योगी आदित्यनाथ यांचे स्तुत्य निर्णय!

0
26

वाचकपत्रे
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच काही जनहितार्थ निर्णय घेतले आहेत. त्यात तरुण लोकांना, संघाची माहिती असलेली पुस्तके देऊन त्याबद्दल माहिती विचारणे. त्यामुळे त्यांना इतिहास कळेल व देशभक्तीची भावना जागेल. दुसरा निर्णय म्हणजे, सामूहिक विवाह करणार्‍यांना प्रोत्साहन म्हणून नववधूच्या खात्यात २० हजार रुपये जमा करणार. तसेच संपूर्ण खर्च सरकार उचलणार. तिसरा निर्णय म्हणजे माफिया, गुंड, अट्टल गुन्हेगार, खंडणीखोर यांच्या मुसक्या बांधण्यासाठी विशेष पथकांची स्थापना. अखिलेश यादव यांच्या काळात हे सर्व गुन्हेगार मोकाट होते. आता या सर्वांना तुरुंगात टाकणे किंवा त्यांनी शस्त्रांनी प्रतिकार केल्यास ठार मारणे, असेही आदेश योगींनी दिले आहेत. हे तिन्ही निर्णय जनतेला मोठा दिलासा देणारे आहेत. एक योगी आपल्या कल्पकतेने समाजाचे कल्याण व हित कशा प्रकारे साधू शकतो, हे योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले आहे.
ना. म. तायडे
९८९०३९५६१६

भ्रष्ट अधिकार्‍यांना घरचा रस्ता दाखविणार!
मोदी सरकारने, गेल्या तीन वर्षांत भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी अनेकविध योजना आपल्या सर्व मंत्रालयांमध्ये राबविल्या, तरीही काही अधिकारी कामचुकार आहेतच. त्यातही आता मोदींनी भ्रष्ट अधिकार्‍यांना वठणीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. अशा बड्या बाबू लोकांची यादी मागवून त्यांच्यावरील आरोप, त्यांचे गांभीर्य, चौकशीचे अहवाल आाणि निष्कर्ष याचा आढावा घेऊन जे कुणी दोषी आढळतील, त्यांची यादी थेट आयकर विभाग आणि ईडीला पाठविण्यात येणार आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनात पारदर्शिता आणायची असेल तर घरापासूनच सुरुवात केली पाहिजे, हा मंत्र लक्षात ठेवून मोदींनी ही धडक मोहीम हाती घेतली आहे. सुमारे ३०० अधिकारी व कर्मचार्‍यांचा या यादीत समावेश आहे. दोषींची यादीही जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे दूध का दूध आणि पानी का पानीही होऊन जाईल.
प्रशांत वरंभे
नागपूर

अहमद पटेल यांच्या विजयाला धोका?
सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या विजयासाठी कॉंग्रेसचे नेते कधी नव्हे एवढे कामाला लागले आहेत. गुजरातमधून राज्यसभेवर जाण्यासाठी ते निवडणूक लढवीत आहेत. पण, तेथे बलवंतसिंह राजपूत हे तिसरे कॉंग्रेस बंडखोरही उभे झाल्यामुळे अहमद पटेल यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. केवळ ४२ आमदार सध्या कॉंग्रेसजवळ आहेत. त्यातून चार-पाच फुटले तरी पटेल यांचा पराभव निश्‍चित आहे. हे पाहून ममता बॅनर्जी यांनी पटेल यांना प. बंगालमधून उभे करावे, अशी ऑफर दिली आहे. ही ऑफर राहुल गांधी यांनी नामंजूर केली आहे. आधीच एवढी बदनामी, त्यात पळ काढला ही दुसरी बदनामी कशासाठी? म्हणून त्यांनी सारी शक्ती कॉंग्रेस आमदारांवरच लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. ८ ऑगस्ट जवळ आहे. तेव्हा पटेल यांचे काय होते, हे पाहायचे.
विजय पाटील
नागपूर

नक्षलवाद्यांच्या पैशावरही नजर!
बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांच्या सीमा नेपाळला लागून असल्यामुळे नेपाळमधून नक्षलवाद्यांना आर्थिक रसद येत असल्याच्या माहितीवरून आता तेथे निगराणी आणखी कडक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा पैसा प्रामुख्याने चीनकडून येत होता. पण, आता पाकिस्तानही नक्षल्यांना पैसे पुरवीत असल्याचा गृह विभागाचा कयास आहे. या पैशाचा ओघ काश्मिरातील दहशतवादी आणि नक्षली यांच्या मध्यस्थीने जात असावा, अशा शंकेवरून ही गस्त अधिक कडक करण्यात आल्याचे बातम्यांत म्हटले आहे. मागे पकडल्या गेलेल्या नक्षल्यांकडून चिनी शस्त्रे जप्त करण्यात आली होती. हा दुहेरी धोका लक्षात घेता, सतत सतर्क राहण्याची गरज आहे.
विनोद साबळे
यवतमाळ

एकाच पावसात रस्ते
कसे काय खराब होतात?
राज्यात थोडाजरी पाऊस पडला की, अगदी नवे रस्ते उखडले जातात, अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडतात. असे का होते, याचे कारण कुणीही सांगत नाही. कारण, राजकारणी- मग ते कोणत्याही पक्षाचे असोत- ते आणि कंत्राटदार यांचे संगनमत असते. केवळ कमिशनपोटी कंत्राटदार निम्न दर्जाचे रस्ते चकचकीत करून देतात. पण, त्यासाठी लागणारा भराव भरत नाहीत. परिणामी हे खड्डे पडतात, हे खरे कारण आहे. अनेक राष्ट्रीय महामार्गांचीही हीच स्थिती आहे. नितीन गडकरी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, असे सुचवावेसे वाटते.
अशोक गजभिये
नागपूर