उलट कसा ‘उल्लू’ फिरतो आहे म्हणून मैत्रिणींमध्ये एन्जॉय करतात. त्यामुळे पाठलाग करणार्‍यांची हिंमत वाढते. महिलांनी पाठलाग करणार्‍याविरुद्ध सुरुवातीपासूनच कणखर पाऊल उचलल्यास पुढील अनर्थ टळेल, त्याला सर्व मुलींनी मिळून कडक शब्दांत समज दिल्यास तो बहुधा पुन्हा हिंमत करत नाही.
मुलांशी-पुरुषांशी संभाषण करताना लाडिकपणा टाळावा. थेट नजरेला नजर देऊन शांत, स्थिर आवाजात बोलावे. लाडिकपणा केल्यास पुरुषांना सिग्नल मिळाल्यासारखे वाटू शकते. ते छेडछाड करण्याकरिता प्रवृत्त होऊ शकतात. आपल्या मोबाईवर अनोळखी नंबरवरून सूचक संदेश, चित्र, व्हिडीओ इत्यादी येत असल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये. तो नंबर ब्लॉक करणे आपल्याच हातात असते. तरीही त्रास असल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. फोन केल्यास पुन्हा तसे न करण्याबाबत त्याला कडक शब्दांत समज द्यावी. पोलिस तक्रार करण्याबाबत कल्पना द्यावी.
मुलींना लहानपणापासूनच आपल्या स्वत:च्या सुरक्षेबाबत जाणीव द्यावी. हवासा स्पर्श आणि नकोसा स्पर्श यातील फरक त्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगावा. लहान मुलांनादेखील ही जाणीव करून द्यावी. खाजगी अवयवाला कोणीही स्पर्श करता कामा नये, हे मुलांना ठामपणे/जोरकसपणे पटवून द्यावे. जेणेकरून लहान मुलांच्या लैंगिक छळाला आळा घालता येईल. मुलांनी पालकांसोबत सगळ्या गोष्टी ‘शेअर’ करणे आवश्यक आहे.
कोणी प्रियकर आपली छेडछाड करण्याचा प्रयत्न करीत असल्यास, नकोसे स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत असल्यास ठामपणे विरोध करा. पुरुष मित्रावर भलता विश्‍वास ठेवू नका. एखादी महिला जर त्याच्या भूलथापांना, आमिषाला बळी पडून त्याच्यासोबत एकटीने लॉजवर/रूमवर जात असेल आणि त्यानंतर बलात्काराला बळी पडत असेल, तर तो त्या महिलेने स्वत:च स्वत:चा दिलेला बळी आहे, असे माझे मत आहे.
महिलेला एकटे राहण्याची वेळ आल्यास घर/बंगला याऐवजी सदनिकेची (फ्लॅटची) निवड करावी. जेणेकरून सुरक्षेची खात्री जास्त प्रमाणात राहील. स्वतंत्र रूम/खोली करून एकटे राहण्याऐवजी महिला वसतिगृहाचा पर्याय निवडावा. शेजार्‍यांसोबत सलोख्याचे, परंतु अंतर राखून नातेसंबंध ठेवावेत. आपण एकटे राहात असल्याबाबत कोणालाही सांगू नये. मोबाईलवर/फेसबुकवर त्याबाबत माहिती देऊ नये.
नोकरदार महिलांनी कार्यालयात काम करीत असताना आपली वर्तणूक संयत आणि संयमित ठेवावी. कार्यालयात व्यवस्थित/सभ्य पोषाख धारण करावा. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार साडी अथवा ओढणीसहित पंजाबी सूटचा पर्याय निवडल्यास व्यक्तिमत्त्वात शालीनता येईल.
कार्यालयात सर्वांशी सारखी वागणूक ठेवावी. कोणाशीही अधिक जवळीक ठेवू/दाखवू नये. पुरुष सहकार्‍यांकडे लिफ्ट मागणे टाळावे. अन्यथा ते भलतीच ‘लिफ्ट’ घेण्याचा प्रयत्न करू शकतात.
बाहेरगावी महिलेला एकटीने कारने जायचे असल्यास वाहता रस्ता निवडावा, तो दूरचा असला तरीही चालेल. एकाट रस्ता विशेषत: रात्रीच्या वेळेस रिस्की ठरू शकतो. आपली काळजी आपण स्वत:च घ्यावी. कार लॉक करून घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी सभ्य पोषाख परिधान करावा. तंग, पारदर्शक, उत्तान, अतिफॅशनेबल, तोकडे कपडे परिधान करू नये. ‘‘बलात्कार तर काय, सहा महिन्यांच्या लहानगीवरदेखील होतात आणि सत्तर वर्षांच्या वृद्धेवरदेखील होतात!’’ या विधानाने आपल्या उत्तान पोषाखाचे समर्थन करणे हितावह नाही. आपण स्वत:हून जोखीम का ओढवून घ्यायची?
सर्वतोपरी काळजी घेतल्यानंतरसुद्धा जर महिलेवर अनास्था प्रसंग ओढविण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास आजूबाजूच्या लोकांची तत्काळ मदत मागावी. सहसा लोक मदत करतातच. पण, तुम्हीच स्वत:हून आरोपीसोबत रूमवर/हॉटेलवर/शेतावर/मळ्यावर गेल्यास (त्याच्यावर आंधळा आणि भाबडा विश्‍वास ठेवून) तर लोकंतरी काय करणार? कायद्याची मदत, हा परिणामकारक पर्याय आहेच!
डॉ. भाग्यश्री नवलाखे-देशपांडे
अमरावती