आता कॉंग्रेसची पळापळ!

0
111

अग्रलेख
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, लालूप्रसाद यादव यांच्यासोबत असलेली युती तोडून भाजपासोबत मैत्री केल्यामुळे महागठबंधन नावाच्या वास्तूला आधीच मोठे खिंडार पडले. आता कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या परीक्षेची घडी आली आहे. येत्या ८ ऑगस्टला राज्यसभेची निवडणूक होणार आहे आणि गुजरातमधून तीन राज्यसभा सदस्य पाठवावयाचे आहेत. भारतीय जनता पक्षाने, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तिकीट दिले आहे. दरम्यान, शंकरसिंह वाघेला यांनी राजीनामा दिला. याचा परिणाम म्हणून, गुजरातमधील कॉंग्रेसच्या तीन आमदारांनी व नंतर आणखी तीन आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. या गटाचे नेते बलवंतसिंह राजपूत यांना भाजपाने तिसरे तिकीट दिले आहे. गुजरातची विधानसभा १८२ सदस्यांची आहे. भाजपाजवळ ११६ मते आहेत. कॉंग्रेसजवळ ६० जागा होत्या. त्यात आता घट होऊन त्या ५२ पर्यंत आल्या आहेत. कारण, आणखी दोन सदस्यांनी कॉंग्रेसला रामराम केला आहे. त्यामुळे विधानसभा सदस्यांची एकूण संख्या १७४ एवढीच उरली आहे. कोटा हा ४३ मतांचा आहे. यात अमित शाह आणि स्मृती इराणी यांचा विजय निश्‍चित आहे. बलवंतसिंह राजपूत यांचा प्रयत्न असा आहे की, कॉंग्रेसमधील आमदार आपल्याला मते देऊन निवडून आणतील. त्यामुळे भाजपाने त्यांनाही उमेदवारी दिली आहे. खरी समस्या कॉंग्रेसची आहे. येथे पक्षाने पुन्हा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना तिकीट दिले आहे. त्यांचा पराभव होणे म्हणजे सोनिया गांधी यांचा पराभव होणे, असा त्याचा राजकीय वर्तुळात उल्लेख केला जाईल. त्यामुळे कॉंग्रेसची प्रतिष्ठा कधी नव्हे एवढी पणाला लागली आहे. कसेही करून अहमद पटेल यांना निवडून आणायचेच, असा चंग कॉंग्रेसश्रेष्ठींनी बांधला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींवर कठोर शब्दांत प्रहार केले होते. तसेच वाघेला यांच्यासोबत ११ आमदार होते. हे ११ जण जर फुटले तर आपली गत नाही, हे तेव्हाच सोनिया आणि राहुल यांच्या लक्षात आले असणार. तेव्हापासून त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली. पण, कॉंग्रेसच्या आत भलतेच काहीतरी शिजत होते. त्याचा वास कॉंग्रेसजनांना आला होता. हे सर्व सुरू असतानाच, आधी तीन, नंतर तीन अशा सहा आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामेच विधानसभा अध्यक्षांना देऊन टाकले. हे पाहून कॉंग्रेसचे धाबे दणाणले. त्यांनी तत्काळ उर्वरित आमदारांना नजरबंद करण्याचा निर्णय घेतला. पर्याय दोन होते. एक- पंजाब आणि दुसरा कर्नाटक. कर्नाटक हे कॉंग्रेसला अधिक सुरक्षित वाटले आणि त्यांनी थेट विमानाची तिकिटेच काढली. दोन फेर्‍यांमध्ये ४४ आमदारांना घेऊन विमान बंगलोरच्या दिशेने उडाले. त्यांची बंगलोरमधील एका अलिशान फार्म हाऊसमध्ये रवानगी करण्यात आली. त्यांची योग्य बडदास्त ठेवण्यात आली. पण, आणखी १२ लोकांचे काय? अशातच कॉंग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी विरोधी सूर लावला. कॉंग्रेसला घाम फुटला. दुसरी बाब म्हणजे, महत्प्रयासाने ४४ जणांना बंगलोरमध्ये आणल्यानंतर त्यांच्यापैकी काही जणांनी बंडखोरी केली तर… ही भीती कायम आहेच. अशा स्थितीत कर्नाटकमधील कॉंग्रेस नेते या सर्व आमदारांचे ब्रेन वॉशिंग करीत आहेत. तरीही आणखी चार आमदारांचे काय? असा प्रश्‍न कॉंग्रेसपुढे आहेच. राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेस व्हिप जारी करणार आहे. त्याचे उल्लंघन केल्यास सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी करण्याची तरतूद आहे, असा दम कॉंग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी आतापासूच भरण्यास सुरुवात केली आहे. पण, अमरसिंह आणि जयाप्रदा यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र घोषित केले नव्हते. दुसरीकडे, भाजपा आमच्या आमदारांना मोठमोठी आमिषे दाखवून फोडत आहे, अशी तक्रार कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. पण, याला पुरावा काय? हा प्रश्‍न राहीलच. अशा या सगळ्या धामधुमीत अहमद पटेल यांना निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसजन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. शरद पवार यांच्या पक्षाकडे दोन मते आहेत. जदयुकडे एक मत आहे. पण, बिहारमधील ताज्या घडामोडी पाहता जदयुचे मत पटेल यांना जाण्याची शक्यता नाही. मध्यंतरी प्रफुल्ल पटेल यांनी शंकरसिंह वाघेला यांची भेट घेतली होती.
या भेटीचा तपशील समजला नाही. पण, राष्ट्रवादी काय भूमिका घेते, हे आता पाहायचे. तिकडे उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे दोन आणि बहुजन समाज पार्टीच्या एका विधान परिषद सदस्याने राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांनीही भाजपावर आमदारांना विकत घेण्याचा आरोप लावला आहे. तिकडे शिवपाल यादव यांनी तर चक्क अखिलेशला इशारा देताना सांगितले आहे की, आतातरी मुलायमसिंह यादव यांच्याकडे पार्टीची सूत्रे सोपवावीत. अन्यथा, आम्ही नेताजींसोबत नवा पक्ष स्थापन करू. यामुळे अखिलेश यांना एकीकडे भाजपा, तर दुसरीकडे पक्षातील अंतर्गत कलहाचा सामना करावा लागत आहे. विधानसभेत सध्या भाजपाकडे भरपूर जागा आहेत. त्यामुळे आपली पुन्हा आमदार वा एखाद्या महामंडळावर वर्णी लागेल, असे सपाच्या दोन व बसपाच्या एका सदस्याला वाटते. महागठबंधन करण्यासाठी निघालेल्या प्रादेशिक पक्षांची कशी दाणादाण उडत आहे, हे सारा देश पाहात आहे. नितीशकुमार यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. ज्या वेळी गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेसला सत्तेच्या जवळ जाण्याची संधी होती, ती कॉंग्रेसच्याच काही बड्या नेत्यांच्या गटबाजीमुळे गमावली गेली. तेथे भाजपाने आपले सरकार स्थापन केले. पंजाबात कॉंग्रेसला मिळालेले यश हे राहुल गांधींमुळे नव्हे, तर अमरिंदसिंग यांच्यामुळे मिळाले, हे जसे विरोधी पक्षांच्या लक्षात आले, तसे ते कॉंग्रेसच्याही लक्षात आले असेलच. त्यामुळे राहुलच्या करिष्म्यावर पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. गुजरातमध्ये अहमद पटेल यांना जिंकवून आणण्यासाठी जी कॉंग्रेस नेत्यांची पळापळ सुरू आहे, ती राजकीय निरीक्षकांच्या नजरेतून कशी सुटणार? ज्यांना स्वत:चा पक्ष सावरता येत नाही, ते महागठबंधनात येऊन काय करणार? कॉंग्रेसमध्ये राहुल गांधी, उत्तरप्रदेशात अखिलेश यादव, बिहारमध्ये लालू यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप, अशा वेळी महागठबंधनाचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची आशा बळावली आहे. नितीशकुमारांनी ऐनवेळी निर्णय घेऊन आपल्या चलाखीचा परिचय दिला. तूर्त, राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे अहमद पटेल यांचा विजय होतो की नाही? जर पराभव झाला तर सोनिया गांधी यांच्या सूझबूझच्या राजकारणावर मोठे प्रश्‍नचिन्ह लागणार आहे. उद्या, समजा पटेल निवडूनही आले, तरी सध्या भाजपाने मात्र कॉंग्रेसच्या तोंडाला चांगलाच फेस आणला आहे, हे तेवढेच खरे!