‘परिवार प्रबोधनकार’ बाबासाहेब नंदनपवार!

0
33

वाचकपत्रे
नागपुरातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल असे बाबासाहेब नंदनपवार यांचा नुकताच, शतकमहोत्सवी परिवार प्रबोधन कार्यक्रम शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडला. मुख्य म्हणजे १११ कुटुंबांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली, हीसुद्धा एक अभिमानाची बाब आहे. सभागृह तुडुंब भरले होते. मुलांचे मन हे कोवळी माती समजून तेव्हाच योग्य आकार देणे हे पालकांच्या हाती आहे म्हणून पालकांचीच जबाबादारी मोठी आहे, हे त्यांनी समजावून सांगितले.
नुकतीच वयाची ७५ वर्षे ते पूर्ण करणार आहेत. नागपुरातील सन्माननीय मंडळी त्यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम करणार आहे. उत्तम आरोग्यासह त्यांनी हा कार्यक्रम द्विशतकी करावा, ही शुभेच्छा!
मनोज वैद्य
९८२२९४९२६०

पूर परिस्थितीचा राज्ये सामना का करीत नाहीत?
उत्तर भारतासह अनेक राज्यांत महापुराने थैमान मांडले आहे. अनेक लोकांचा जीव गेला आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यांच्या घरांची पडझड झाली आहे. लोकांना खायला अन्न आणि पिण्याला पाणी नाही, अशी काही ठिकाणी स्थिती आहे. अशा स्थितीत राज्यांचे आकस्मिक पथक करते काय? स्वत: मुकाबला न करता, महापूर आला की, प्रत्येकच राज्य केंद्राकडे मदतीची याचना करते. हे दृश्य ठीक नाही. अनेक राज्यांत तर दरवर्षी महापूर येतो. हे माहीत असूनही आधीच पुरेशी व्यवस्था केली जात नाही आणि ऐनवेळी मग धावपळ करतात. केंद्र मग हेलिकॉप्टर्स, खाद्यपदार्थ, औषधी पाठवते. पण, हे किती दिवस चालणार? शेतकर्‍यांचा प्रश्‍न आला की, केंद्राकडे निधीची मागणी. मग राज्ये आहेत कशासाठी? केंद्राने यावर योग्य तोडगा काढावा, असे वाटते.
विनायक दखने
अमरावती

कॉंग्रेस, प्रणवदांचेदेखील ऐकत नाही!
भारताचे मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पदभार सोडण्याच्या दोन दिवस आधी देशाला संदेश देताना सांगितले होते की, जनसामान्यांच्या प्रश्‍नावर चर्चा होण्यासाठी विरोधकांनी संयम बाळगावा. तसे न केल्यास त्यांचेच नुकसान होईल. नुकताच एक प्रसंग लोकसभेत पाहायला मिळाला. तथाकथित गोरक्षकांच्या हल्ल्यांच्या प्रश्‍नावर गदारोळ करताना, कॉंग्रेसच्या सदस्यांनी नोंदी घेणार्‍या अधिकार्‍यांची कागदपत्रे हिसकावून ती फाडली व अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे भिरकावली. परिणामी, सहा सदस्यांचे निलंबन करावे लागले. याचा अर्थ, कॉंग्रेसजन राष्ट्रपतींचेदेखील ऐकायला तयार नाहीत! वास्तविक पाहता, पंतप्रधान मोदींनी अशा हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असताना, प्रश्‍न संपला होता. पण, शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करून कॉंग्रेसने आपले हसे करून घेतले, नेहमीप्रमाणे!
वसंत देशमुख
नागपूर

बनावट नोटा अन् जागतिक निविदा
नोटाबंदी झाल्यानंतर कोट्यवधींच्या संख्येने नोटा बँकांमध्ये जमा झाल्या. पण, या नोटांचे निरीक्षण केले असता, काही नोटा या बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता चलनातून बाद झालेल्या सर्व नोटांची पडताळणी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जागतिक निविदा मागविली आहे. म्हणजे, यातही बहाद्दर निघाले, असेच दिसते. हे प्रकरणच अतिशय गंभीर आहे. याची कसून तपासणी केल्यानंतर कोणत्या बँकेत किती बनावट नोटा आल्या, याची माहिती मिळणार आहे. पण, त्यासाठी ही कसरत रिझर्व्ह बँकेला करावी लागणार आहे.
विनायक देशपांडे
नागपूर

कॉंग्रेसने आधी आपल्या पक्षाची काळजी करावी!
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे ५० वर्षे भारत देश कॉंग्रेसच्या हातात होता. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला तर फक्त तीनच वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांच्या प्रगतीचा विचार केला, तर भारत ५० वर्षांच्या तुलनेत दहा वर्षे आणखी पुढे गेलेला आढळेल.
हा इतिहास आणि वर्तमानकाळ लक्षात ठेवून, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बेताल, अपरिपक्व वक्तव्ये करू नयेत. राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी पदाची शपथ घेतली. त्यांचा विजय निश्‍चित होता. पण, कॉंग्रेसचे हाल पाहा. मीराकुमार यांना आंध्रप्रदेशात एकही मत मिळाले नाही. गुजरातेत ११ मते फुटली, दिल्लीत दोन मते, गोव्यात पाच मते, महाराष्ट्रात १२ मते, पश्‍चिम बंगालमध्ये ६ मते फुटली. याचा अर्थ काय होतो? आतातरी कॉंग्रेसने आपले विषारी विचार गटारात सोडावे आणि आपल्या पक्षाकडे अधिक लक्ष पुरवावे. हेच शहाणपण ठरेल.
अमोल करकरे
पनवेल