स्वप्न भंगले!

0
63

वेध
आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला क्रिकेटचे पुरुष क्रिकेटपटूंच्या संघटनेमध्ये विलीनीकरण झाले आणि महिला क्रिकेटला चांगले दिवस दिसू लागले. भारतातही असे विलीनीकरण झाले आणि महिला क्रिकेटचे पालकत्व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्वीकारले, तेव्हापासून भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रगतीचा आलेख उंचावतानाच दिसत आहे. परिणामी, या महिला क्रिकेट संघाने नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिलांच्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. या आधीही भारतीय संघ (२००५ साली) एकदा अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, त्यावेळची आणि आजची परिस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. त्या वेळी महिलांना पाहिजे तेवढे आर्थिक आणि मानसिक पाठबळ नव्हते. आता या दोन्ही बाजूंमध्ये महिलांचा संघ मजबूत झाला आहे. व्यावसायिक खेळाचे प्रदर्शन केल्यामुळेच या संघाला अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली. ज्या संघाकडून भारताला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला तो यजमान संघ होता. साखळी फेरीत भारताने या संघाला धोबीपछाड दिली होती. मात्र, साखळी फेरीतील सामना आणि अंतिम सामना यात मोठा फरक असतो. कधी नव्हे तो पहिल्यांदा महिला क्रिकेटचा सामना हाऊसफुल्ल झाला होता. यात दोन्ही संघांच्या समर्थकांची संख्या जवळपास तुल्यबळ होती. आजपर्यंतचा अनुभव लक्षात घेता, यजमान संघाला कधीही परिस्थितीचा जास्त प्रमाणात फायदा मिळत असतो. कदाचित, अशाच प्रकारचे दडपण भारतीय संघावर निर्माण झाले असणार आणि इंग्लंडला त्याचा फायदा मिळाला असणार. अंतिम सामन्यात भारताचा पराभवही एकतर्फी झाला नाही, तर अवघ्या नऊ धावांनी हातातोंडाशी आलेला घास गमावला गेला आणि मिताली राज चमूचे स्वप्न भंगले! या संघाला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शेवटच्या सात षटकांनी भारतीय महिला संघाच्या आशेवर पाणी फेरले. भारताचे आव्हान मोडून काढीत इंग्लंड संघाने चौथ्यांदा विश्‍वचषकावर नाव कोरले. या संघात गोलंदाजांचा जास्त समावेश करण्यात आला, त्यांनीच अखेर धोका दिला. गोलंदाजीच्या सुरुवातीच्या सुमार कामगिरीमुळेच इंग्लंडला २०० च्या वर पल्ला गाठता आला. महिला क्रिकेटमध्ये तसे पाहता दोनशे, सव्वादोनशेचा पल्ला गाठणे तसे कठीणच असते. ते या सामन्यात दिसून आले. भारताच्या महिला क्रिकेटपटूंना अंतिम सामना जरी जिंकता आला नसला, तरी त्यांनी आपल्या देशवासीयांची मने मात्र जिंकली, हेही तेवढेच खरे!

बदललेली परिस्थिती…
या आधी भारतीय महिला क्रिकेट संघाने २००५ साली विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तेव्हाही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्या वेळी महिला क्रिकेटचे संचालन महिला क्रिकेटची वेगळी संघटना करीत होती. या महिला क्रिकेट संघटनेला आपला पाहिजे तसा दबदबा निर्माण करता आला नव्हता. आर्थिक विवंचनेबाबत तर काही विचारूच नका! मिळेल तेथे मुक्काम करणे, मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे आदी अनेक बाबतीत महिला क्रिकेटने हलाखीचे जीवन काढले. दर्जेदार मैदानावर सराव तर सोडाच, सामना किंवा स्पर्धा खेळायला मिळणेही मोठे भाग्याचे समजले जात होते. त्या वेळी महिला क्रिकेट म्हटले की, खेळाडू मिळण्याचीही वानवा होती. डायना एडलजीसारख्या खेळाडूला अनेक वर्षे राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करावे लागले होते. राष्ट्रीय संघासाठीही खेळाडू मिळणे दुरापास्त झाले होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. महिला क्रिकेटला ‘अच्छे दिन’ आले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या छत्रछायेखाली महिला क्रिकेट आले आणि संपूर्ण रागरंगच बदलून गेला. खेळाडूंची शैलीही बदलली. दर्जेदार मैदाने, राहण्यासाठी पंचतारांकित व्यवस्था, प्रवासासाठी विमाने, सामना शुल्कात वाढ, लोकप्रियतेचा कळस… आंतरराष्ट्रीय स्तराप्रमाणेच भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस दिसू लागले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेटचे पालकत्व स्वीकारल्यापासून महिला क्रिकेटची सर्वच पातळीवर प्रगती होणे सुरू झाले आहे. आता तर अंतिम सामन्यात प्रवेश मिळविल्यानंतर लगेच बीसीसीआयने संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाख व संघातील इतर सहकार्‍यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या पुरस्कारांची घोषणा करून टाकली आहे. कधी नव्हे तेवढी यंदाच्या महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे खेळाडूंचा दृष्टिकोनही बदलला आहे. त्यांचा हा दृष्टिकोन आक्रमक व सकारात्मक झाला आहे. खेळाडूंची मानसिकताही कणखर झाली आहे. स्वत:च्या खिशाला चोट बसणे बंद झाल्यामुळे मानसिक तणावही कमी झाला आहे, आर्थिक विवंचनेतून हा संघ पूर्णपणे बाहेर निघाला आहे. विदर्भाचा विचार केला, तर आधी विदर्भाच्या महिला खेळाडू सिव्हिल लाइन्सस्थित खाचखळगेवाल्या वेकोलि मैदानावर सराव करीत होत्या. त्या मैदानावर पाहिजे त्या सोयी-सुविधा अजीबात नव्हत्या. आता मात्र हिरव्याकंच व्हीसीए मैदानावर या महिला क्रिकेटपटूंना सराव करायला मिळतो. त्यामुळे खेळाडूंना खेळातही सुधारणा घडवून आणता येऊ लागली आहे. आधी एखाद्दुसर्‍या खेळाडूवर अवलंबून राहावे लागत होते. आता मात्र फलंदाज व गोलंदाजांची फळी तयार होऊ लागली आहे. पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटपटूही आता भावी पिढीचे आदर्श ठरू लागल्या आहेत. एकूणच काय, की परिस्थिती बदलत आहे. यंदा भंगलेले स्वप्न २०२१ साली आपल्याला साकारता येईल, इतपत आपल्या भारतीय संघाची मानसिकता तयार होईल, यात काही शंका नाही…!
महेंद्र आकांत
९८८१७१७८०३