दहशतवादावर आणखी एक घाला!

0
96

अग्रलेख
सरकारने जम्मू-काश्मीरचा विषय आता जास्तीच गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. आजवर खोर्‍यातील विघटनवादी कारवायांबाबत सरकार तेवढे गंभीर नव्हते असे नाही; पण आज ना उद्या तेथील आझादीचे नारे बंद होतील, शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पावले टाकली जातील, असा केंद्राचा होरा होता. पण, कोट्यवधींची केंद्रीय मदत, सतत झुकते माप देऊनही ज्या वेळी येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेरच जात असल्याचे लष्कराला निदर्शनास आले, त्या वेळी फौजा सावध झाल्या आणि त्यांनी, सरकारने दिलेल्या अधिकारांचा वापर करून एकेका ‘मोस्ट वॉण्टेड’ दहशतवाद्याला टिपून मारायला प्रारंभ केला. दहशतवाद्यांना टिपून मारले तर खोर्‍यातील जनमानस संतप्त होते, विद्यार्थी रस्त्यावर येतात आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करतात. त्यांची विरोधाची ही पहिली पायरी असते. पण, लष्कर स्वस्थ बसून राहिले तरी खोर्‍यातील दहशतवाद कमी होण्याचे नावच घेत नव्हता. अखेर जम्मू-काश्मीर पोलिसांना विश्‍वासात घेऊन भारतीय लष्कराने मोहीम आखली आणि अतिरेक्यांचे कंबरडे मोडण्यास प्रारंभ झाला. याच मोहिमेंतर्गत गेल्या काही दिवसांमध्ये लष्करच्या टॉप मोस्ट अतिरेक्यांचा खात्मा केला जात आहे. बुरहान वानीपासून सुरू झालेले हे सत्र आज खोर्‍यात टिपल्या गेलेल्या लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू दुजानापर्यंत येऊन ठेपले. अबूच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरोधात निर्णायक मोहीम उघडलेल्या भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. पुलवामा जिल्ह्यातील काकापोरामध्ये सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मा केला. भारतीय सैन्याच्या कारवाईत दुजानासह अन्य दोन दहशतवादीही मारले गेले. काकापोरा येथील एका घरात दुजाना आपल्या दोन-तीन साथीदारांसोबत लपला असल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलाने, जिथं दहशतवादी लपले आहेत, त्या घरालाच स्फोटकांनी उडवून दिलं! अशा रीतीने खोर्‍यातील आणखी तीन दहशतवादी जवानांच्या रडारवर आले. सरकारने लष्कराचे हात बांधून ठेवले असते, तर ही कारवाई करता आली नसती. कुठल्या अतिरेक्याच्या खात्म्यानंतर खोर्‍यात हिंसाचार उफाळतो म्हणून लष्कराने पावले नसती टाकली, तर जनतेच्या मनात दहशत पसरविणारा अबू दुजाना भारतीय लष्कराच्या रडारवर आला नसता आणि त्याने आणखी मोठी दहशतवाद्यांची फौज उभी करून, ती भारताविरुद्ध उभी केली असती. विघटनवादी नेते नाराज होतात असा विचार केला असता, तर लष्कराच्या हाती हे यश आले नसते. खरे तर भारतीय लष्कर मोठी कारवाई करीत नाही, असा भ्रम पसरल्याने अतिरेक्यांचे फावत होते. ते जास्तीच उन्मादी कृत्ये करण्यास पुढे येत होते. राज्यात सत्तेवर असलेल्या एका घटक पक्षाचे आणि सध्या विरोधी पक्षात असलेल्या कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचेही विघटनवाद्यांना समर्थन आहेच. ते नाकारले जाऊच शकत नाही! पण, या सार्‍या शक्तींचा विरोध झुगारून भारतीय लष्कर, गृहमंत्र्यांनी त्यांना दिलेल्या खुल्या ढीलचा योग्य प्रकारे उपयोग करीत आहेत. बुरहान वानी असो की अबू दुजाना, ही पाकिस्तानात बसलेल्या हाफिज सैद, सलाहउद्दिन, दाऊद इब्राहिम आदींच्या हातातील प्यादी आहेत. पाकिस्तानातून जसे आदेश येतील, त्या तालावर नाचणार्‍या या कठपुतळ्या आहेत; आणि या कठपुतळ्यांना आर्थिक मदत करणार्‍या काही फुटीरवादी नेत्यांना अटक करून लष्कराने त्यांच्यादेखील मुसक्या बांधल्या आहेत. सात फुटीरवादी नेत्यांना अटक करून, त्यांना चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आले आहे. शहीद उल इस्लाम या नेत्याकडे काश्मीर खोर्‍यातील मोस्ट वॉण्टेड अतिरेक्यांची यादी सापडली. त्याच्यावर, खोर्‍यात दहशतवाद वाढवण्यासाठी पाकिस्तानी एजन्सींकडून पैसा स्वीकारल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तयार केलेली ही यादी शहीद उल इस्लामकडे कशी आली, याचादेखील सध्या तपास सुरू आहे. तो जम्मू-काश्मीर पोलिसांचा खबर्‍या होता काय? याची तपासणी सुरू आहे. काश्मिरात सक्रिय असलेल्या १५८ अतिरेक्यांची यादी जम्मू-काश्मीर पोलिसांनी तयार केली होती. त्यांची नावेदेखील शाहीद इस्लामजवळ उपलब्ध झाली आहेत. हा सारा प्रकार चीड आणणारा आहे. आपली सुरक्षायंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करते आणि त्यांच्या योजना अतिरेक्यांच्या किंवा फुटीरवाद्यांच्या हाती लागतात, हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच प्रकार आहे. आपल्यापैकीच काही जण अतिरेक्यांना मिळालेले असल्याशिवाय अशा गुप्त याद्या जाहीर होण्याची शक्यता नाही. अशा घरभेद्यांना शोधून काढून त्यांना नेस्तनाबूत करण्याचीदेखील गरज आहे. यासाठी शिवाजी महाराजांसारखा ‘गनिमीकावा’ केला जायला हवा. सरकारने भारतीय लष्कराला दिलेल्या मोकळिकीचा हळूहळू असर दिसू लागला आहे. गेल्या ३-४ वर्षांच्या तुलनेत यंदा लष्कराने तुलनेने कितीतरी अधिक अतिरेक्यांना पाणी पाजले आहे. यंदाच्या वर्षात जुलै महिन्यापर्यंत लष्कराने ९२ अतिरेक्यांना यमसदनी पाठविले आहे. २०१६ या वर्षाशी तुलना करता, हा आकडा याच काळात गेल्या वर्षी ७९ होता. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कार्यकाळात २०१२ आणि २०१३ मध्ये अनुक्रमे वर्षभरात हा आकडा ७२ आणि ६७ च्या आसपास होता. लष्कराने केवळ अतिरेक्यांचा खात्मा करण्याचीच मोहीम हाती घेतलेली नाही, तर खोर्‍यातील लोकांना मानसिक आधार देण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सुदूर गावात नैसर्गिक आपत्तींच्या वेळी गरीब लोकांना दूध पुरवणे, पाणी उपलब्ध करून देणे, आजारपणात औषधांची व्यवस्था करणे, हिंसाचारग्रस्त भागात मुलांच्या शिक्षणाची सोय करणे… अशी अनेक कामे लष्कराच्या तुकड्यांमार्फत सुरू आहेत. आम्ही येथे तुमच्यावर हुकुमत गाजावायला नाही, तर आपल्या मदतीसाठी आलो आहोत, असा विश्‍वास हळूहळू जागवला जात आहे. खोर्‍यातील सार्‍याच समाजबांधवांचा आझादीला पाठिंबा असल्याचा जो लोकांमध्ये गैरसमज पसरलेला आहे, तो दूर करण्याचे प्रयत्न स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरू आहेत. काश्मीरचा इतिहास, या क्षेत्राचे भौगोलिक आणि धोरणात्मक महत्त्व, या भागाची संस्कृती, येथील आध्यात्मिक चळवळी, तेथील पर्यटन, नृत्य, संगीत, कलाकुसर… आदी सार्‍यांचा अभ्यास करणारी एक मोठी टीम देशभरात उभी होत आहे. जम्मू-काश्मीरला अतिरेक्यांच्या आणि विघटनवाद्यांच्या भरोशावर सोडले आहे, असे कुणाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून स्वयंसेवी संस्था उभ्या होत आहेत आणि अस्वस्थ काश्मीरचे पुन्हा नंदनवनात रूपांतर करण्याच्या तयारीत लागत आहेत. एक मात्र खरे, एकीकडे दहशतवाद्यांचा खात्मा आणि दुसरीकडे शांततेचे प्रयत्न, एका हातात धार्मिक ग्रंथ आणि दुसर्‍या हातात शस्त्र घेतल्याशिवाय भारताचा जम्मू-काश्मिरात दबदबा निर्माण होणार नाही. त्यामुळेच लष्कराच्या कारवाईचे समर्थन करताना लोकांना धर्माच्या मार्गाने चालण्यास लावण्याच्या सरकारच्या प्रयत्नांच्या यशस्वितेची कामना करू या…!