पनामा गेट ते इंडिया गेट!

0
99

दिल्ली दिनांक
इतिहासात असे काही क्षण असतात की, फार मोठी गुपिते बाहेर पडतात आणि इतिहास घडवितात. इतिहासाच्या अशाच एका क्षणाने पाकिस्तानात इतिहास घडविला आणि पंतप्रधान नवाझ शरीफ यांना राजीनामा द्यावा लागला. शरीफ हे पनामा गेटचे पहिले बळी ठरले. विशेष म्हणजे आज पाकिस्तानला हादरविणारे पनामा गेट प्रकरण कुणी उघडकीस आणले हे कुणालाही माहीत नाही. ते नाव आजही काळाच्या इतिहासात दडलेले आहे.
तो क्षण
रात्रीचे दहा वाजलेले. बॅस्टियम उबरमेयर हा जर्मन पत्रकार आपल्या कुटुंबासह आपल्या वडिलांच्या घरी गेला होता. घरातील सर्वजण तापाने आजारी होते. पत्नी, चार मुले यांना डॉक्टरांना दाखवून तो नुकताच परतला होता. चहाचा घोट घेत त्याने आपला लॅपटॉप उघडला आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक एसएमएस आला. तो एक अनामिक संदेश आला. महत्त्वाचा डाटा हवा आहे का, मी देण्यास तयार आहे. एवढाच तो संदेश होता. बॅस्टियनने होकार दिला आणि पनामा गेटचा गौप्यस्फोट होण्यास प्रारंभ झाला. या पत्रकाराकडे आलेली सारी माहिती सांकेतिक होती. त्या माहितीचा अर्थ समजणे, त्यासाठी शक्तिशाली कॉम्प्युटर वापरणे, मिळालेल्या माहितीचे विश्‍लेषण करणे, सारी माहिती गोपनीय ठेवणे असे अनेक टप्पे ओलांडल्यानंतर पनामा पेपर्सची माहिती घोषित करण्यात आली. वेगवेगळ्या देशांमध्ये त्या माहितीच्या आधारे आंदोलने सुरू झाली, खटले दाखल करण्यात आले. असाच एक खटला माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी नवाज शरीफ यांच्याविरुद्ध दाखल केला होता.
दोन कंपन्या
ब्रिटिश व्हर्जिन आयर्लंडमधील दोन कंपन्यांमध्ये नवाज शरीफ यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचे एक अहवालात उघडकीस आले होते. नेल्सन आणि नेसकॉल या कंपन्यांमध्ये सरकारी पैसा वळविण्यात आला होता. त्या पैशातून शरीफ यांनी लंडन व अन्य ठिकाणी मोठमोठ्या संपत्ती खरेदी केल्या होत्या. पनामा गेटमध्ये याला दुजोरा मिळाला. शरीफ यांची मुलगी व दोन मुले यांच्या नावाने या कंपन्या असल्याचे पनामा दस्तऐवजात आढळून आले.
अमिताभ, ऐश्‍वर्या, अडाणी
पनामा गेटमध्ये जगभरातील अनेक नेते, खेळाडू, चित्रपट अभिनेते यांच्या बनावट कंपन्या, त्यात गुंतविण्यात आलेला हजारो कोटींचा काळा पैसा, त्यातून खरेदी केलेल्या मालमत्ता यांचा उल्लेख असणारे हजारो दस्तऐवज आहेत. याच दस्तऐवजांच्या आधारे पाकिस्तानच्या संयुक्त चौकशी समितीने एक अहवाल पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाला सादर केला व त्याच्या आधारे नवाज शरीफ दोषी ठरविले गेले. या पनामा गेटमध्ये ५०० भारतीय नावे असल्याचे म्हटले जाते. यात अमिताभ बच्चन, ऐश्‍वर्या बच्चन, उद्योगपती अडाणी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना दोषी ठरविल्यानंतर भारतातही पनामा गेट प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत. अमिताभ बच्चन अभिनेता असला तरी त्याच्या नावाने चार कंपन्या आढळून आल्या आहेत. या कंपन्यांचा जहाज व्यवसाय दाखविण्यात आला आहे. आता अमिताभ बच्चनचा जहाज व्यवसाय कुठून आला? अमिताभने याचा इन्कारही केला होता. मात्र, पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने एकप्रकारे पनामा दस्तऐवजांवर शिक्कामोर्तब केले असल्याने पनामा गेट प्रकरण इंडिया गेटपर्यंत म्हणजे भारतापर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत.
मोसाक फोन्सेका
पनामा एक लहानसा देश. काळ्या पैशासाठी तो प्रसिद्ध आहे. या देशात मोसाक फोन्सेका एक कंपनी आहे. या कंपनीचे काम एकच. करचोरीसाठी कंपन्या स्थापन करण्यास मदत करणे. जगातील कोणत्याही व्यक्तीस विदेशात आपला काळा पैशा ठेवायचा असेल तर त्यांचा सर्वोत्तम मित्र, मार्गदर्शक म्हणजे ही कंपनी. अनामिक कंपनी स्थापन करण्यासाठी सारे दस्तऐवज तयार करणे, त्यासाठी संचालकांची आवश्यकता असेल तर ते पुरविणे, कंपनी उघडणार्‍यास आपले नाव गोपनीय ठेवायचे असेल तर त्याचीही व्यवस्था करणे हे सारे काम ही कंपनी करीत असे.
मोठमोठे ग्राहक
रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यापासून संयुक्त राष्ट्राचे सचिव कोफी अन्नान यांच्या मुलापर्यंत, संयुक्त अरब अमिरातच्या राष्ट्रपतीपासून देशादेशांचे मंत्री, उद्योेगपती, खेळाडू, अभिनेते सर्वांना या कंपनीने मार्गदर्शन केले. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या तयार केल्या. त्या कंपन्यांसाठी संचालक पुरविले व त्यांचा पैसा गुंतविला आणि अचानक मोसाक फोन्सेका कंपनीचा हा सारा डाटा लिक झाला. तो कुणी लिक केला हे अद्यापही फार मोठे गुपित आहे.
सर्वाधिक पैसा
रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी सर्वाधिक पैसा मिळविला व तो आपल्या काही मित्रांच्या नावाने गुंतविला असल्याचे पनामा दस्तऐवजात म्हटले आहे. पुतीन यांच्या पैशाची मोजदाद करणे अवघड आहे एवढा तो प्रचंड असल्याचे म्हटले जाते. संयुक्त राष्ट्राचे सचिव कोफी अन्नान यांचा मुलगा कोजो अन्नान याच्याही बनावट कंपन्या स्थापन करण्यास मोसाक फोन्सेकाने मदत केली. संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती, जॉर्डनचे पंतप्रधान यासारखे बडे ग्राहक या कंपनीच्या सेवा घेत होते. प्रसिद्ध फुटबॉलपटू मेस्सीच्याही कंपन्या असल्याचे समोर आले आहे.
दुहेरी परिणाम
पाकिस्तानातील पनामा गेटचा भारतावर दुहेरी परिणाम होणार आहे. पनामा गेटमध्ये ५०० भारतीयांची नावे आहेत. त्यांच्या चौकशीची मागणी येणार्‍या काळात केली जाईल. लवकरात लवकर ही चौकशी व्हावी असेही म्हटले जाईल. याचा परिणाम न्यायपालिकेवरही होणार आहे. दुसरा परिणाम आहे भारत-पाक संबंध! नवाज शरीफ हे एक परिपक्व नेते मानले जात होते. त्यांच्यावर लष्कराचा दबाव होता. कट्टरपंथीयांचा दबाव होता हा भाग वेगळा. पण, भारताशी शत्रुत्व करणे फायद्याचे नाही हे त्यांना समजत होते. पाकिस्तानने अतिरेक्यांना साथ देणे पाकिस्तानच्या हिताचे नाही हे ते जाणून होते. पाकिस्तानने अतिरेक्यांना अटक न केल्यास जगात पाकिस्तान एकाकी पडेल हे ते लष्कराला सांगत होते. त्यांच्याच भूमिकेमुळे काही अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. आता पाकिस्तानात अस्थिरतेचे युग सुरू होत आहे. नवे पंतप्रधान कामचलावू असतील. याचा अर्थ लष्कराची ताकद वाढण्याची शक्यता आहे. याला चीनचे पाठबळ राहणार आहे. भारतासाठी ही नवी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तानात लोकनिर्वाचित सरकार असणे भारताच्या हिताचे राहात आले आहे. मात्र, पाकिस्तानात पुन्हा लष्करी राजवट आली तर काश्मीरमध्ये त्याचे परिणाम पुन्हा दिसू लागतील.
दोन पक्ष
पाकिस्तानात भुत्तो परिवाराची पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग हे दोन महत्त्वाचे पक्ष आहेत. बेनझीर भुत्तोच्या हत्येनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे महत्त्व कमी झाले. नवाज शरीफ कमजोर झाल्यास त्यांचा पक्षही कमजोर होईल आणि त्या स्थितीत पाक लष्कराचे फावण्याची शक्यता आहे. म्हणजे भारताला जे नको तेच होण्याची शक्यता तयार होत आहे. नवाज शरीफ यांना राजीनामा द्यावा लागणे हे भारताच्या हिताचे झालेले नाही. पाक लष्कराने त्यांना हटविले असे म्हटले जात आहे. नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना येणार्‍या काळात पंतप्रधान केले जाईल. ती एक तात्कालीक व्यवस्था असेल. २०१८ मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्या निवडणुकीपर्यंत तरी पाकिस्तानात अस्थिरतेचे राज्य राहणार आहे.
रवींद्र दाणी