अक्साई चीन ते बोफोर्स : नेहरू वंशाचा देशाच्या सुरक्षेशी खेळ

0
69

अन्वयार्थ 
लोकांची स्मरणशक्ती अतिशय कमकुवत असते. आमच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले असे आज जे कॉंग्रेसवाले सांगत आहेत त्यांना हे सांगितलेच पाहिजे की आज देशाची फाळणी झाली ती केवळ कॉंग्रेसमुळेच आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्यासारख्या क्रांतिकारकांमुळे. मात्र, कॉंग्रेसच्या लेखी या क्रांतिकारकांची किंमत शून्य होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी खंडित आणि निर्दोष भारतीयांच्या रक्ताने सिंचित भारत अजून सावरलादेखील नसताना सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने हल्ला केला आणि नंतर चीनने अक्साई चीन हडप केला. नेहरूंमुळेच भारताने १.२५ लाख वर्ग किमी.ची भूमी पाकिस्तान व चीनने बळकावली.    आज या घटनेला सत्तर वर्षे उलटून गेली आहेत पण, आश्‍चर्याची गोष्ट ही की, नेहरूवंशीय कॉंग्रेसला आजपर्यंत कुणीही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केलेले नाही. स्वतंत्र भारताची सव्वालाख वर्ग किमी जमीन तुमच्या पक्षामुळे चीन आणि पाकिस्तानने बळकावली त्यासंदर्भात तुम्ही (कॉंग्रेसने) किती प्रस्ताव पारित केले, किती निवडणूक जाहीरनाम्यात ती भूमी परत मिळविण्याचा संकल्प व्यक्त केला, असा थेट सवाल त्यांना कुणीच विचारला नाही. जेव्हा कॉंग्रेस नेते चीनच्या दौर्‍यावर गेले तेव्हा त्यांनी चिनी नेत्यांशी चर्चा करून त्यांच्याकडे भारताच्या या भूमीबद्दल चर्चा केली काय, असा सवालही या कॉंग्रेसी नेत्यांना कुणी विचारला नाही. केवळ अटलबिहारी वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत सीमावादावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली. नाहीतर कॉंग्रेसने तर हा मुद्दा केव्हाच गुंडाळून ठेवला होता.
देशात कॉंग्रेसची सत्ता असताना आणि पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान असताना भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा श्रीनगर येथे अतिशय रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. या विषयावर लोकसभेत चर्चा करताना अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहरू-शेख अब्दुल्ला अभद्र युतीमुळे झालेली ही ‘हत्या’ असल्याचे नमूद केले होते. नेहरूंच्या कारकीर्दीत संसदेत झालेल्या सर्व चर्चांत आणि भाषणात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूचा उल्लेख सदैव ‘हत्या’ याच शब्दात करण्यात आला, हे लक्षात घेतले पाहिजे.
नेहरूंच्या चीनशी असलेल्या ‘मायावी मैत्री’ची भारताला फार मोठी किंमत चुकवावी लागली. १९४८ मध्येच भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळत होते. मात्र, कम्युनिस्ट चीनशी मैत्री करण्याच्या अट्टाहासापायी पं. नेहरू यांनी केवळ राष्ट्रसंघाचे सदस्यत्व भारताला मिळण्याच्या हेतूने चीनला पाठिंबा दिला. नेहरूंच्या या पाठिंब्यामुळेच सुरक्षा परिषदेत चीनला स्थायी सदस्यत्व प्राप्त होऊ शकले. अशा ‘पंचशील मैत्री’च्या दाट छायेत चीनचे पंतप्रधान चौ एन लाय केवळ वर्षभरात तब्बल सहा वेळा आले आणि लाल किल्ल्यात त्यांचा सार्वजनिक सत्कार-अभिनंदन करण्यात आले आणि याचा पुढे काय परिणाम झाला? १९६२ चे युद्ध.  भारताची तयारी अशी की, भयंकर थंडीत टिकाव धरू शकतील असे जोडे व कपडेही  जवानांजवळ नव्हते. तसेच आधुनिक शस्त्रेही नव्हती. जनरल कौल आणि पंडित नेहरूंच्या अव्यवहारी धोरणामुळे नेफा आणि लडाखवर चीनने आपला फास आवळला आणि हताश, पराभूत मानसिकतेतून नेहरूंनी आकाशवाणीवरून आसामच्या तेजपूर निवासींना निरोप दिला होता. या युद्धात भारतीय सैनिक जिंकले. मेजर शैतान सिंह यांनी अभूतपूर्व शौर्य गाजविले. रायफलमॅन जसबतसिंह रावत यांनीही अफाट पराक्रम केला. या वीरांच्या रक्ताने लिहिलेली ही गौरवगाथा आहे. हरले, पराभूत झाले ते दिल्लीचे राजकीय नेतृत्व.
स्वतंत्र भारतातील पहिला भ्रष्टाचार जीप घोटाळा नावाने कुख्यात आहे. पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले होते. भारतीय सेनेजवळ जीप नव्हत्या. कितीही किंमत चुकवावी लागली तरी ताबडतोब जीप खरेदी करण्याचा आदेश देण्यात आला होता. तेव्हा टी. टी. कृष्णाम्माचारी लंडन येथे भारतीय उच्चायुक्त होते. अखेर विली मार्का जीप खरेदी करण्यात आल्या. विशेष म्हणजे युद्ध समाप्त झाल्यानंतर अठरा महिन्यांनी या जीप लष्कराला प्राप्त झाल्या. या भ्रष्टाचारामुळे संसदेतील वातावरण अक्षरश: ढवळून निघाले होते. हीदेखील नेहरूंचीच देण आहे.
हिंदू मन, हिंदू मानसिकता आणि हिंदू जीवनपद्धतीविषयी त्यांच्या मनात एवढा द्वेष, एवढा तिरस्कार होता की नेहरूवाद वस्तुत: अहिंदुवादात परिवर्तित झाला. तत्कालीन मीडियावर नेहरूंची एवढी जबरदस्त एकाधिकारशाही होती की नेहरू समर्थक किंवा त्यांना अनुकूल असलेल्या विचारांशिवाय अन्य दुसरे लेख, बातम्या छापल्याही जात नव्हत्या आणि याच कारणामुळे रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी देशातील विविध भाषेत राष्ट्रवादी विचारांना प्राधान्य देणार्‍या पत्र-पत्रिकांचे प्रकाशन करण्यास चालना दिली. यासाठी पुढाकारही घेतला. तत्कालीन कम्युनिस्ट आणि स्टॅलिनवादी विचारसरणीविरुद्ध आणि नेहरूंच्या वैचारिक एकाधिकारशाहीविरुद्ध पांचजन्य, ऑर्गनायझर, स्वदेश, राष्ट्रधर्म, साधना, केसरी, जन्मभूमी, राष्ट्रदीप, स्वस्तिका, जागृती, विक्रम इत्यादींचे प्रकाशन भारतीय मुक्तविचार परंपरेचा शंखनादच होता, ही वस्तुस्थिती आहे. नेहरू कधीच ‘लिबरल’ विचारवंत नव्हते, तर भिन्न विचार बाळगणार्‍यांविषयी ते कमालीचे असहिष्णू शासक होते. असहिष्णुतेचा हा अहंकार कॉंग्रेसच्या राजकारणात प्रत्येक पावलावर दिसला. ज्या पुढार्‍यांना राष्ट्रीय मान्यता होती अथवा जे लोकप्रिय नेते होते, ज्यांना जनमानसात खरोखरीच स्थान होते अशा नेत्यांना कॉंग्रेसने कधीच आपल्या मुख्य प्रवाहाचे अंग मानले नाही.
प्रखर राष्ट्रवाद, देशभक्ती आणि मातृभूमीवरील अलोट प्रेमामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पुरुषोत्तमदास टंडन, डॉ. संपूर्णानंद, क. मा. मुन्शी, लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या अनेक नेत्यांना अफाट लोकप्रियता मिळाली व जनतेकडून मानसन्मानही प्राप्त झाला. मात्र, नेहरूवंशीय कॉंग्रेसी नेतृत्वाने या महान व्यक्तींचे कर्तृत्व नाकारले. त्यांना कधीच नेहरू-गांधींच्या घराणेशाहीच्या नेतृत्वाच्या समकक्ष मानसन्मान दिला नाही.
नेहरू-गांधी वंशाच्या नेतृत्वाने भारताची भूमीच केवळ गमवली असे नसून भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप दिले. जीप घोटाळा, मुंघडा घोटाळा, विमा घोटाळा, नगरवाला कांड, ललित नारायण मिश्रा हत्याकांड, काश्मीर समस्येची उत्पत्ती, घटनेचे ३७० कलम लागू करणे, जम्मू-काश्मीरला दुसर्‍या, स्वतंत्र ध्वजाची परवानगी, विदेशी धन आणि विचारसरणीवर पोसलेल्या कम्युनिस्टांशी मैत्री आणि देशभक्त रा. स्व. संघावर बंदी, आणिबाणी लादून अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी आणि लोकशाहीचे रक्षण करणार्‍यांवर अमानुष अत्याचार, बोफोर्स घोटाळा, पाणबुडी घोटाळा, अंतराळ कंपन्या घोटाळा, कोळसा खाणींचा भयानक घोटाळा, २जी, ३जी घोटाळा… ही यादी न संपणारी आहे. केवळ आणि केवळ नेहरू-गांधी वंशजांच्या सत्तासुखासाठी देशावर करण्यात आलेले हे आघात आहेत.
या देशाचे बाह्य राजकीय अंग भलेही सेक्युलर राजकारणाचे असेल. मात्र, भारताचे मन शुद्ध, प्रबुद्ध हिंदू आहे. कॉंग्रेसने या हिंदू मनावरच प्रहार केले आहेत. समस्त शासकीय कामकाज, प्रथा-परंपरा, शिष्टाचाराच्या पद्धती आणि शिक्षणप्रणाली पाश्‍चिमात्यांच्या अंकित करून ठेवली. पाश्‍चात्त्यांची मानसिक गुलामगिरी स्वीकारली आणि या हिंदुबहुल देशात हिंदू जीवनपद्धती आणि श्रद्धा-प्रतीकांची चर्चा गुन्हा ठरविण्यात आला.
हिंदूंच्या सहिष्णू वृत्तीमुळे आणि औदार्यामुळे विदेशी मूळ असलेली एक ख्रिश्‍चन व्यक्ती सत्ताशिखरावर आरूढ होऊ शकली. अन्य कुठल्या देशात तर या गोष्टीची कल्पनाही करता आली नसती. एवढे सगळे असूनही हिंदू जीवनपद्धती आणि हिंदू धर्मावलंबीयांविषयी नेहरू वंशीय कॉंग्रेसने नेहमीच तुच्छतेने आणि तिरस्काराच्या दृष्टीनेच पाहिले. जेथे जेथे राष्ट्रवादाचा हुंकार उठला आणि प्रबळ राष्ट्रीयतेची भावना प्रज्वलित झाली तेथे नेहरूप्रणीत कॉंग्रेसला पराभूत होऊन सत्ता गमवावी लागली आहे. ही राष्ट्रवादाची भावना जेथे जेथे बळकट होऊन प्रगटते तेथे तीच कॉंग्रेसचे भवितव्य ठरवते. यामुळेच ‘‘तेरे लब पे है इराकी शामो मिस्त्रो रोमों चीं (चीन), लेकिन अपने ही वतन के नाम से वाकिफ नही’’ असे एका शायरने लिहिले आहे.
– तरुण विजय