नक्षल्यांविरुद्ध लढलेल्या शहीदांच्या स्वकीयांच्या भावनांची उकल…

0
64

चौफेर
आता नक्षलवाद्यांचे नावही कुणी काढलं ना की, धमण्यांतले रक्त सळसळायला लागते. हाताच्या मुठी नकळत आवळल्या जातात. न्यायाच्या नावाखाली चाललेला तो धिंगाणा थांबला पाहिजे, असं मनोमन वाटून जातं. आमचीच पोलिस ठाणी लुटून शस्त्रं जमा करायची अन् त्याच शस्त्रांचा वापर करून आमच्याच पोलिसांचा जीव घ्यायचा… अजून किती दिवस चालणार हा तमाशा? त्यांच्याशी लढताना शहीद झालेल्या नवर्‍याच्या, हार घातलेल्या तसबिरीसमोर उभं राहताना मनात जागणार्‍या आठवणींनी त्या संतापाची धार अधिकच तीव्र होते. पापण्यांच्या आडून अश्रूंचा लपंडाव सुरू होतो. घरातला कर्ता पुरुष गमावल्याच्या दु:खाने आपण पुरते खचून गेलो असल्याचे वास्तव धगधगते असले, तरी अजून लहान असलेल्या मुलांसमोर आपल्या वेदनांचे प्रदर्शन नको म्हणून पापण्यांच्या ओलावलेल्या कडांना आपसूकच पदर लागतो अन् सारे बळ एकवटून  ‘ती’ धैर्याने कामाला लागते…
लहानपणीच वडिलांची छत्रछाया गमावून बसलेली प्रिया म्हणते, त्यांच्या प्रेमाला पारखं होण्याची सल तर अजूनही मनात आहे. पण, नक्षल्यांशी लढताना वीरमरण आल्यानंतर तिरंग्यात विसावलेले बाबांचे पार्थिव बघितले तेव्हा मन सैरभैर झालं होतं. काहीच सुचत नव्हतं. अश्रूंच्या धारा, प्रयत्न केलातरी थांबत नव्हत्या. पण, राष्ट्रध्वजाने झाकलेल्या शहीदांना दिली जात असलेली ती सलामी बघितली, तो मान बघितला अन् ऊर भरून आला. भरमसाट पैसा गाठीशी असलेल्यांच्या वाट्यालाही न येणारा सन्मान, शहीद झालेल्या माझ्या बाबांच्या वाट्याला आला होता… नंतर सरकारी मदतही दाराशी आली. बाबांच्या जाण्याने निराधार झालेल्या कुटुंबाच्या, किमान गरजा पूर्ण होतील याची तजवीज त्यातून झाली. पण बाबांची उणीव? कितीही पैसा ओतला तरी ती कशी भरून निघेल? पण, एक मात्र खरंच. पोलिस विभागात एका साध्या शिपायाच्या रूपात वावरलेले बाबा आम्हाला खूप काही शिकवून गेले. जगायचं कसं ते अन् मरायचं कसं तेही…
नोकरीवर रुजू होऊन तसा खूप काळ मागे पडला नव्हता. एटापल्ली तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात नक्षलवाद्यांनी डेरा टाकला असल्याची खबर मिळाली होती. क्षणाचाही विलंब न लावता, रोशनकुमार आणि त्यांच्या सहकार्‍यांची टीम सज्ज झाली. फारतर आठ-दहा घरांचे ते ‘गाव.’ दूरवर धानाची शेतं विखुरलेली. त्या रात्रीचं म्हणाल, तर पाऊस धो धो बरसत होता. पावसाची सोबत अन् काळ्याकुट्‌ट अंधाराच्या साक्षीनं लढलेली लढाई पोलिसांनी जिंकली होती. पोलिस विभागाच्या सेवेतलं पहिलंच बक्षीस पदरी पडलं होतं. कधीमधी रस्त्यानं जाताना शाळकरी पोरांनी गमतीनं सॅल्यूट ठोकला, तरी जंगलातल्या प्रतिकूल परिस्थितीत चाललेल्या संघर्षाचा क्षणभर विसर पडून चेहर्‍यावर नकळत स्मित उमटायचं. तसं म्हटलं तर रोशनकुमारचं व्यक्तिमत्त्वच निराळं होतं. सर्वांनाच हवंहवंसं वाटणारं. लोभसवाणं. कुणाच्याही मदतीला तत्परतेनं धावून जाणारं. लग्न झालं. कालौघात संसारवेलीवर एक छानसं फूल उगवलं. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच असावं बहुदा… नक्षल्यांविरुद्धच्या एका अभियानासाठी एक कुमक चामोर्शीच्या दिशेनं निघाली होती. परतीचं आश्‍वासन देऊनच प्रत्येक जण घराबाहेर पडला होता. पण, नक्षल्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात या ताफ्यातील एका वाहनाच्या पाऽऽर चिंधड्या उडाल्या… अर्थात, त्यात बसलेल्या रोशनकुमारच्या शरीराच्या अन् त्याच्या स्वप्नांच्याही… भातुकलीच्या खेळामधला ‘राजा’ डाव अर्ध्यावर मोडून निघून गेला होता…
चार वर्षांपूर्वीची गोष्ट. दिवस गुढीपाडव्याचा. आज स्वरूपकुमारचा उत्साह काही औरच होता. दाराला तोरणं लावण्यापासून तर आईला स्वयंपाकात मदत करण्यापर्यंत, कशी धावपळ चालली होती त्याची! उद्यापासून चार दिवसांकरिता एका मोहिमेवर जायचं. तिथनं परतलो की एक ट्रेनिंग. पण, त्यापूर्वी घरात एक चारचाकी आणायची… त्याच्या मनातल्या भविष्यातल्या योजनांचा जणू पाऊस बरसत होता. खरं तर यापूर्वीही त्यानं त्या अनेकदा बोलून दाखवल्या होत्या. पण, आज त्याची उजळणी करताना त्याचा उत्साह मात्र जणू सारंकाही तो पहिल्यांदाच सांगत असल्याच्या थाटातला होता. ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी तो मोहिमेवर रवाना झाला. अद्याप चोवीस तासही मागे पडायचे होते, तर बातमी येऊन धडकली… गुड्‌डू गेल्याची. हिक्केरच्या जंगलात झडलेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पोलिस दलाने गमावलेल्या वीर जवानांच्या यादीत गुड्‌डूपण होता. उराशी बाळगलेली स्वप्नं तशीच राहिली होती. अधुरी. पोराच्या पार्थिवावरचे अंत्यसंस्कार बघताना पोरकं होण्याची वेळ इथे आईवरच आली होती…
‘शहादत’ची महती कोण नाकारेल? प्राणांवर उदार होऊन देशासाठी लढले तर ‘ते’, पण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून समाजात आमच्यासाठी व्यक्त होणारा आदर वर्णनातीतच. पण, त्यानं जगण्याची विवंचना थोडीच संपते. भावनिक प्रश्‍न सुटत नाही ते नाहीतच. एकत्र कुटुंबात नात्यागोत्यातली, आपल्या वडिलांच्या दिशेनं धाव घेणारी पोरं बघितली की, आपल्या मुलांच्या पोरकेपणाची जाणीव अधिकच तीव्रतेनं होते. प्रेमात दंग असलेलेच कशाला, अगदी रस्त्यानं सोबतीने जाणारे जोडीदार बघितले, तरी आपल्या जीवनातली त्याची उणीव जाणवण्याइतपत ठळक होऊन जाते. रात्री उशिरा घरी परतल्यावर झोपेत हात चुकूनही कपाळावर दिसला, तरी ‘‘तब्येत बरी नाही का?’’, असं काळजीनं विचारणारं हक्काचं माणूस आपण गमावलं असल्याची सल, जाता जात नाही…
….या सगळ्या भावना आहेत, महाराष्ट्राच्या एका टोकावर वसलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबातील सदस्यांच्या. समाजाच्या रक्षणासाठी जिवावर उदार होत नक्षलवाद्यांशी लढताना मरण पत्करणार्‍यांचा आदर राखला जात असला, तरी त्यांच्या माघारी त्यांचे कुटुंबीय कसे जगत असतील? त्यांना कुठनं मिळत असेल संघर्षासाठीचे बळ? घरचा कर्ता माणूस गमावल्याच्या वेदना सतत उराशी बाळगून वावरणं इतकं का सोपं असतं? अशा, अस्वस्थ करणार्‍या कित्येक प्रश्‍नांच्या उत्तराच्या शोधात निघालेल्या काही धडपड्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून, गेल्या किमान चार वर्षांपासून इथे वेगवेगळे उपक्रम राबवले जाताहेत. म्हणायला उपक्रम तसे छोटे आहेत, पण त्यांच्या परिणामांची व्याप्ती मात्र मोठी आहे. कुठे नक्षलपीडितांच्या मुलांना सायकलींचे वाटप, तर कुठे अंधारातल्या शाळांना सोलार लाईट उपलब्ध करून देणे, कुठे ओसाड पडलेली वाचनालये पुस्तकांनी सजवण्याचा, तर कुठे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. बल्लारपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार आणि पुण्यातील आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांच्या पुढाकारातून हे उपक्रम राबविले जात असतानाच, शहीदांच्या कुटुंबीयांची मनं जाणून घेण्याचा प्रयत्न एका निबंध स्पर्धेच्या माध्यमातून झाला. सुमारे पस्तीस शहीद वीरांच्या कुटुंबीयांनी त्या स्पर्धेत भाग घेत आपल्या भावना शब्दबद्ध केल्या. कुठे पेटून उठायला लावणारा संताप, तर कुठे डोळ्यांतून झरकन् पाणी पडेल अशा ओलावलेल्या भावना. कुठे, बजावलेल्या कर्तबगारीचा सार्थ अभिमान, तर कुठे आयुष्याचा दुवाच हरवल्याची खंत… अशी भावभावनांची सरमिसळ या स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त झालेली. श्रीनिवास सुंचुवार यांच्या पुढाकारातून या भावनांचं संकलन एका पुस्तकाच्या माध्यमातून लवकरच होत आहे. नागपूरच्या समाजसेविका डॉ. संध्या पवार या पुस्तकाचं संपादन करताहेत. श्रीनिवास सुंचुवार यांच्या पुढाकारातून या पूर्वी, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कारागृहातल्या कैद्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धेतून ‘कारागृह : एक वेगळे विश्‍व’ हे पुस्तक साकारले होते. यंदा त्यांच्या अभिनव उपक्रमाला शहीदांच्या कुटुंबीयांच्या भावनांचा आधार लाभला आहे…
सुनील कुहीकर