निरर्थक वाद!

0
55

वेध
नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणात, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांचा ऊहापोह करून, त्या त्या मुद्यांबद्दलची त्यांची चिंता जाहीर केली. हे मुद्दे उपस्थित करीत असताना, त्यांनी राष्ट्रनिर्माणात समाजाच्या प्रत्येक स्तरातील व्यक्तीच्या असलेल्या महत्त्वावरही प्रकाश टाकला. भाषणादरम्यान त्यांनी, त्यांना आदरणीय वाटणार्‍या काही नेत्यांची नावेही घेतली. पण, त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेण्याचे टाळले आणि दुसरे राष्ट्रपतींनी महात्मा गांधी यांच्यासोबत पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव घेऊन दोघांची तुलना का केली, असा आरोप करून कॉंग्रेसच्या सदस्यांनी राज्यसभेत निरर्थक गोंधळ घातला. हा नेहरूंचा आणि गांधीजींचा अपमान आहे, असा शोध त्यांनी लावला. आपल्या संबोधनात कुणाचा उल्लेख करायचा आणि कुणाचा नाही, कोणत्या मुद्यांवर भर द्यायचा आणि कुठले टाळायचे, हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अधिकाराचा भाग आहे. महात्मा गांधीजींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे, यात शंका नाही. पण दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानववादाचा आदर्श संपूर्ण देशाला दिला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी इस देश मे दो विधान, दो प्रधान, दो निशान नही रहेंगे म्हणून काश्मीरच्या विशेष दर्जाला कडाडून विरोध केला होता. दीनदयाल उपाध्याय हे मुखर्जी यांचे निकटचे सहकारी होते. त्यांचे योगदान स्वातंत्र्योत्तर काळात नेहमी मार्गदर्शक आहे. राष्ट्रपतींनी नेहरूंचे नाव घेतले नाही म्हणून, त्यांचे स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाच्या उभारणीतील योगदान दुर्लक्षित होणार आहे का? कॉंग्रेसने वर्षानुवर्षे या देशावर राज्य केले. त्यांच्या कार्यकाळात देशाने अनेक पंतप्रधान पाहिले. या पक्षाच्या कार्यकाळात देशात ज्या कुठल्या नैसर्गिक आपत्ती उद्भवल्या, त्या त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कधी पूरग्रस्तांच्या, तर कधी भूकंपग्रस्तांच्या मदतीला धावून गेले, हा इतिहास आहे. त्यामुळेच तर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात स्वयंसेवकांना गणवेशात संचलन करण्याची परवानगी स्वत: नेहरूंनी दिली होती, हे कॉंग्रेसजन विसरले का? पूर्वीचा जनसंघ असो की, आताचा भारतीय जनता पक्ष या पक्षांनी नेहमी प्रखर राष्ट्रप्रेमाचा उत्कट आदर्श देशासमोर ठेवला आहे. तेव्हा आपल्या नेत्यांचे गुणगान जरूर करा पण अन्य विचारांचाही आदर करण्यास शिकले पाहिजे.
अहमद पटेल चिंतेत
ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना राज्यसभेच्या निवडणुकीत खिंडीत गाठण्याची भारतीय जनता पार्टीची योजना यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. गुजरातच्या भडौच जिल्ह्यातून आलेल्या अहमद पटेल यांनी आजवर सात वेळा संसदेचे प्रतिनिधित्व केले आहे. तीन वेळा ते लोकसभेवर, तर चार वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सध्या त्यांनी पाचव्यांदा राज्यसभेवर जाण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २००४ आणि २००९ मध्ये कॉंग्रेस पक्षाला मिळालेल्या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भारतीय जनता पक्षाने ऐन वेळी कॉंग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत आलेल्या बलवंतसिंह राजपूत यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन, पटेल यांची विजयाची समीकरणे बिघडवून टाकली आहेत. गुजरातमधील राज्यसभेच्या ३ रिक्त जागांसाठी ८ ऑगस्टला निवडणूक होत आहे. संख्याबळाकडे नजर टाकली, तर भारतीय जनता पार्टीचे २ उमेदवार सहज निवडून येण्याची स्थिती आहे. त्यासाठी पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व स्मृती इराणी यांना उमेदवारी घोषित केली आहे. गुरातमध्ये राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ४७ मतांची गरज असते. भारतीय जनता पार्टीजवळ १२५ आमदार आहेत. कॉंग्रेसजवळ ५७ आमदार आहेत, त्यामुळे त्यांना अहमद पटेल यांना राज्यसभेवर पाठविणे सहज शक्य आहे. भारतीय जनता पार्टीला त्यांचा तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी विरोधकांची १६ मते मिळविण्याची गरज आहे. बलवंतसिंह राजपूत यांच्यासह ३ आमदारांनी कालच कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने, राज्य विधानसभेतील कॉंग्रेसचे संख्याबळ घटून ५४ झाले आहे. दरम्यान, आज सकाळी कॉंग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामे दिल्याची खबर आहे. त्यामुळे पक्षाचे संख्याबळ घटून ५२ वर आले आहे. गेल्याच आठवड्यात कॉंग्रेसने शंकरसिंह वाघेला यांची हकालपट्‌टी केल्याने तेदेखील पक्षासोबत नाहीत. वाघेलांनी आयोजित केलेल्या जाहीर सभेला त्यांच्या ११ समर्थक आमदारांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे ही मंडळीदेखील अहमद पटेल यांच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता कमीच आहे. जदयुचे बिहारमध्ये दोन आमदार आहेत. पण, बिहारमध्ये झालेल्या ताज्या घडामोडींनंतर गुजरामधील हे २ आमदार कॉंग्रेससोबत जातील, असे ठामपणे सांगता येत नाही. एकंदरीत, अहमद पटेल यांचे जहाज हेलकावे खाऊ लागले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. विशेष म्हणजे भारजपाचे तिसरे उमेदवार बलवंतसिंह राजपूत हे राज्य विधानसभेतील कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद होते. त्यामुळे ते आपल्या विजयासाठी कॉंग्रेसची काही मते खेचून आणू शकतात.
या घडामोडींमुळे कॉंग्रेसच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. विधानसभेच्या पुढच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा टिकाव लागणे अशक्य आहे, हे ध्यानात आल्यानेच कॉंग्रेसला गळती लागली आहे. या गळतीमुळे अहमद पटेल यांची चिंता वाढली नसती तरच नवल…
चारुदत्त कहू
९९२२९४६७७४