कारावास कहाणी…

0
53

प्रासंगिक
कारावासाची भीती वाटावी, अशी परिस्थिती राहिली आहे काय? तामिळनाडूतील एक राजकीय नेत्या शशिकला यांना बंगलोर येथील केंद्रीय कारागृहात पंचतारांकित सुखसोयी मिळत असल्याच्या बातमीने विचारचक्र मनात सुरू झाले. कारागृहात मनोवांच्छित सुखसोयी मिळाव्यात, याकरिता शशिकला यांनी दोन कोटी रुपयांची लाच दिल्याचेही याच बातमीत पुढे नमूद होते. लाच देण्याचा शोध घेणारा अहवाल सरकारला दिल्यानंतर वर्तमानपत्रांपर्यंत कसा पोहोचतो, हेदेखील गूढ आहे. शशिकला यांचे कारस्थान उघडकीला आणणार्‍या महिला तुरुंग उपमहासंचालक रूपा आणि महासंचालक यांच्यात बरीच खडाजंगी झाल्यानंतर डीआजी रूपा यांची तडकाफडकी बदली करते, त्यामुळे संशयाचे मळभ अधिक गडद होत जातात. मुंबईतील भायखला जेलमधील महिला कैदी मंजुळा शेट्ये हिला निर्घृणपणे मारहाण करून जेलचे अधिकारीच तिचा जीव घेतात, हे सारे अतर्क्यच…
कारागृहाचा उल्लेख अगदी श्रीकृष्णजन्मापासून आहे. वासुदेव व देवकी यांचा कारावास सुरू असतानाच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले होते. नजरकैद म्हणजे तुमच्या राहत्या जागेतच तुमचे स्वातंत्र्य मंजूर असते. त्याबाहेर तुम्हाला जाता येत नाही. ब्रिटिश राजवट असताना स्वातंत्र्यप्राप्तीकरिता अनेक नरोत्तमांनी आंदोलन केले. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य मागणे, हा ब्रिटिशांना गुन्हा वाटत असल्याने, स्वातंत्र्यचळवळीत सहभागी स्त्री, पुरुष, बाल यांना ब्रिटिश सरकार तुरुंगात डांबत असे. लोकमान्य टिळकांना आताच्या म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगात, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमान बेटावरील तुरुंगात ठेवण्यात आले. अंदमान बेटावरील तुरुंगात बंदिवानांना पशुवत वागविले जात असे. ब्रिटिशांनी तयार केलेले ‘जेल म्यॅनुअल’ स्वतंत्र भारतातही जसेच्या तसे वापरले जात असे. किरण बेदी या पहिल्या आयपीएस अधिकारी जेव्हा दिल्लीच्या तिहार कारागृहाच्या महासंचालक झाल्या, तिथपासून कारागृहात काही सुधारणा होण्यास प्रारंभ झाला. या सुधारणांमधूनच खुल्या तुरुंगावासाची कल्पना उदयास आली.
सराईत गुन्हेगार, चोरटी आयात करून गब्बर झालेले तस्कर, आतंकवादी, राजकीय मुखंड यांना तुरुंगवास होऊ लागताच, त्यांनी तुरुंगाची शिस्त खिळखिळी करण्यास प्रारंभ केला. पैशाच्या मस्तीवर आज कारागृहात जे पाहिजे ते मिळू शकते. डॉन लोकांचे वाढदिवसही कारागृहात साजरे होतात. कैद्यांना तंबाखू, गुटका, सिगारेट, दारू, मोबाईल, इत्यादी जे जे पाहिजे ते सर्व प्राप्त होते. हिशोब असा असतो की, जेल कर्मचार्‍यांनी अशा सुविधा पुरविल्या तर चौकशी, निलंबन होईल. फारतर नोकरी जाईल म्हणजे पगार मिळणार नाही. उरलेल्या नोकरी कालावधीचा पगार ‘ऍडव्हान्स’ दिला किंवा तसा शब्द दिला की काळजी कसली? सरकारी नोकरी मिळण्याकरिता एक कागद लागतो, मात्र नोकरी घालविण्याकरिता एक फाईल तयार करावी लागते. या सूत्राने घट्‌ट पाय रोवले असल्याने, नको असलेले सारे काही सहज घडते आहे. कारागृहातील कैदी पळून जाणे, त्यांचे आजारी पडून दवाखान्यात भरती होणे, कैद्याला न्यायालयात नेल्यानंतर परतताना कैद्याला परगावी घेऊन जाणे, इत्यादी बाबी जेल पोलिसांकरिता पर्वणीच ठरतात! सुदैव एवढेच की, बेईमान आहेत तसे कर्तव्याशी इमान राखणारेही आहेत. मध्यप्रदेश पोलिसांनी तुरुंगातून पलायन करणार्‍या अतिरेक्यांकरिता जी कार्यपद्धती अवलंबिली त्यामुळे तुरुंगातुन पळून जाण्याचा विचार अनेक अतिरेक्यांनी रद्द केला असेल. सारासार विचार केला तर गुन्हेगारांची कारावासाची भीती नष्ट झाली आहे, असे जाणवते. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदारांची सरकारी विश्रामगृहावर बडदास्त ठेवली जाते, कारागृहातील कैद्याच्या मृत्यूनंतर जेलरला कैद होते, कारागृहात मोबाईलचा अनिर्बंध वापर होतो, तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा अधिक संख्येत बंदिवान ठेवले जातात, चित्रपट अभिनेत्यांना अधिकची फर्लो रजा मिळते, इत्यादी बातम्या सामान्य नागरिकांच्या चिंता वाढविणार्‍या आहेत. मुख्य मुद्दा तुरुंगातील गैरव्यवस्था, तुरुंगातील भ्रष्टाचार हा नाही, तर समाजघटक गैरवर्तन करून तुरुंगात जात आहेत, हा आहे. समाजातील वाईट घटनांशी ‘माझा काय संबंध?’ हा विषय नागरिकांनी मनात बंदिस्त केला आहे. गरज आहे ती समाजातील वाईट घटना रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची! कारावासांची वाढती संख्या, त्यामध्ये वाढणारी बंदिजनांची संख्या, त्यातील वाढते गैरप्रकार, हे सृजनशील समाजाकरिता निश्‍चित सुलक्षण नाही!
हेमंत पुरुषोत्तम कद्रे
९४२२२१५३४३