राष्ट्रीय राजकारण प्रभावित करणारा घटनाक्रम!

0
100

अग्रलेख
बिहारमध्ये जे काही घडले, त्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होणार आहे. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत, कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत फारकत घेतली आणि भाजपासोबत हातमिळवणी करीत पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, हा सारा घटनाक्रम भारताच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारा ठरणार, यात शंका नाही. बिहारच्या राजकारणाला तर वेगळी कलाटणी मिळालीच आहे, पण राष्ट्रीय राजकारणही त्यामुळे बदलणार आहे. नितीशकुमार यांच्या निर्णयाचा परिणाम विरोधी पक्षांच्या ऐक्यावरही झाला आहे. विरोधी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्याचा चंग बांधलेल्या विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे, नितीशकुमार यांची स्वच्छ प्रतिमा आपल्या मदतीसाठी धावून येईल, आपण नरेंद्र मोदी यांचा सहज पराभव करू शकू, असा विरोधकांचा होरा होता. परंतु, नितीशकुमार यांनी भाजपासोबत जाऊन विरोधी पक्षांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले. नितीशकुमार यांना बिहारमध्ये सुशासन हवे होते आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या मंत्री-आमदारांनी तसे करण्यात अडचणी आणल्या होत्या. बिहारमध्ये पुन्हा ‘जंगलराज’ येते की काय, अशी भीती स्वत: नितीशकुमार यांना वाटायला लागली होती. त्यातून नितीशकुमार अस्वस्थ झाले होते. ही अस्वस्थताच त्यांना राजीनाम्याच्या निर्णयापर्यंत घेऊन गेली, यात शंका नाही. आपल्या स्वच्छ प्रतिमेशी कोणत्याही प्रकारची तडजोड नितीशकुमार यांना मान्य नव्हती. इतकी वर्षे राजकारणात राहिल्यानंतरही नितीशकुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप कधी लागला नाही, यातच सगळे आले! लालूपुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते. त्याबाबत लालूंनी बिहारच्या जनतेकडे स्पष्टीकरण द्यावे, एवढी साधी मागणी नितीशकुमार यांनी केली होती. परंतु, लालूंनी साधा खुलासा करण्याचेही सौजन्य न दाखविल्याने नितीशकुमार अधिकच अस्वस्थ झाले आणि त्यांनी थेट राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय त्यांची कार्यशैली लक्षात घेता योग्यच म्हटला पाहिजे. यापूर्वी जेव्हा बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत नितीशकुमार यांचे सरकार सत्तेत होते, तेव्हा बिहारमध्ये सुशासन आले होते. त्याच वेळी नितीशकुमार यांना ‘सुशासन बाबू’ अशी उपाधी मिळाली होती. या उपाधीला बट्‌टा लागू नये याची काळजी नितीशकुमार यांनी सातत्याने घेतली. परंतु, लालूंच्या राजदसोबत सत्तेत आल्यानंतर कुठेतरी या उपाधीला धक्का लागण्याचा धोका निर्माण झाला होता. हा धोका त्यांनी वेळीच ओळखला अन् अवघ्या वीस महिन्यांतच लालूंसोबतची युती तोडण्याचा धाडसी निर्णय नितीशकुमार यांनी घेतला. तो त्यांना घ्यावा लागला. भाजपासोबत जेव्हा बिहारमध्ये नितीशकुमार यांची सत्ता होती, त्या सत्ताकाळात नितीशकुमार यांनी बिहारला जंगलराजमधून मुक्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला. बिहारची जी अतिशय वाईट अवस्था झाली होती, त्यातून बिहारला सावरण्याचा चांगला प्रयत्न नितीशकुमार यांनी केला होता. त्याची आजही प्रशंसा होत असते. भाजपाचे सुशीलकुमार मोदी हे त्या वेळी उपमुख्यमंत्री होते. लालूपुत्र तेजस्वी यादव आणि सुशीलकुमार मोदी यांच्यात तसे बरेच अंतर आहे. एकीकडे अनुभव, परिपक्वता, प्रामाणिकपणा आणि दुसरीकडे याच्या अगदी उलट स्थिती होती. तसे तर नितीशकुमार यांनी तेजस्वीसोबत वीस महिने काढलेच कसे, हाही प्रश्‍नच आहे. नितीशकुमार यांनी २०१३ साली भाजपासोबतची सतरा वर्षे जुनी युती तोडली. कारण, २०१४ च्या निवडणुकीत रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे येऊ शकते, याची जाणीव नितीशकुमार यांना झाली होती. नितीशकुमार यांचा मोदींच्या नावाला विरोध होता. नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा दिला तर बिहारमधील आपल्या परंपरागत ‘व्होट बँकेला’ धक्का लागेल, मुस्लिम मतदार आपल्यापासून दुरावतील, अशी भीती त्या वेळी नितीशकुमार यांना वाटली आणि त्यातूनच त्यांनी भाजपाशी असलेली युती तोडत कॉंग्रेस आणि राजद यांचा बाहेरून पाठिंबा घेत सरकार चालविले. पुढे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा विरोधकांचा सुपडा साफ झाला तेव्हा नाइलाजाने नितीशकुमार यांनी कॉंग्रेस आणि लालूप्रसाद यांच्याशी हातमिळवणी करून भाजपाविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढविली. त्यात त्यांना यशही आले. भाजपाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या. नितीशकुमार यांच्या पक्षाला राजदपेक्षा कमी जागा मिळूनही मुख्यमंत्रिपदी त्यांनाच आरूढ करण्यात आले. परंतु, वीसच महिन्यांत नितीशकुमार यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी लालूंशी असलेले नाते तोडले. स्वत:चा, स्वत:च्या पक्षाचा स्वाभिमान गुंडाळून ठेवण्यापेक्षा खांद्यावरचे ओझे झटकून मोकळे झालेलेच बरे, असा विचार करीत नितीशकुमार यांनी जबरदस्त चाल खेळली अन् रात्रभरासाठी सत्ता गमावत ती पुन्हा प्राप्त केली. भारताला संघमुक्त करण्याची भाषा करणारे नितीशकुमार आता पुन्हा भाजपासोबत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या नसत्या तरच नवल! राजद आणि कॉंग्रेस यांच्याशी हातमिळवणी करीत बिहारमध्ये सरकार स्थापन करणे नितीशकुमार यांच्यासाठी भलेही सोपे राहिले असेल, पण नंतर वीस महिने कॉंग्रेस-राजदचे ओझे खांद्यावर घेत सरकार चालविण्याची करावी लागलेली कसरत नितीशकुमार यांना जमली नाही, हे स्पष्ट झाले आहे. राजद-कॉंग्रेसपेक्षा भाजपा बरी, हाच विचार त्यांनी केला असणार आणि सरकारही स्थापन केले असणार. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांची राजकीय कारकीर्द एकाच वेळी सुरू झाली. मात्र, दोघांचेही मार्ग, काम करण्याची शैली वेगळी राहिली आहे. त्यामुळेच जेव्हा बिहारमध्ये कॉंग्रेस, राजद आणि जदयू अशी महाआघाडी तयार झाली, तेव्हाच तिच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह लागले होते. ही महाआघाडी फार काळ टिकणार नाही, असे भाकीतही करण्यात आले होते. हिंदीत या आघाडीचे वर्णन ‘बेमेल’ असे करण्यात आले होते. मेळ न खाणार्‍या या आघाडीच्या सरकारमुळे बिहारमध्ये विकासाची प्रक्रिया जवळपास ठप्प झाली होती. संपूर्ण बिहारमधून ज्या वार्ता नितीशकुमार यांच्या कानी येत होत्या, त्यामुळे ते अस्वस्थ होत होते. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर होत चालली होती. आणखी काही काळ आपण राजदसोबत राहिलो, तर आजवर आपण जी पुण्याई कमावली आहे ती धोक्यात येईल, याची भीती नितीशकुमार यांना वाटली. तेजस्वी यादववर आणखी गंभीर आरोप लागतील, त्याची झळ आपल्यालाही पोहोचेल अन् मग जे नुकसान होईल, ते कधीही भरून निघणारे नसेल, यातूनच नितीशकुमार यांनी राजीनाम्याची मानसिकता तयार केली अन् शेवटी भाजपाची साथ घेतली. आता विरोधी पक्ष बेंबीच्या देठापासून बोंबलत सुटले आहेत की, नितीशकुमार यांनी जातीयवादाला जवळ केले आहे, त्यांनी भाजपाशी अभद्र युती केली आहे. विरोधक काहीही म्हणोत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांना पुढला म्हणजे २०१९ सालच्या निवडणुकीतला पराभवही स्पष्ट दिसत आहे! त्यातूनच ते नितीशकुमार यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत, हेही स्पष्ट आहे. नितीशकुमार यांच्या निर्णयाचा २०१९ च्या निवणुकीतील विरोधी पक्षांच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होईल, यात शंका नाही.