सोनू, तुझा बीएमसीवर भरवसा नाय का?

0
23

वाचकपत्रे
‘सोनू, तुझा बीएमसीवर भरवसा नाय का?’ या आरजे मलिष्काच्या गाण्याने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. आता या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट संपूर्ण राज्यातच नव्हे, तर देशातही लोकप्रिय झाला आहे. या गाण्यात विशेषकरून मुंबईच्या रस्त्यावरील खड्‌डे, ट्राफिक जाम, अस्वच्छता व त्यातील झोल याची खिल्ली उडवण्यात आली होती. खरेतर ही टीका जिव्हारी लागण्याएवढी नव्हती. पण, ही टीका शिवसेनेला चांगलीच जिव्हारी लागली, असे दिसते.
याकरिता महापालिकेच्या अधिकार्‍यांनी- बीएमसीच्या अधिकार्‍यांनी लगोलग मलिष्काच्या घराची तपासणी करून मनिप्लाण्टच्या पाण्यात डेंग्यूच्या आळ्या सापडल्यामुळे मलिष्काला नोटीस पाठविली आहे. या घटनेची अत्यंत तिखट प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्याने शिवसेनेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
खड्‌ड्यांची दुरुस्ती करण्याऐवजी मलिष्काच्या गाण्यावर तातडीने कारवाई करणार्‍या शिवसेना नेत्यांचे कार्य लज्जास्पद आहे, असे वाटते. आता तर मलिष्काच्या समर्थनार्थ मुंबईतील हजारो जणांनी गाणे बनवून ते सोशल मीडियावर टाकल्याने शिवसेनेची मोठीच पंचाईत झाली आहे. शिवसेनेने आतातरी सकारात्मकदृष्ट्या दखल घ्यावी.
मधुकर चुटे
९४२०५६६४०४

यशोदामातेची जन्मशताब्दी
यंदा सानेगुरुजींच्या आईची जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्ताने तरी अखिल आई मंडळाने काही बोध घेऊन मुलांवर संस्कार केले, तरच यशोदामाईंच्या जन्मशताब्दीचे सार्थक घडेल अन्यथा ‘श्यामची आई’ या चित्रपटातील आणि त्यांच्या या पुस्तकातील ‘आई’ फक्त पुस्तकातच राहील! मुलांवर संस्कार करणारी आई सध्याच्या युगात नवीन जमाना या नावाखाली माय, आई, मम्मी ते मॉम असा प्रवास करते आहे. तिला तिच्या श्यामशी बोलायलासुद्धा वेळ नसतो! कारण श्याम पळणाघरात वाढतो आणि इंग्रजी माध्यमात शिकतो. केवळ आधुनिक पोशाख करून यशोदामाईने सानेगुरुजींच्या यशोदामातेविषयी भाषणे करून आणि अनेक पुस्तके प्रकाशित करून चालणार नाही, तर आपल्या मुलांवर उत्तम संस्कार घडवावेत, हीच या निमित्ताने श्रद्धांजली ठरेल!
अमोल करकरे
पनवेल

गवताच्या जागी उगवले चिनी सैन्य!
गुरुवार २० जुलैच्या तभाच्या संपादकीयात नेहरूंच्या परराष्ट्र नीतीचे यथार्थ वर्णन केले आहे. तिबेट आणि देशाच्या सीमांबाबत नेहरूंच्या कचखाऊ भूमिकेमुळेच आज भारतावर हे संकट आले आहे, याचाही ऊहापोह संपादकीयात आहे. नेहरूंनी, तिबेट आणि लगतच्या परिसरात गवताचे पातेदेखील उगवत नाही, असे संतापजनक विधान भर संसदेत केले होते. नेहरूंच्या या विधानावर विरोधी खासदार जगन्नाथराव जोशी असे म्हणाले होते, ‘‘माझ्या डोक्यावर तर एकही केस उगवत नाही. मग उडवाना माझे डोके!’’ आजच्या नव्या पिढीला नेहरूंचा कमकुवतपणा आणि जगन्नाथराव जोशी यांचा बाणेदारपणा, राष्ट्राभिमान कळावा म्हणून हे पत्र!
सुधाकर अजंटीवाले
०७१५२-२४३८०६

जाणता राजा, की फुसक्या साप?
थोरल्या शिवछत्रपतींची महत्ता एवढी की, सह्याद्रीच काय, महाराष्ट्रातल्या कोणत्याही दगडधोंड्यांनी, महाराजांच्या वीरश्रीची गाथा ऐकलीतरी मुडदेसुद्धा जिवंत होतील! त्यावर जाणत्या राजाने नुकतेच एक भाष्य केले. पुण्यात श्रीमंत कोकाटे नावाच्या एका गृहस्थाने लिहिलेले पुस्तक त्यांना संशोधनरूपी धन वाटले. हाच तर जाणत्या राजाचा स्वभाव आहे. अशाच हीणकस मार्गाचा वापर करून, एक एक बळी घेत राजकारणाची वरची पायरी गाठली. राजकारण करताना ते केव्हा खालच्या पातळीवर उतरतील, याचा भरवसा राहिलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब एकदा म्हणाले होते, या माणसापासून सावध राहा. आमच्या येथे प्रज्ञाचक्षू गुलाबबाबांचा आश्रम आहे. जाणत्या राजाने शेवटची वर्षे जर तेथे घालविली तर हा नरदेह सार्थकी लागल्याचे समाधान तरी लाभेल.
मोतीराम बाबुराव पाटील
चांदूर रेल्वे

नितीशकुमारांचा लालूंना दणका!
लालू ऍण्ड कंपनीच्या भ्रष्टाचारामुळे बिहारचे मुख्यमंत्री अतिशय वैतागले होते. यामुळे त्यांच्या निष्कलंक चारित्र्यावर शिंतोडे उडायला लागले होते. अखेर त्यांनी लालूंना दणका देण्याचे ठरविले व जुना सहकारी भाजपासोबत युती केली. आता लालू आणि त्यांचे पुत्र तेजस्वी कितीही अकांडतांडव करीत असले, तरी त्याला काही अर्थ नाही. या भ्रष्टाचारात लालूच नव्हे, तर त्यांचे सर्व कुटुंबीय अडकले आहे. त्यांच्यावर आयकर आणि ईडीच्या धाडी घातल्या जात आहेत. लालूंचे आता काही खरे नाही, हेच यातून दिसून येते.
प्रकाश वाढवे
नागपूर