दे धक्का!

0
58

वेध
‘‘मुंबई, तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?’’ असं म्हणत, मुंबई महापालिकेच्या कारभारावर एफएम रेडिओ प्रसारणातून आरजे मलिष्काने ताशेरे ओढल्यानंतर, मलिष्का आणि शिवसेना चांगलीच चर्चेत आली आहे. मुंबईत नेहमीच मुसळधार पाऊस पडतो. गटारं तुंबतात, जड वाहनांमुळे झालेल्या खड्‌ड्यांत पाणी साचतंच. नंतर पालिकेकडून ते खड्‌डे बुजवले जातात. बीएमसी असं सांगते. पण, प्रत्यक्षात तसे होते का? दरवर्षीची ही समस्या आहे. पावसाळ्यात अनेक अपघात होतात, कुणाचा जीव जातो, कुणी जायबंदी होतात. यंदा खड्डे बुजविण्यासाठी तब्बल दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती म्हणे. मग हा पैसा गेला कुठे? मुंबईकरांना हे चांगले ठावूक आहे की, हा पैसा कुठे जातो. मागे राजकीय कारणावरून राज ठाकरे यांनी शिवसेनेला लक्ष्य करताना, ‘यांना दररोज रसद येते ना, बीएमसीमधून’ असे जाहीर सभेत वाभाडे काढले होते.  लगेच शिवसेनेच्या वतीनं किशोरी पेडणेकर यांनी गाण्यातूनच मलिष्काला उत्तर दिलं, तर आरजे मलिष्का हिच्यावर शिवसेना अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे. इतकंच नाही, तर मुंबई महापालिकेची बदनामी केल्याप्रकरणी ९३.५ रेड एफएमवर ५०० कोटींचा दावा ठोकण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. हे प्रकरण इतकं रंगण्याचं कारण काय? मुंबईचा विचार केला, तर तेथील मराठी माणूस हा शिवसेनेचा केंद्रबिंदू आहे, तसेच दुसरीकडे भाजपा आणि मनसेचाही  मतदारवर्ग मोठ्या संख्येने मुंबईत आहे. या बाबी लक्षात घेता, शिवसेेनेला अशी टीका महागात पडू शकते, हे तर कारण नाही ना?
आरजे मलिष्काचा विचार केला, तर ती रेड एफएमवर आरजे म्हणून कार्यरत आहे. आता तिनं सादर केलेलं गाणं हे दुसर्‍याच कुणी लिहून दिलं असा तिच्यावर आरोप आहे. ते काहीही असो. तिच्या गाण्यातून शिवसेनेला जोरदार तर ठोकलेल्या दाव्यामुळे रेड एफएमला अल्प धक्का बसला आहे.
‘गुड मॉर्निंग मुंबई’ अशी गोड, दीर्घ स्वराने साद घालत अगदी सकाळपासून मुंबईकरांच्या सोबत एफएमची रेडिओ स्टेशनं आहेत. तेथील माणसाची दिवसभरातील दगदग, त्यांच्या समस्या हे रेडिओ चॅनेल अधोरेखित करत असल्यामुळे, तेथील माणसाशी ते एकरूप झाले आहेत.  उर्वरित वाद बाजूला ठेवून मलिष्काच्या गाण्यातून जे वास्तव समोर आलंय्, त्यात गैर असं काय आहे. ते मुंबईचं वास्तवच आहे.
विद्यापीठाचा गोंधळ…
विद्यार्थ्यांची परीक्षा केव्हाच झाली, आता परीक्षा मुंबई विद्यापीठाची आहे. कारण परीक्षांच्या निकालाकरिता मुंबई विद्यापीठाची परीक्षायंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, निकाल लावण्याकरिता असमर्थ ठरली आहे. आपल्या निकालाची आतुरतेनं वाट पाहणार्‍या विद्यार्थ्यांना डोळ्यांसमोर ठेवून  राज्यपालांनी कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैच्या आत पदवीधर अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी नागपूर विद्यापीठाकडे मदत मागितली खरी, पण  निकाल वेळेत घोषित करण्यासाठी नागपूर विद्यापीठाला तांत्रिक अडचणी येत आहेत.  ‘संकटं येतात, तेव्हा चारही बाजूंनी येतात,’ असंच काहीसं मुंबई विद्यापीठाबाबतीत म्हणावं लागत आहे. स्पर्धेत नेहमी पुढे राहण्याकरिता आजचा विद्यार्थी अचाट मेहनत- परिश्रम अभ्यासाच्या माध्यमातून घेत असताना, विद्यापीठाच्या अशा कारभारामुळे चिंतित होणं साहजिक आहे. इतकं मोठं आव्हान पेलण्यासाठी  विद्यापीठानं पूर्वतयारी करायला पाहिजे होती. कारण थोड्याथोडक्या नाहीत, तर मुंबई विद्यापीठातील बी. कॉम. परीक्षेच्या दोन लाख उत्तरपत्रिकांची तपासणी नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकांकडून करण्यात येणार आहे. मुंंबई विद्यापीठातल्या तब्बल २२ लाख उत्तरपत्रिका तपासणी झाली नसल्यानं विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांकडून मुंबई विद्यापीठाविरोधात संताप व्यक्त होत असतानाच, त्यात आणखी एक भर म्हणजे मुंबई विद्यापीठातील गोंधळाबाबत आता युवासेना अध्यक्ष, शिवसेनेची थर्ड जनरेशन आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली आहे. कुलगुरू  संजय देशमुख आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार आहेत, असा आरोप करून त्यामुळे त्या दोघांचे राजीनामे घ्यावे, अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी राज्यपालांकडे केली. पण, यात तावडे यांचा संबंध काय? विद्यापीठ निकालाकरिता ऑनलाईन असेसमेंट ४ दिवसांत आटोपण्यासाठी मुंबईतील महाविद्यालयं गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा निकाल लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची प्रचंड धावपळ सुरू आहे. विद्यापीठाला अशा परिस्थितीला का समोरं जावं लागत आहे, याचं चिंतन होणं आज गरजेचं आहे. विद्यापीठाचा कारभार जर असाच ढेपाळला तर येणार्‍या भविष्यात मोठे संकट विद्यार्थी आणि विद्यापीठावर येऊ शकते, याचे भान ठेवलेेले बरे! चिंताग्रस्त असलेले पालक, विद्यार्थी यांना दिलासा देणे विद्यापीठाकडून गरजेचे आहे. कारण शिक्षणप्रणालीतील हे दोष चव्हाट्यावर यायला नकोत. यंत्रणा कुठलीही असो, कधीकाळी संकटं उद्भवतात, त्यातून सहीसलामत बाहेर पडताही येतं, पण त्यापासून काहीतरी धडा घेऊन पुढील रणनीती आखायला हवी.  ही  सर्व परिस्थिती पाहता, विद्यापीठ यंत्रणा आता येणार्‍या दिवसांकरिता काय उपाययोजना करेल व हल्लीची  परिस्थिती कशी हाताळते, यावर सार्‍यांचे लक्ष लागले आहे.
– दीपक वानखेडे ९७६६४८६५४२