अपेक्षा- नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून…

0
66

दिल्लीचे वार्तापत्र
रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यामुळे राष्ट्रपतिभवनात खर्‍या अर्थाने ‘राम’राज्य आले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यानिमित्ताने देशातील सर्व घटनात्मक पदे कॉंग्रेसमुक्त होत भाजपाच्या ताब्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यावर कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते, ते यानिमित्ताने मर्यादित पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्षात आले आहे.
आतापर्यंत पंतप्रधान आणि लोकसभेचे अध्यक्ष ही दोन घटनात्मक पदेच भाजपाकडे होती. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी कॉंग्रेस आघाडीच्या मीराकुमार यांचा पराभव केल्यामुळे राष्ट्रपतिपद भाजपाच्या ताब्यात आले आहे. आता फक्त उपराष्ट्रपतिपद हे भाजपेतर व्यक्तीच्या ताब्यात आहे. मात्र, ५ ऑगस्टला होणार्‍या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या व्यंकय्या नायडू यांचा विजय ही दगडावरची रेघ आहे! त्यामुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेचे अध्यक्ष अशी चार प्रमुख घटनात्मक पदे भाजपाच्या ताब्यात येणार आहेत. ही एक ऐतिहासिक अशी घटना म्हणावी लागेल.
या चार व्यक्ती ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात, त्यात सत्ता हे साध्य नाही तर समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणाचे साधन मानले जाते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी अंत्योदयची संकल्पना मांडली. यात समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणाची कामना करण्यात आली आहे. अंत्योदयची ही कल्पना, हाच मोदी सरकारच्या विकासाचा आधार आहे. ही संकल्पना साकारण्यासाठीच सत्ता आवश्यक असते आणि सत्ता राबवण्यासाठी सर्व प्रमुख घटनात्मक पदांवर आपल्या विचारधारेची माणसे अपेक्षित असतात. ते स्वप्न रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपतिपदी झालेल्या निवडीने साकार झाले आहे.
आज राष्ट्रपती आणि पंतप्रधानपदी खर्‍या अर्थाने तळागाळातल्या व्यक्तींची निवड झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद दलित समाजातले आहेत. त्यांचे बालपण अतिशय गरिबीत आणि हालअपेष्टांत गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही अशाच परिवारातून वर आले आहेत. रेल्वेस्थानकावर त्यांना चहाही विकावा लागला. दोघांनीही आपण कधी या सर्वोच्च पदावर पोहोचू असे स्वप्न पाहिले नाही. पण, विविधतेत एकता दाखवणार्‍या भारतातील लोकशाहीने या दोघांना देशातील सर्वोच्च अशा घटनात्मक पदांवर विराजमान केले आहे.
राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी सरकार पार पाडू शकत नाही, तर सरकार त्यादृष्टीने मदत करू शकते, दिशा देऊ शकते, पण राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी या देशातील सर्वसामान्य माणूस, जो आपले कर्तव्य आणि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो, तोच पार पाडू शकतो, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पहिल्या संबोधनात स्पष्ट केले. आपले कर्तव्य आणि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत रामनाथ कोविंद आणि नरेंद्र मोदी आज या पदावर पोहोचले आहेत. पक्षाने वेळोवेळी ज्या जबाबदार्‍या सोपवल्या, त्या या दोघांनी पार पाडल्या. आता देशाच्या समग्र विकासाची आणि समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणाची जबाबदारी नियतीने या दोघांच्या सक्षम हातात टाकली आहे.
मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारली. राष्ट्रपती होण्यापूर्वी प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते, परराष्ट्र आणि अर्थ यासह अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. जगातील पाच सर्वोत्तम अर्थमंत्र्यांमध्ये प्रणव मुखर्जी यांचा समावेश होत होता. राष्ट्रपतिपदाचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा प्रणव मुखर्जी यांनी कायमच ठेवली नाही, तर ती आपल्या अभ्यासू आणि मर्यादापूर्ण वागणुकीने वाढवली.
राष्ट्रपती म्हणून निवडून येण्याच्या आधी प्रणव मुखर्जी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, पण राष्ट्रपती झाल्यावर प्रणव मुखर्जी यांनी आपल्याला पक्षीय राजकारणातून पूर्णपणे दूर केले. त्यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली तेव्हा केंद्रात कॉंग्रेसचेच सरकार होते, त्यामुळे केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांच्यात संघर्षाची स्थिती उद्भवण्याची कोणतीच शक्यता नव्हती. पण, दोन वर्षांनी परिस्थिती बदलली. केंद्रात भाजपाचे सरकार आले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यात घटनात्मक पेंचप्रसंगाची स्थिती उद्भवू शकते, असा अंदाज होता. याचा अर्थ काही मुद्यांवर तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मतभेद झालेच नाही, असे नाही. पण, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्या प्रगल्भतेमुळे, संयमित वागणुकीमुळे तसेच एकदुसर्‍याच्या पदाचा मान ठेवण्याच्या भूमिकेमुळे देशात घटनात्मक पेंचप्रसंगाची स्थिती उद्‌भवली नाही.
शपथविधीसाठी संसदेच्या केंद्रीय कक्षात आल्यावर रामनाथ कोविंद यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. याच सभागृहात विविध पक्षांच्या खासदारांशी आमची अनेक विषयांवर चर्चा होत असे. प्रत्येक वेळी एकदुसर्‍याचे सर्वच मुद्दे आम्हाला मान्य होत असे नाही, आमच्यात मतभेदही होत असे. पण, एकदुसर्‍याच्या विचारांचा आणि भावनांचा आदर करण्याची आमची सवय होती, तेच आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे, असे सुभाषितवजा विधान रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. आपला राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ कसा राहणार, याचे संकेतच जणू कोविंद यांनी दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात वकिली केल्यामुळे कोविंद यांना घटना आणि कायद्याचे पूर्ण ज्ञान आहे. कोविंद यांनी मंत्री म्हणून कधी काम केले नसले, तरी परराष्ट्र सेवेचे अधिकारी म्हणून परदेशात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. राज्यसभा सदस्य म्हणूनही एक तप काम केले आहे. जनता पक्षाच्या कार्यकाळात तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम केले. राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्यासाठी बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा कोविंद यांनी दिला होता. त्यामुळे राष्ट्रपती म्हणून काम करताना कोविंद यांना अडचण येण्याची कोणतीच शक्यता नाही.
मात्र प्रत्येक वेळी त्यांची तुलना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी केली जाऊ शकते. ते स्वाभाविकही आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. आपल्या पहिल्याच भाषणातून त्यांनी देशवासीयांवर आपली छापही पाडली आहे.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदी निवडून आल्यावर ती व्यक्ती कोणत्याही एका पक्षाची राहात नाही, तर पक्षीय बंधनांतून मुक्त होत संपूर्ण देशाची होऊन जाते. ही वस्तुस्थिती असली तरी ज्या विचारधारेतून या पदावर कोविंद निवडून आले आणि उपराष्ट्रपतिपदी व्यंकय्या नायडू निवडून येणार आहेत, त्यांना आपल्या मूळ विचारधारेचा विसर पडणार नाही, हे निश्‍चित! आज देशाला अनेक अंतर्गत आणि बाह्य समस्यांचा सामना करावा लागतो, अशा पेंचप्रसंगाच्या स्थितीत रामनाथ कोविंद या संकटाच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करतील, असा विश्‍वास आहे.
भाजपा आणि एकूणच संघपरिवाराचे पहिलेच राष्ट्रपती असल्यामुळे रामनाथ कोविंद यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षाही खूप राहणार आहेत. या अपेक्षांची पूर्तता रामनाथ कोविंद करतील आणि आपल्या राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतिभवन जास्तीत जास्त लोकाभिमुख करतील, यात शंका नाही.
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७