ड्रॅगनची अरेरावी…   

0
56

वेध
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चिनी लष्कराला युद्धास सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. भारत-भूतान-चीन सीमेवरील डोकलाम येथे गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय सैनिक तळ ठोकून आहेत. भारताच्या या ठाम व आक्रमक धोरणामुळे चिनी राज्यकर्तेही आश्‍चर्यचकित व संतप्त झाले आहेत. या पृष्ठभूमीवर चीनच्या राष्ट्रपतींनी थेट युद्धास सज्ज राहण्याचे आदेशच आपल्या सैनिकांना दिले. चीन सरकारमधले अधिकारी, तेथील लष्कर आणि चिनी प्रसारमाध्यमांकडून दररोज गरळ ओकणारी आणि धमक्या देणारी वक्तव्ये केली जात आहेत. वाढत्या आर्थिक आणि लष्करी ताकदीचा कसा दुरुपयोग करायचा, हे शिकावे कुणाकडून तर चीनकडून! असे म्हणण्याची वेळ सध्या आंतरराष्ट्रीय समुदायावर आली आहे. दक्षिण चीनच्या समुद्रात ठिकठिकाणी लष्करी तळ उभारून चीनने अनेक छोट्या आशियाई देशांच्या अस्तित्वासमोर आव्हान निर्माण केले आहे. पंचशीलच्या तत्त्वांचा चोळामोळा करीत १९६२ साली भारतावर आक्रमण करणार्‍या चीनने त्या युद्धाच्या परिणामाची भारताला आठवण करून देत एकप्रकारे खुलेआम धमकावलेही आहे. पंचशीलचे धोरण भारतच गुंंडाळू पाहत असल्याचा उलटा कांगावादेखील धूर्त आणि आक्रमणकारी चीनने चालविला आहे. अमेरिकेला मागे टाकत जागतिक महासत्ता बनण्याची चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. अनेक क्षेत्रांत चीनने अमेरिकेला मागे टाकले आहे. आपल्यासमोर कुणी आवाज काढू नये, आपण सांगू तेच खरे, असा अहंभाव चीनमध्ये आला आहे. मौलाना मसूद अजहरसारख्या कुख्यात दहशतवाद्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन चीनने चालविले आहे. लष्करी आणि आर्थिक ताकदीचा विचार करता चीनच्या तुलनेत भारत मागे आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्याचमुळे चीनबाबतचे धोरण ठरविताना देशाच्या राज्यकर्त्यांना सावधानतेने पावले उचलावी लागणार आहेत. दहशतवादाला प्रत्यक्षपणे खतपाणी घालत असलेल्या पाकिस्तानला चीनने आपला सर्वकालीन मित्र मानलेले आहे, ही तर केवळ भारताच्या दृष्टीनेच नव्हे, तर अमेरिकेसह दहशतवादाची फळे भोगत असलेल्या जगातील बहुतांश देशांची आगामी काळात कायमची डोकेदुखी बनणार आहे. साम-दाम नीतीचा वापर करीत, लोकशाहीची सारी आंदोलने चिरडून टाकत चीनने झपाट्याने प्रगती केली आहे. अमेरिकेला टक्कर देण्याची ताकद चीन निर्माण करू पाहत आहे. त्याच वेळी भारतदेखील आर्थिक विकासाच्या आधारे झपाट्याने प्रगती करीत आहे. वेगाने विकसित होत असलेल्या काही मोजक्या देशांच्या यादीत भारत आघाडीवर आहे. शेजारी देश आपल्याला आव्हान देऊन आहे, ही बाब चीनला रुचलेली नाही.
वाचवा ‘जंगलचा राजा!’
जंगलच्या राजाची- वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे, याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. एवढेच नव्हे, तर ती संख्या शाबूत राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत. जगातील वाघांची ७० टक्के संख्या केवळ भारतात असून, जगात अन्यत्र केवळ ३० टक्के संख्या आहे. १९७२ मध्ये देशातील वाघांची प्रथमच मोजदाद झाली होती आणि वाघांच्या घटत्या संख्येविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती. राजेरजवाड्यांनी केलेल्या शिकारींपूर्वी वाघांची संख्या देशात प्रचंड होती. नंतर ती हळूहळू कमी होत गेली. १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगर प्रकल्प हाती घेण्यात आला आणि त्यानंतर ही संख्या हळूहळू वाढू लागली. आज भारतात ५० व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांची संख्या वाढत असली, तरी संरक्षित क्षेत्रांचा आकार लहान होत चालल्याने वाघ पुन्हा संकटात सापडू शकतात. अन्नसाखळीचा सर्वोच्च बिंदू (अपेक्स ऍनिमल) मानल्या गेलेल्या वाघांची संख्या भारतात मोठी आहे. ‘जंगलचा राजा’ असे बिरुद मिरविणारा हा वाघ सध्या अनेक कारणांनी धोक्यात आला आहे. अधिवास आणि स्थलांतरवाटा नष्ट होण्यामुळे त्याचा वावर मर्यादित झाला आहे. शिवाय, खाद्याच्या कमतरतेची समस्या आहेच. जंगलांमध्ये अनावश्यक मानवी हस्तक्षेप आणि जमीनवापरातील बदलांमुळे अनेक वन्यजीव धोक्यात आले असून, निसर्गाचा समतोल त्यामुळे ढासळतो आहे. वाघ आणि हत्तींच्या प्रचंड संंख्येने भारताला जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. मात्र, ती टिकवून ठेवण्यासाठी काही नियम पाळण्याची गरज असताना संवर्धनाच्या विषयाकडे नेहमीच डोळेझाक होताना दिसते. वनव्यवस्थापन प्रभावी रीतीने होत नसतानाच, शिकार हे वाघांची संख्या कमी होण्याचे प्रमुख कारण ठरले आहे. मध्य भारतात आणि ईशान्य भारतात आजही काही आदिवासी विभागांमध्ये दाट जंगले अस्तित्वात आहेत. परंतु, तिथे वन्यजीव मात्र खूपच कमी राहिले आहेत. एक तर मांसासाठी त्यांची शिकार करण्यात आली किंवा त्यांचे अवयव विकण्यासाठी त्यांना ठार मारण्यात आले. स्थानिक लोकही शिकार करतात आणि थोड्या पैशांसाठी माफिया टोळ्यांचा घटकही बनतात.
वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणार्‍या माफियांचे साम्राज्य आपल्याकडे अमली पदार्थांची विक्री करणार्‍या माफियांएवढेच पसरलेले आहे. शिकारीमुळे वन्यजीव जसे धोक्यात आले, तसेच विविध मार्गांनी जमीनवापरात झालेल्या बदलांमुळेही त्यांचे अधिवास नष्ट झाले. जंगलांमधून जाणारे महामार्ग, खाणी, धरणे आणि तथाकथित इको टूरिझमच्या नावाखाली वाढलेला मानवी वावर तसेच बेजबाबदारपणे केलेला विकास, यामुळे गेल्या दहा वर्षांत वन्यजीवांपुढे अस्तित्वाचे संकट निर्माण केले आहे. संरक्षित क्षेत्रांबरोबरच त्यांच्या आसपासच्या क्षेत्रातही धोका वाढत आहे आणि यामागे शक्तिशाली लॉबी कार्यरत आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात तर वनसंवर्धनाकडे सपशेल डोळेझाक करून विकासाचे घोडे दामटवले जात आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, वनव्यवस्थापनाचा अभाव याबरोबरच आंतरराष्ट्रीय संवर्धन मानकेही यासाठी जबाबदार आहेत.
अभिजित वर्तक 
९४२२९२३२०१