अन् तो जिवंतच होता…

0
175

तभा वृत्तसेवा
पुलगाव, १० ऑक्टोबर
तो मुलीसाठी मुलं पाहून आला… दुसर्‍या दिवशी सकाळी चहा घेतला आणि त्याला ब्रेन हॅम्ब्रेजचा झटका आला… घरच्यांनी सावंगीच्या रुग्णालयात भरती केले. तेथून त्याला नागपुरात हलविण्यात आले. आर्थिक नियोजन नसल्याने तिथल्या डॉक्टरांनी जुजबी तपासणी करून त्याला परत पाठवले. आज, १० रोजी सकाळी त्याला नागपुरातून परत आणत असताना त्याचे शरीर थंड वाटल्याने घरच्यांनी त्याला मृत समजले… नातेवाईकांना निरोपही गेले… घरात शोकमग्न वातावरण अन् अंत्ययात्रेची तयारीही झाली… दरम्यान, त्याच्या हालचाली डॉक्टर असलेल्या पुतण्याच्या लक्षात आल्या… त्याने काकाला पंपिंग केले आणि त्याचा श्‍वासोच्छवास सुरू झाला. तो आज कोमात असला तरी जिवंत असल्याने परिवारातील चेहर्‍यांवर हसूू फुलले.
येथील आठवडी बाजार परिसरातील दिनेश पारधेकर (६१) हा शनिवारी, ७ रोजी अमरावती येथे मुलीकरिता वरसंशोधनासाठी गेला. रविवारी सकाळी चहा-पाणी होताच त्याला ब्रेन हॅम्ब्रेजचा झटका आला. त्याला परिवाराने सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती केले. परंतु, तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथे एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचार करण्यासाठी असमर्थ असल्याने त्याला घरी परत नेण्यात आले. दरम्यान, त्याचे शरीर थंड पडल्याने घरच्यांनी दिनेशचा मृत्यू झाल्याचे समजून नातेवाईकांना निरोप दिला. नातेवाईकही जमा झाले. सर्वत्र रडारड आणि अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. दरम्यान, डॉक्टर असलेला पुतण्या पियूषला काही तरी शंका आल्याने त्याने काकाला पंपिंग करताच दिनेश पारधेकर याचा श्‍वासोच्छवास सुरू झाला. परंतु, ब्रेनहॅम्ब्रेजमुळे तो आजही कोमात असल्याने त्याला सेवाग्रामला पुन्हा भरती करण्यात आले. रडारड सुरू असलेल्या पारधेकर यांच्या घरात पुन्हा आनंदाचे वातावरण तयार झाले. परंतु, हा चमत्कार नसून मानवी चूक होती. दिनेश पारधेकर यांची मुलगीही डॉक्टर आहे, हे उल्लेखनीय!