राष्ट्रपतींचे चिंतन…

0
81

अग्रलेख
परवा पदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलेले मनोगत म्हणजे राष्ट्रध्यक्षांचे औपचारिक भाषण नसून, ती या देशातील लक्षावधी नागरिकांच्या मनातील सहज सुलभ भावना आहे. घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च असलेले राष्ट्रपतिपद कमी महत्त्वाचे नव्हतेच कधी. हा, लोकशाही व्यवस्थेत त्या पदावरील व्यक्तीच्या कार्यकक्षेला मर्यादा जरूर आहेत. पण, ठरवले तर या पदावरील व्यक्ती देशाच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. एखादे रचनात्मक कार्य लीलया सिद्धीस नेऊ शकते, हे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. पण, नेहरू-गांधी घराण्याची आब राखण्याच्या नादात, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच आजवर या पदाची शान मातीस मिळविली आणि पंतप्रधानांच्या तुलनेत राष्ट्रपतिपद तितकेसे महत्त्वाचे नसल्याची बाब लोकमानसात बिंबविण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्नही त्यांनीच केला आजवर. त्यामुळेच की काय, पण ३५६ खोल्यांच्या भल्यामोठ्या, अलिशान भवनात राहणारे देशाचे राष्ट्रपती तसे अगदीच कमकुवत असल्याची भावना अजूनही लोकांच्या मनात घर करून राहिली आहे. त्यामुळे, हे म्हणजे केवळ मानाचे पद असल्याचा आणि त्याला कुठलाच अधिकार नसल्याचा, फारतर चार-दोन विदेश दौरे, प्रजासत्ताक दिनाला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, यापलीकडे त्या पदावरील व्यक्तीला विशेष काही कामंही नसल्याचा गैरसमज पसरविण्याचे काम आजवरच्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक केले. पण, इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, जेव्हा जेव्हा राजकीय गरजांच्या पलीकडे विचार करून या पदावरील व्यक्तीची निवड झाली, तेव्हा तेव्हा त्या व्यक्तींनी स्वत:चे आणि या पदाचेही महत्त्व सिद्ध केले, हा इतिहास आहे. गेल्या काही वर्षांत तर ही बाब प्रकर्षाने जाणवते आहे. व्ही. व्ही. गिरी असोत वा मग आर. व्यंकटरमण, डॉ. राधाकृष्णन् असोत वा मग डॉ. अब्दुल कलाम, एखाद्दुसरा अपवाद वगळता, आधीच कर्तबगार असलेल्या व्यक्तींनी या पदाची शान वाढविण्याचाच प्रयत्न सातत्याने केला आहे. रामनाथ कोविंद यांचाही प्रवास नेमका त्याच दिशेने असणार असल्याची बाब त्यांनी, पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणातून स्पष्ट झाली आहे. हा देश अधिक सक्षम आणि नैतिकदृष्ट्या बळकट करण्याची मनीषा व्यक्त करताना कोविंद यांनी, गांधीजी आणि दीनदयाल उपाध्याय यांच्या स्वप्नपूर्तीचा जो मानस व्यक्त केला, खरं तर तीच विद्यमान सरकारच्या कार्याची दिशा आहे. समाजातील शेवटच्या घटकांचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते, ही किमया भारतीय राज्यघटनेची आहे. पण, त्याही पलीकडे, जाती-धर्माची भिंत तोडून एका समरस समाजाची बांधणी करण्यासाठी धडपडणार्‍या कार्यकर्त्यांची फौज ज्या कार्यातून-विचारांतून उभी राहिली आहे, त्या संघटनेशी, त्या विचारांशी बांधिलकी राखत प्रवास करणारी व्यक्ती त्या पदापर्यंत पोहोचते आणि तिथे पोहोचल्यानंतरही तिच्या मनातला ध्यास हा, समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासाचा असतो, तेव्हा त्यातून, ज्या विचारांतून त्यांची जडणघडण झाली, त्या विचारांची ताकदही आपसूकच अधोरेखित होते. राष्ट्रनिर्माणाचे कार्य एकटे सरकार करू शकत नाही. सरकार फारतर त्यासाठी साह्यभूत ठरू शकते. प्रेरणा देऊ शकते. लोकांच्या पाठीशी बळ उभे करू शकते. पण, मुळात ही लढाई लढावी लोकांनाच लागणार आहे. या देशातला प्रत्येक माणूस हा राष्ट्रनिर्माता आहे. आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर प्राणपणाने लढणार्‍या सैनिकापासून तर उन्हातान्हात घाम गाळून शेतात अन्नधान्य पिकवणार्‍या शेतकर्‍यापर्यंत, प्रत्येक जण राष्ट्रनिर्माता आहे. त्या त्या क्षेत्रातील यशाचे खरे श्रेय त्याचे आहे, ही बाब देशाच्या राष्ट्रपतींनी देशाला सांगण्याचे महत्त्व काही और आहे. नव्हे, तो त्यांच्या उद्बोधनाचा गाभा असावा, याला तर अजून आगळे महत्त्व आहे. भारतासारख्या विविधतेनं नटलेल्या, अनेकानेक जाती-धर्मांच्या लोकांचा समावेश असलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या अफाट पसरलेल्या भू-प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना सर्व घटकांच्या सहभागातूनच मांडली जाऊ शकते. इथे तर राष्ट्रपतींच्या भाषणाचा पायाच तो होता. ग्रामपंचायती स्वयंपूर्ण करण्यापासून तर डिजिटल इंडिया साकारण्यापर्यंतचा प्रवास त्याविना केवळ अशक्य आहे. आकाशाच्या दिशेने झेप घेताना जमिनीचा जराही विसर पडू न देण्याचे भान जपण्यासाठीचा, त्यांनी आवर्जून धरलेला आग्रह म्हणूनच महत्त्वाचा. अध्यात्माचा पाया लाभलेली संस्कृती ही संपूर्ण जगात भारताची ओळख आहे. इतरांच्या तुलनेत ही ओळख काहीशी वेगळी आहे. पण, तीच आपली ताकदही आहे. पण, कालपर्यंत नेमका त्याचाच विसर पडल्यागत सरकारे वावरत राहिली. कुठल्याशा एका गटाला, एका रंगाला सांभाळण्याच्या नादात विविधतेतील अद्वितीयतेचे महत्त्वच आमच्या विस्मरणात गेले होते. नव्या राष्ट्रपतींनी नेमके त्याचेच पुन:स्मरण परवा करून दिले. सततच्या परकीय आक्रमणांनंतरही स्वत:ची ओळख जपून ठेवणार्‍या भारताचा आजवरचा प्रवास संपूर्ण जगाच्या नजरेत भरावा असाच आहे. पण, अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्याचे भान राखले गेले पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासाची आठवण राज्यकर्त्यांनीच नव्हे, तर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजधुरीणांनीही जपली पाहिजे. ज्या दिवशी आशेची किरणं त्या झोपडीत जातील तो खरा आनंदाचा क्षण. याची कल्पना या देशातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना, त्याच्या नेत्यांना नाही असे नाही. पण सत्ता हाती आली, पदं पदरात पडली की मग, जिथून आपण आलो तो समाज, ज्यासाठी काम करायचे ते ध्येय याचा विसर पडतो अनकेदा. सुदैवाने भारताच्या नव्या राष्ट्रपतींच्या भाषणातून मात्र नेमक्या त्याच स्वप्नांसाठी, ध्येयपूर्तीसाठी जगण्याचा, धडपडण्याचा ध्यास व्यक्त झाला आहे. एरवी या पदावरील व्यक्तींनी जगावेगळ्या, अतिशय मोठमोठ्या गोष्टींवरच बोलावे, सामान्यांच्या आकलनापलीकडचा विचार मांडावा, तसलेच काहीसे काम करावे, असा गैरसमज आपल्या समाजात आहे. पण, अब्दुल कलामांनी त्या पदावरून इथल्या तरुणाईला जगण्याचा जो मंत्र दिला, खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठेपण साध्य करण्याचे कसब पणाला लावण्याचा जो आग्रह धरला, त्यातून राष्ट्रपतिपदावरील व्यक्तीच्या विचारांच्या दिशेचा आणि कार्यपद्धतीचा नवा पायंडाच पडला. परवा, पर्यावरणापासून तर भारतीय राज्यघटनेच्या रक्षणापर्यंतची जी गरज नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांच्या भाषणातून व्यक्त झाली, त्यातून भविष्यातील त्यांच्या प्रवासाची दिशा स्पष्ट तर झालीच, पण ‘त्या’ पायंड्याची आठवणही यानिमित्ताने झाली आहे. भारताची भूमिका आता केवळ या देशाच्या भौगोलिक सीमांच्या मर्यादेत बंदिस्त होऊ शकत नाही. हळूहळू त्याला वैश्‍विक आयाम लाभताहेत. त्यामुळे आमच्या जबाबदार्‍याही आता जागतिक परिघात तोलल्या जाऊ लागल्या आहेत. साहजिकच मुद्यांकडे, समस्यांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोनही अधिक विस्तारण्याची गरज त्यातून निर्माण होते आहे. कोतेपणा मागे टाकून, चौकटी मोडून पुढे जाण्याच्या शर्यतीत यापुढे आम्हाला उतरावे लागणार आहे. रामनाथ कोविंद यांच्या प्रतिपादनातून नेमकी तीच गरज प्रकर्षाने मांडली गेली आहे. देशाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, त्या पदावरून देशवासीयांशी संवाद साधताना, एरवी लहान वाटणार्‍या गोष्टींचे जे मोठेपण सांगण्याचा प्रयत्न झाला, नेमके तेच त्यांचे वेगळेपण ठरले- व्यक्ती म्हणूनही आणि देशाचा जबाबदार असा प्रथम नागरिक म्हणूनही…!