आम्ही कोण म्हणुनी काय पुसता?

0
90

अग्रलेख
बालकवींची ही एक छानपैकी कविता होती. आता कविता अन् छानपैकी हे कॉम्बिनेशन बर्‍यापैकी हरविले आहे. रिमिक्स गाण्यासारख्या कविताही शब्दांचे गिमिक्स खेळून तयार होऊ लागल्या आहेत. बरे चार-दोन कविता पाडल्या की त्या वर्तमानपत्रांकडे प्रकाशित करण्यासाठी पाठविल्या जातात. वर्तमानपत्रांच्या साहित्यविषयक पुरविण्यांत त्या यथावकाश प्रकाशितही होतातच. हमखास होतात. अशा चार-दोन कविता चार-दोन वर्तमानपत्रांत प्रकाशित झाल्या की त्या सोळा होतात. मग हा कवी किंवा कवयित्री चर्चेतील कवडे होतात. असे वर्षभर चालते. मधल्या काळात दिवाळी येते. बक्कळ दिवाळी अंक निघतात अन् त्यांना पुष्कळ कविता आवश्यक असतात. त्यात मग या चर्चेतल्या कवड्यांच्या कविता छापून येतात. मग यांना कुणीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची ‘प्रेरणा’ वगैरे देते. जुळवाजुळव होते. गावगल्ली प्रकाशक असतात किंवा मग आपल्याच पत्नीच्या किंवा आईच्या, मुलीच्या नावाने प्रकाशन संस्था विकसित करून काव्यसंग्रह प्रकाशित केला जातो. हे फार म्हणजे फारच महान कार्य असल्याने त्या काव्यसंग्रहाचे ‘लोकार्पण’ केले जाते. खासा समारंभ होतो. ‘आपले’ पाहुणे बोलावले जातात अन् ते कवयित्री असेल तर तिला एकदम शांताबाईंच्या पंगतीला नेऊन बसवितात अन् कवी असेल तर कुसुमाग्रजांनंतर मराठी कवितेला लाभलेलं हे अस्मानी देणं आहे, असं काहीतरी बोलतात. मग या कवितासंग्रहावर कुठे कुठे ओळखीने काय काय छापून येतं. ‘माझ्या वडिलांच्या नावाने तुला अन् तुझ्या वडिलांच्या नावाने मला’ अशा छापाचे काही पुरस्कारही या काव्यसंग्रहांना मिळतात… मराठी वाङ्‌मयात मोलाची भर पडलेली असते. महात्मा गांधी म्हणाले होते, पुस्तकांच्या प्रकाशनासाठी सेन्सॉरशिप असायला हवी. त्याचे कारण मग लक्षात येते. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा सारेचजण आपापल्या पद्धतीने अर्थ लावत असल्याने असे सारेच कसे सुखनैव सुरू असते… तर एका बालकवींच्या कवितेवर बोलताना उगाच माणूस समकालीन वास्तवावर उतरला आणि भरकटला. अर्थात असे भरकटण्याचेही आम्हाला स्वातंत्र्य आहे. तर या स्वातंत्र्याचा उपभोग घेत, अत्र्यांनी या कवितेचे विडंबन केले होते. त्यांच्या ‘झेंडूची फुले’ नामक काव्यसंग्रहात या विडंबन कविता होत्या. ‘आम्ही कोण म्हणुनी काय पुसता दाताड वेंगाडुनी…’ अशी ती कविता होती. आताच हे आठवण्याचे असे काही वेगळे कारण नाही. ही कविता अन् त्याचा भावार्थ सतत आठवण करून देणारे वातावरण आताशा रोजच असते. देशाला स्वातंत्र्य मिळाले. खरेतर ते मिळविले. ते नेमके कशासाठी हवे होते, असा सवाल आता पडला आहे. कारण हे स्वातंत्र्य देशाला मिळालेले होते की व्यक्तीला, असाही प्रश्‍न आहे. देश म्हणजेच व्यक्ती ना? व्यक्ती-व्यक्ती मिळूनच देश होतो की नाही, असा प्रश्‍न प्रत्युत्तरादाखल केला जाऊ शकतो. तेही अगदी खरेच आहे. पण हे स्वातंत्र्य व्यक्तीचे की समूहाचे? म्हणजे ते सामूहिक रीत्या उपभोगायचे की माझे मी अन् तुझे तू असे करायचे? कारण तसे केले तर मी माझे स्वातंत्र्य उपभोगत असताना दुसर्‍यांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही का? अनेक भांडी एकाच खोलीत जमिनीवर ठेवली असली अन् ती हलू लागली की ती एकमेकांना भिडणारच अन् मग त्यातून आवाज निर्माण होणार. विविध प्रकारची भांडी आपापल्या पद्धतीने म्हणजेच स्वातंत्र्याने हलणार अन् त्या विविधतेतून एकतेचा एकच सूर निघेल, अशी अपेक्षा आपण कशी काय ठेवणार? आता, ‘दिल के तसल्ली के लिए गुड की जलेबी’ म्हणत आपण या विसंवादी आवाजांना आमच्या देशाचा काय सुसंवादी ध्वनी आहे, विविधतेत बघा किती एकता आहे, असे म्हणत राहणार. आमचेच खरे, असे सार्‍यांनाच वाटत राहणार. मग कुणाचे तरी एकाचे म्हणणे लादले की एकच सूर निघेल, असाही हट्टाग्रही युक्तिवाद होणार. असे झाले की सार्‍याच भांड्यांना वाटणार की, आमचेच ऐकायला हवे. बहुसंख्येने असलेल्या भांड्यांना वाटणार, बहुसंख्यकांचा न्याय लावा. अल्पसंख्यक भांड्यांना वाटणार, आवाज आमच्याच भांड्याचा निनादला पाहिजे… मग पुन्हा भांड्यांची आदळआपट होत राहणार. मग हे स्वातंत्र्य समूहाचे की व्यक्तीचे, या प्रश्‍नाचे उत्तर व्यक्तींच्या समूहाचे असेच आहे. त्यासाठी व्यक्तींनी आपला समूह विसरून अन् समूहाने व्यक्तिवाद विसरून एकत्र यायला हवे. तसे होत नाही. म्हणून मग आताशा प्रत्येकाला आपलेच स्वातंत्र्य खरे असे वाटू लागले आहे. कुणाला वाटते की ‘वंदे मातरम्’ न म्हणणे हेच आमचे स्वातंत्र्य आहे. आमच्या धर्माला ते लांच्छन आहे, असे त्यांचे मत. त्यासाठी मग ते देश सोडून जायलाही तयार आहेत. म्हणजे मग या देशात राहूनही त्यांच्या देशप्रेमाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. दुसर्‍या देशात जाऊ पण वंदे मातरम् ना गाऊ, हा त्यांचा हेका कायम आहे. त्यासाठी ते सारे जहॉं से अच्छा, हिंदोसता हमारा, म्हणायला किमान या वेळी तयार आहेत. नंतर ते हेही म्हणतील की, आम्ही हिंदोसता म्हणणार नाही. कारण आमच्या त्या अमक्या तमक्याला ते चालणार नाही. मात्र त्यांना देशात राहून देशाला काय काय म्हणत राहण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. कुणाला गाय कापण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. कुणाला गायीचे संरक्षण करणे हेच स्वातंत्र्य आहे, असे वाटते. नेमके देशाला स्वातंत्र्य मिळाले ते गाय कापणे, तिचे मांस खाणे यासाठी की तिचे रक्षण करणे यासाठी, हा सवाल उरतोच. कुणाला वाटते की आम्ही अमक्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवू देणार नाही. म्हणजे तुमचा तिरंगा असेल तर आमचा तो तसाच असला पाहिजे, ही सक्ती आमच्यावर नको. कारण देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे. आमचेही पूर्वज या स्वातंत्र्यासाठी लढले होते. त्यामुळे या स्वातंत्र्यावर आमचाही तितकाच अधिकार आहे. त्या वेळीही आम्ही काही हा तिरंगा झेंडा मान्य केला नव्हता. आताही आम्हाला तिरंगा नको आहे. आमचेही या देशावर खूप खूप प्रेम आहे. त्या प्रेमाला पाईक होण्याची पात्रता आमच्या अंगी आहेच. कुठला झेंडा मान्य करायचा अन् हाती घ्यायचा, हे आमचे स्वातंत्र्य आहे. ते आम्हाला इंग्रजांनी दिले आहे. तुमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. हिंदोसता हे या देशाचे नावही आम्हाला मान्य नव्हतेच. त्यामुळे आम्ही भारत अन् तेही बर्‍यापैकी हिंदोसताच्या धर्तीवरचेच वाटते म्हणून मग इंडिया केले आहे. हे असे स्वातंत्र्य प्रत्येकालाच असल्याने केरळात वेगळा ध्वज त्यांना हवा आहे. काश्मिरात १४ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आहे. ते तसे स्वातंत्र्य काश्मीरनंतर देशात ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांना ते आहे. आम्हाला लाल किल्ल्यावरून तुमचे पंतप्रधान भाषण देतात तो स्वातंत्र्यदिन मान्य नाही. हा देश आमचाच असल्याने या देशाचा स्वातंत्र्यदिन केव्हा साजरा करायचा, ते आम्ही ठरवू. आमच्या पोराचा, ‘बर्थ डे’ केव्हा साजरा करायचा, हे तुम्ही कसे ठरविणार? अनेकांना भाषेचेही स्वातंत्र्य आहे. आमच्या देशात आमची भाषा असेल. तुमची हिंदी आम्ही का मान्य करायची? असेच सगळे इतरही बाबींचे आहे. राष्ट्रीय पक्षी, प्राणी, राष्ट्रगान, खानपान सगळेच स्वातंत्र्य ज्याचे त्याला आहे. या स्वातंत्र्याचा अलीकडे टकराव वाढला आहे. प्रत्येकच जण या देशाचा लाडका सुपुत्र आहे. त्यामुळे मनमानेल वागत असताना तो विचारतो आहे, ‘‘आम्ही कोण म्हणुनी काय पुसता…’’