संघ स्वयंसेवकांचे हत्यासत्र थांबणार केव्हा?

0
27

वाचकपत्रे
केरळातील कम्युनिस्ट शासनाचे गुंड गेल्या कित्येक वर्षांपासून संघ स्वयंसेवक आणि भाजपा कार्यकर्त्यांची सर्रास हत्या करीत आहेत. त्यांच्या घरांना आगी लावणे, महिलांवर अत्याचार करणे हे या स्वतंत्र भारतात सुरू आहे. कम्युनिस्ट विचारसरणीचा पायाच क्रूर हिंसाचाराचा वापर करून सत्ता हस्तगत करणे हा आहे. त्यांचा लोकशाहीवर मुळीच विश्‍वास नाही. तरी त्यांना भारतात स्थान आहे, ते केवळ नेहरूंच्या लांगूलचालनामुळे! हे हत्यासत्र ताबडतोब थांबले पाहिजे. केंद्रात भाजपाचे सरकार आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी वारंवार संताप व्यक्त केला आहे. पण, आता त्याने भागणार नाही. या शासनाविरुद्ध कडक कारवाई केल्याशिवाय ही चिनी बांडगुळं शांत बसणार नाहीत. प्रसंगी राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आल्यास तो पर्यायही वापरावा.
वसंत देशपांडे
नागपूर

गुजरातमधील बंधुभाव देशासाठी आदर्श!
गुजरातेत सध्या महापुराने हाहाकार उडाला आहे. शासनाच्या मदतीसह काही स्वयंसेवी संघटनाही पुढे सरसावल्या आहेत. राज्यातील बनासकांठा जिल्ह्यात धनेरा येथे सिद्धविनायक आणि सतीमाता मंदिरात पाणी ओसरल्यावर १० ते १५ फूट गाळ साचला होता. अशा वेळी जामिया-उलेमा-ए-हिंदचे कार्यकर्ते पुढे सरसावले आणि त्यांनी श्रमदानातून संपूर्ण गाळ काढून मंदिर स्वच्छ केले. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे हे उदाहरण निश्‍चितच देशातील समस्त मुस्लिम बांधवांसाठी प्रेरणादायी आहे. मिळूनमिसळून राहताना जो बंधुभाव वृद्धिंगत होतो, त्याचा परिणाम बनासकांठा जिल्ह्यात दिसून आला. या सर्व मुस्लिम बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन!
मनोहर देशमुख
यवतमाळ

गाढवांनाही अक्कल असते; यांना केव्हा येणार?
भारताचे राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर देशाला संबोधित करताना, आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव का घेतले नाही, असा आक्षेप कॉंग्रेसजनांनी घेतला. राष्ट्रपतींनी आपल्या मनोगतात कुणाचे नाव घ्यावे आणि कुणाचे नाही, हा सर्वस्वी त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्‍न आहे. भारताने देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत हक्क प्रदान केला आहे. पण, कॉंग्रेसच्या नेत्यांना अक्कल येईल तेव्हा ना! त्यांची मजल राष्ट्रपतींवर कटाक्ष करण्यापर्यंत गेली याचा अर्थ ते गाढवच असले पाहिजे! दुसरी गोष्ट म्हणजे नेहरूंनी देशासाठी असे काय केले की, त्यांना डोक्यावर घेऊन नाचावे? तेव्हा कॉंग्रेसने झाकली मूठ सवालाखाचीच ठेवावी, असा सल्ला त्यांना द्यावासा वाटतो. त्यांनी जर मूठ उघडली तर मग बर्‍याच बाबी नेहरूंच्या विरोधात जाणार्‍या आहेत, हे त्यांना माहीत असणारच! तेव्हा त्यावर त्यांना चर्चा हवी आहे का, हेही त्यांनी सांगावे.
मधुकर अमृत डबीर
महाल, नागपूर

लालू, तेजस्वीचा थयथयाट काय कामाचा?
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन संपूर्ण राजकीयवर्तंुळाला मोठा धक्काच दिला. अवघ्या काही तासांत भाजपाच्या सहकार्याने ते पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमानही झाले. हे पाहून लालूप्रसाद यादव आणि लालूपुत्र उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी जो थयथयाट चालविला आहे, तो पाहून खूपच करमणूक होत आहे. तसा लालूंना शिमगा खेळण्याचा भारी शौक! दरवर्षी म्हणे म्हशींच्या गोठ्यात ते होळी खेळतात. कारण, त्यांच्या चार्‍याचे महत्त्व किती, हे ते जाणून आहेत! मग सारे पत्रकारही त्यात सामील होतात. पण, होळी येण्यापूर्वीच त्यांनी शिमगा सुरू केला आहे. हा शिमगा तीन दिवस चालेल आणि मग आयकर आणि ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
मधुकर चव्हाण
अमरावती

स्टेट बँकेच्या बचत रकमेवर व्याज कपात
स्टेट बँकेने बचत ठेवींवरील अर्धा टक्का व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच या बँकेतील व्याजदर कमी. ते आणखी कमी केल्यामुळे लाखो निवृत्त कर्मचार्‍यांचे नुकसान होणार आहे. वास्तव हे आहे की, स्टेेट बँकेचे हजारो कोटींचे कर्ज उद्योगपतींनी बुडविले आहे. तारण किती हे न पाहता, सर्रास हजारो कोटींचे कर्ज याच स्टेट बँकेने वाटले होते. त्याची वसुली न करता, त्याची भरपाई निष्पाप नागरिकांकडून करणे जुलमी आहे. तेव्हा स्टेट बँकेने आपल्या निर्णयात बदल करावा. अन्यथा मग आयुष्याची सारी रक्कम निवृत्त पेन्शनधारकांना काढून घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.
भाऊराव देशपांडे
नागपूर