गडचिरोलीचा गौरव

0
27

वेध
आदिवासीबहुल आणि दुर्गम म्हणून ओळखल्या जाणार्‍या गडचिरोली जिल्ह्याचा उल्लेख देशाच्या २५ मागास जिल्ह्यांत अव्वल स्थानावर केला जातो. गडचिरोलीला नक्षल समस्येने ग्रासले असल्याने दुर्गम भागात शिक्षणाच्या फारशा संधी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. मात्र, आदिवासी व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात ‘दंडकारण्य शैक्षणिक व विकास संशोधन’ नावाची संस्था उभी राहिली. या संस्थेचे संस्थापक व शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव मुनघाटे यांनी गरीब मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. कुरखेडा येथे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विद्याभारती नावाचे महाविद्यालय स्थापन केले. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनीसुद्धा, वडील गोविंदराव मुनघाटे यांचा वसा पुढे चालवीत या महाविद्यालयाचे व गडचिरोली जिल्ह्याचे नाव आता जागतिक पातळीवर पोहोचविले आहे. युनेस्कोतर्फे चीनमधील शेंजेन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांची झालेली निवड आणि त्या परिषदेसाठी त्यांची उपस्थिती ही बाब गडचिरोली जिल्ह्यासाठी गौरवाची ठरली आहे. डॉ. मुनघाटे यांनी नुकत्याच झालेल्या या परिषदेत ‘उच्च शिक्षणातील गुणवत्तेची हमी व आव्हाने’ या विषयावर आपले व्याख्यान दिले. आशिया खंडातील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञमंडळींना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. संपूर्ण भारतातून केवळ तिघांनाच या परिषदेला उपस्थित राहण्याची संधी लाभली आणि यात प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचा समावेश होता. ही बाब मागास म्हणून ओळखल्या जाणार्‍या संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे. या परिषदेत राजाभाऊंनी उच्च शिक्षणात गुणवत्तेची हमी देण्यासोबतच उच्च शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या गरजा, नावीन्यपूर्ण संशोधन व आव्हाने यावर मत मांडले. आतापर्यंत डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून, त्यांनी विविध शैक्षणिक परिषदांमध्ये सहभागी होऊन आपले योगदान दिले आहे. गडचिरोलीला एकीकडे मागास म्हणून हिणवले जात असतानाच दुसरीकडे, या जिल्ह्यातील प्राचार्य डॉ. मुनघाटे यांची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड होऊन त्या परिषदेत त्यांचे व्याख्यान होणे, ही बाब शैक्षणिक क्रांतीसाठी एक मोलाचे पाऊल आहे.
लोहप्रकल्प साकारतोय्!
गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकही प्रतिष्ठित उद्योग नाही. विपुल खनिजसंपत्ती असलेला हा गर्भश्रीमंत जिल्हा- उद्योगविरहित जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोली जिल्ह्यात जमशेदजी टाटा यांना लोहप्रकल्प उभारायचा होता. त्यासाठी त्या वेळी टाटांनी या जिल्ह्याची पाहणी करून लोहप्रकल्प उभारण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्यात आता राज्य सरकार व लॉयड मेटल्स ऍण्ड एनर्जी कंपनीच्या वतीने लोहप्रकल्प साकारला जातोय्. सुरजागड येथे उच्च दर्जाचे लोहखनिज असून या खनिजाचे उत्खनन करून गडचिरोली जिल्ह्यातच लोहप्रकल्प उभारला जावा, अशी स्थानिक जनतेची मागणी होती. या मागणीचा सन्मान करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आणि दोन महिन्यांपूर्वी या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सोहळा उरकला. गडचिरोली जिल्ह्यात कुठलेही उद्योग नसल्याने या जिल्ह्यात बेरोजगार युवकांची फौज उभी झाली आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील किमान चार ते पाच हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर वन आणि खनिजसंपत्ती आहे. मात्र, नक्षल्यांच्या सावटाखाली असलेल्या या जिल्ह्यात आजवर एकाही उद्योगपतीला उद्योग उभारता आला नाही. परिणामी, हा गर्भश्रीमंत जिल्हा मागासलेपणाच्या काळ्या यादीत टाकला गेला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जिल्ह्याच्या विकासकामांना गती लाभली असून जिल्ह्यात रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आणि आता लोहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाल्याने जिल्ह्याची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सुरजागड येथे मोठ्या प्रमाणावर लोहखनिज असल्याने या खनिजाचे उत्खनन करून प्रक्रिया करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. जमशेदजी टाटांनी त्या काळी सुरजागड येथे लोहप्रकल्प उभारण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र, त्यावेळी वाहतुकीची साधनेच उपलब्ध नव्हती. मात्र, लॉयड मेटल्स ऍण्ड एनर्जी कंपनीच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात हा लोहप्रकल्प उभारला जातोय्. स्थानिकांनाच या प्रकल्पात रोजगार मिळावा, अशी अट असल्याने कंपनीच्या वतीने आलापल्ली येथे स्थानिक बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी कंपनीने आता कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. आ,लापल्लीच्या आयटीआय केंद्राला दत्तक घेऊन कंपनीच्या संचालकांनी खर्‍या अर्थाने स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. हा प्रकल्प गडचिरोलीत पूर्णत्वास आल्यास गडचिरोलीची वाटचाल विकासाच्या दिशेने नक्कीच सुरू होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाकडे जातीने लक्ष घालून प्रकल्प लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
नंदकिशोर काथवटे
९४२३१०१९३८