साप्ताहिक राशिभविष्य

0
522

३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१७
सप्ताह विशेष ः  सोमवार, ३१ जुलै- श्रावण सोमवार (शिवमूठ- तीळ), दुर्गाष्टमी, समर्थ सद्गुरु आबाजी महाराज जन्मोत्सव- नागपूर; मंगळवार, १ ऑगस्ट- मंगळागौरी पूजन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, श्री नारायण महाराज पुण्यतिथी- वाशिम; बुधवार, २ ऑगस्ट- भद्रा (प्रारंभ २७.२३) रवी आश्‍लेषा नक्षत्रात (२७.०१), संत बर्‍हाणपुरे महाराज पुण्यतिथी- माडगाव, समुद्रपूर (वर्धा); गुरुवार, ३ ऑगस्ट- पुत्रदा एकादशी, भद्रा (समाप्त १६.३४), हर्शल वक्री, श्री पाचलेगावकर महाराज पुण्यतिथी, श्री शेवाळकर महाराज पुण्यतिथी- अचलपूर (अमरावती); शुक्रवार, ४ ऑगस्ट- वरदलक्ष्मी व्रत, शाकव्रत समाप्ती; शनिवार, ५ ऑगस्ट- शनिप्रदोष, श्री रामभाऊ रामदासी महाराज पुण्यतिथी- लिंबा (दिग्रस), श्री जिवाजी महाराज जयंती- अचलपूर (अमरावती).
संक्षिप्त मुहूर्त ः साखरपुडा-१,२,४ ऑगस्ट; जावळे- ३०,३१ जुलै; गृहप्रवेश- ३०,३१ जुलै, २ ऑगस्ट.
मेष- विविध आघाड्यांवर दमछाक
या आठवड्यात देखील आपला राशीस्वामी मंगळ कर्क या स्वतःच्या नीच राशीत रवीसोबत अस्तंगत आहे.  चंद्र सप्तमस्थानी तुला राशीत असून तो आठवडा अखेर भाग्यस्थानी धनु राशीत जाईल. राशीस्वामी मंगळ अस्तंगत असल्याने हक्काचे छत्र हरपल्यागत स्थिती सध्या आपली असणार. बाकीची ग्रहस्थिती पण फारशी सुखद नाही. एका महत्त्वाच्या टप्प्यावर हे अनुपयोगी ग्रहयोग आपल्या वाट्याला आलेले आहेत. शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा विविध आघाड्यांवर आपली काहीशी दमछाक होणार आहे. विशेषतः आठवड्याच्या मध्यात बिकट परिस्थिती जाणवणार आहे. शेअ़र बाजारातील गुंतवणूक, लॉटरी वा तत्सम बाबींत गुंतवणूक करताना सावध असावयास हवे. युवा वर्गास मात्र प्रेमसंबंध, विवाह योगाची शक्यता आहे. मनासारखा जोडीदार लाभू शकेल. सहकार्‍यांची मने राखावी लागतील. शुभ दिनांक- ३०,३१,४,५
वृषभ- आरोग्याची काळजी घ्या
आपला राशीस्वामी शुक्र या आठवड्यात धनस्थानातील मिथुन राशीत आहे. चंद्र या आठवड्यात षष्ठ स्थानातून प्रवास सुरू करीत आठवडाअखेर अष्टमातील धनु राशीत जाणार आहे. कोणावरही एकाएकी विश्‍वास टाकून काम व्हायचे नाही. तसेच, काहींना त्यांच्या जवळच्या मित्रमंडळी वा नातलगांबाबत काळजीजनक वातावरण निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. घरातील तसेच व्यवसायातील जबाबदारीचा ताण काहीसा वाढू शकतो. सहकार्‍यांची मने राखावी लागतील. घरातील सुखसोई वाढविण्यात, एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी बराच खर्च देखील होऊ शकतो. काहींना चोरी, वस्तू हरवणे यासारख्या काही घटनांना देखील काहींना सामोरे जावे लागू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रकृतीबाबतही चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. औषधोपचार, पथ्यपाणी सांभाळावयास हवे. व्यसने बाजूला सारायला पाहिजेत. आरोग्याची काळजी घ्या. शुभ दिनांक- ३१,१,२,३.
मिथुन- भाग्योदयकारक योग 
आपला राशीस्वामी बुध या आठवड्यात पराक्रम स्थानात राहूसोबत तर शुक्र आपल्या राशीत आहे. चंद्र या आठवड्यात पंचम स्थानातून प्रवास सुरू करीत आठवडाअखेर सप्तम स्थानातील धनु राशीत जाईल. या आठवड्यातील ग्रहस्थिती अतिशय उत्तम व आपल्या योजनांना अनुकूल आहे. व्यवसाय, काम-धंद्यास गती मिळेल. वेळेचे नियोजन करून आपण अपेक्षित परिणाम गाठू शकाल. पूर्वी काही योजना आखून ठेवल्या असतील तर त्या आता पुढे आणून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करायला हवा. व्यवसाय वाढीमुळे आर्थिक आघाडीवर सुबत्ता राहण्याची शक्यता असतानाच अचानक मोठ्या खर्चाचे संकेतही मिळत आहेत. तरुण वर्गाला नोकरी-व्यवसायात उत्तम संधी, पगारवाढ, पदोन्नतीचे-थोडक्यात भाग्योदयाचे योग दर्शवीत आहे. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ दिनांक-३०,३१,४,५.
कर्क- कामाचा झपाटा वाढवा
आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशीस्वामी चंद्र सुखस्थानी तूळ राशीत असून आपल्या राशीत रवी व अस्तंगत मंगळ आहेत. आठवडाअखेर चंद्र षष्ठस्थानी धनु राशीत जाणार आहे. या आठवड्यातील ग्रहस्थिती अतिशय उत्तम व आपल्या योजनांना अनुकूल आहे. व्यवसायात, नोकरीत प्रशंसा, कामाचे कौतुक, वरिष्ठांची मर्जी राहील. काहींना आकस्मिक धनलाभाचे योग संभवतात. विविध मार्गांनी पैशांची आवक वाढेल. कार्यालयात, कार्यक्षेत्रात आपली बाजू वरचढ होत असतानाच हाताखालच्या सहकार्‍यांकडून मात्र काहीसे मानहानीचे, असहकाराचे वर्तन घडण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करणे अवघड जाईल. तथापि, आपल्या कामाची दिशा, झपाटा बदलू न देता आगेकूच करण्यातच आपले हित आहे, हे लक्षात ठेवा. अशी वाटचाल असली तर त्याचे दूरगामी लाभ मिळतील, हे निश्‍चित. शुभ दिनांक- ३०,१,२,३.
सिंह- स्थावराच्या कामांना गती
आपला राशीस्वामी रवी या आठवड्यात देखील व्यय स्थानात मंगळासोबत असून आपल्या राशीत बुध व राहू आहेत. चंद्र पराक्रम स्थानापासून प्रवास सुरू करीत पंचम स्थानी धनु राशीत जाणार आहे. जमीन, वाहन, घर अशा मोठ्या खरेदीच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण या आठवड्यात प्रयत्न करू शकता. त्यात बरेच यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम जावा. विशेषतः शिक्षणासाठी विदेशात जाण्याच्या योजना कुणी आखत असेल तर त्याला मूर्त रूप लाभू शकेल. संततीसाठी लाभदायक काळ राहील. मुलांचे शिक्षण, नोकरी- व्यवसाय, विवाहसंबंधी कार्ये घडू शकतात. उत्तरार्ध काहींना कटकटीचा जाण्याची शक्यता आहे. कायदेशीर बाबतीत अडकला असाल तर परिस्थिती चिघळणार नाही, याची काळजी घ्या. वाहने सांभाळून चालवा. पडझड, किरकोळ अपघातांची शक्यता आहे. जुन्या व्याधी डोके वर काढण्याचीही शक्यता आहे. शुभ दिनांक- ३०,१,४,५.
कन्या- परिश्रमाचे चीज होईल
आपला राशीस्वामी बुध व्यय स्थानात राहूसोबत असून आपल्या राशीत गुरू आहे. चंद्र या आठवड्यात धन स्थानातून प्रवास सुरू करीत सुख स्थानी धनु राशीत येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपण आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमाचे चीज होईल. कामाचे कौतुक, नवीन जवाबदारी, पदोन्नती, पगारवाढ, इन्सेंटिव्ह अशा स्वरूपात लाभ पदरी पडण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांची मर्जी आणि सहकार्‍यांची साथ लाभणार आहे. घरात काही शुभकार्ये ठरण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या आनंदात भरच पडेल. आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. जुनी अडलेली आवक, वारसा हक्कादीची प्रलंबित प्रकरणे या काळात मार्गी लागू शकतात. दीर्घकालीन लांबलेले जमिनीचे व्यवहार तसेच स्थावर मालमत्तेसंबंधीचे व्यवहार पूर्णत्वास जातील. तसेच भूमी, घर, मोठे वाहन यांच्या खरेदीच्या योजना असल्यास त्यांना गती मिळू शकेल. व्यावसायिक जागा, वाहन यांची खरेदी होऊ शकते. शुभ दिनांक- ३०,३१,२,४.
तुला- कौटुंबिक तणाव, संघर्ष टाळा
या आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशीस्वामी शुक्र भाग्यस्थानात आलेला आहे. चंद्र देखील आपल्याच राशीतून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर पराक्रमातील धनु राशीत जाईल. व्यवसायासाठी किंवा स्थावर मालमत्ता खरेदी संबंधातील कर्जाच्या मागणीला पूर्तता लाभेल. गुरू प्रवासाच्या योजनांना वेग देईल. विशेषतः विदेश वारीची तयारी असल्यास ती वेग घेईल. तीर्थाटने, सहली घडू शकतील. प्रवासात दक्षता बाळगणे जरूरी आहे. दगदग, तणाव, धावपळ टाळायला हवी. वाहने सांभाळून चालवायला हवीत. वेगावर नियंत्रण असावे. संततीला हा काळ प्रगतीकारक जावा. त्यांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय या संबंधाने काही चांगल्या घटना घडतील. काहींना मात्र कुटुंबात तणाव, संघर्षाला सामोरे जावे लागू शकते. जोडीदाराचे मन राखण्याचा प्रयत्न करा. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी मोठा खर्च करावा लागू शकतो. शुभ दिनांक- ३०,३१,३,५.
वृश्‍चिक- कुटुंबातून संमिश्र प्रतिसाद
आपला राशीस्वामी मंगळ या आठवड्यात देखील भाग्य स्थानात रवीसोबत अस्तंगत आहे. चंद्र व्यय स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर धनस्थानी  धनु राशीत येईल. हा आठवडा आपणांस संमिश्र स्वरूपाचा ठरण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून खर्चाचे प्रमाण वाढलेले राहू शकते. कुटुंबात एखाद्या कार्यासाठी आपल्याला खर्च उचलावा लागू शकतो. कदाचित एखाद्या मोठ्या खर्चासाठी काहींना कर्ज देखील काढावे लागू शकते. पूर्वार्धात काहींना कुटुंबात काहीसा तणाव सहन करावा लागू शकतो, मात्र  उत्तरार्धात संघर्ष वा तणावाचे हे ढग विरून कुटुंबाची उत्तम साथ मिळू शकेल व आपले ईप्सित गाठू शकाल. काही नाविन्यपूर्ण घडामोडी अचंबित करतील. आर्थिक उन्नती, कुटुंबात वृद्धी व समाधान मिळेल. मोठी खरेदी, अचानक लांबचे प्रवास  घडण्याची शक्यता आहे. नोकरी- व्यवसायात मात्र विरोधकांना बळ देऊ शकतो, मात्र सारे काही आटोक्यात राहील. शुभ दिनांक- १,२,३,५.
धनु- मन प्रफुल्लित राहणार
याही आठवड्यात आपला राशीस्वामी गुरू दशम स्थानात असून व्ययस्थानात वक्री शनी आहे. चंद्र या आठवड्यात लाभ स्थानातूनच प्रवास सुरू करीत आपल्या राशीत येणार आहे. बाहेर आसमंतात निसर्ग नटलेला असतानाच आपले मन देखील प्रफुल्लित झालेले असणार. घरात, कुटुंबात काही मंगलकार्ये, घर-वास्तू निर्माणाच्या योजना, खरेदी संबंधातील आडाखे बांधायला सुरुवात झालेली असेल. पंचमात असलेला केतू आपल्या योजनांना योग्य फळ दिल्यावाचून राहणार नाही.  तरुणांना नोकरीच्या उत्तम संधी लाभू शकतात. काहींना नोकरीच्या निमित्ताने परदेश गमनाची संधी देखील यावी. किमान त्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना वेग मिळेल. तरुणांना विवाह योग जुळून येण्यासाठी उत्तरार्ध अधिक उपयोगी ठरावा. तर नवविवाहितांचा भाग्योदय घडावा. संततीचे योग यावेत. काहींना प्रकृतीविषयक चिंता उद्भवू शकते. शुभ दिनांक- ३०,३१,४,५.
मकर-  कुटुंबातून सहकार्य मिळेल
राशीस्वामी शनी वक्री स्थितीत लाभ स्थानात असून त्याची आपल्या राशीवर दृष्टी आहे. चंद्र दशम स्थानातून प्रवास सुरू करीत आठवडाअखेर व्यय स्थानी धनु राशीत जाईल. कुटुंबातून मार्गदर्शन व आर्थिक-मानसिक सहाय्य देखील मिळेल. या सार्‍या वातावरणात तरुण वर्गाला आपले भवितव्य घडविण्यासाठी अधिकाधिक परिश्रम घ्यायला हवेत. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात प्रयत्नांची कमी पडू नये. विशेषतः आठवड्याच्या पूर्वार्धात महत्त्वाच्या कामांना गती द्यायला हवी. ओळखीतून तसेच वरिष्ठांच्या सहवासातून लाभ होण्याची जास्त शक्यता आहे. वडीलधार्‍या मंडळीचा सल्ला अवश्य घ्या. विवाहेच्छू युवावर्गाला त्या अनुषंगाने चांगले योग यावेत. नवविवाहितांना संततीयोग येऊ शकतो. आठवड्याच्या अखेरीस महिलावर्गाच्या प्रकृतीबाबत चिंतेते वातावरण राहू शकते. शुभ दिनांक- ३१,१,२,३.
कुंभ- कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा उंचावेल
या आठवड्याच्या आरंभी राशीस्वामी शनी दशम स्थानात असून आपल्या राशीत केतू आहे. चंद्र भाग्य स्थानातून प्रवास सुरू करीत या आठवड्याच्या शेवटी लाभ स्थानातील धनु राशीत येईल. दैनंदिन कामकाज, व्यावसायिक कामें सहज, विनासायास पार पडतील. थोड्या प्रयत्नात देखील लक्षणीय यश मिळवता येईल. नोकरी- व्यवसायात प्रगती, समाजात मान-सन्मान वाढणे, प्रतिष्ठा उंचावणे असले योग निर्माण करीत आहेत. या राशीचे जे लोक सरकारी नोकरीत असतील त्यांना तर या आठवड्याचा पूर्वार्ध निश्‍चितच सुखावह व नवीन संधी देणारा असणार आहे. कामें व आरोग्याची काळजी यासंबंधात वेळापत्रक सांभाळणे फायद्याचे राहील. खाण्यापिण्याच्या वेळा, औषधे-पथ्ये सांभाळली पाहिजेत. वाहने सांभाळून चालवावीत. वेगावर नियंत्रण हवे. विजेची उपकरणे काळजीपूर्वक हाताळावीत. शुभ दिनांक- ३०,३१,४,५.
मीन- आर्थिक ओढाताण संभवते
राशीस्वामी गुरू या आठवड्यात देखील सप्तमस्थानात असून त्याची आपल्या राशीवर शुभदृष्टी आहे.  चंद्र अष्टम स्थानातून प्रवास सुरू करीत आठवडाअखेर दशम स्थानातील धनु राशीत जाणार आहे.  या आठवड्यात आपली काहीशी आर्थिक ओढाताण होऊ शकते. विशेषतः व्यवसायात असलेल्या मंडळींना जवळच्या वाटणार्‍या व्यक्तींकडूनच फसवणूक, भ्रमनिरास असे अनुभव येण्याची श्‍नयता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणावरही विश्‍वास टाकतांना पुरेपूर खातरजमा करून घेणे फायद्याचे ठरेल. तथापि, गुरू आपणांस कोणतेही मोठे नुकसान होण्याची भीती नसल्याचीही खात्री देत आहे. त्यामुळे आपली उमेद टिकून राहणार. काही विशेष घडविण्यासाठी आपणांस प्रेरणा मिळत राहील. त्यातून यश, कौतुक, प्रसिद्धी मिळेल. मात्र सोबतच कामांची अतिशय गर्दी, व्यग्रता यात बर्‍यापैकी दमछाक होण्याची शक्यता राहील. शुभ दिनांक- २,३,४,५.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६