क्रिकेट आणि ऑलिम्पिक

0
26

वेध
देशात फारच कमी देश क्रिकेटचा खेळ खेळत असले, तरी आशिया खंडात मात्र या खेळाचा मोठा दबदबा आहे. जे खेळ जगात सर्वाधिक खेळले जातात ते खेळ मात्र आशिया खंडात अजूनपर्यंत तरी आपला बोलबाला निर्माण करू शकले नाहीत. आज जगात सर्वाधिक प्रमाणावर फुटबॉल आणि बास्केटबॉलचा खेळ खेळला जातो. याशिवाय इतरही अनेक खेळ आहेत की, जे जगातील बहुतांश सर्वच देशांत खेळले जात आहेत. मात्र, क्रिकेट हा खेळ बोटांवर मोजण्याइतक्या देशांत खेळला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसी या जागतिक संघटनेमध्ये फक्त सुमारे ११ देशांच्या संघटनांनाच नियमित व संलग्नित सदस्यत्व मिळाले आहे. या शिवाय काही लहान देश सहयोगी सदस्य आहेत. मात्र, क्रिकेट खेळाची वाढती लोकप्रियता आणि त्यामुळे येणारा पैशाचा ओघ लक्षात घेता, या खेळाचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात यावा, अशी एक मागणी अलीकडेच समोर आली होती. मात्र, त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विरोध केला आहे. आता आयसीसीने बीसीसीआयचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची माहिती आहे. क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील प्रवेशासाठी आयसीसीने प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती आहे. इतरही काही संलग्नित सदस्यांचाही त्याला विरोध असल्याची माहिती आहे. खरे पाहाता क्रिकेटची लोकप्रियता जगात वाढविण्यासाठी ऑलिम्पिकसारखी स्पर्धा नाही. मात्र, आयसीसीशी संलग्नित सदस्यांच्या मनात काय आहे, त्यांचे तेच जाणोत. विरोध करणार्‍यांमध्ये बीसीसीआयही आघाडीवर असल्याची माहिती आहे. आयसीसीशी संलग्नित प्रमुख सदस्य आणि खेळाडू यांची जर मंजुरी असेल, तर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करायला कोणतीही अडचण जाणार नाही, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आता भारताच्या भूमिकेकडे आयसीसीचे लक्ष लागले आहे. क्रिकेट हा मुळातच ऑलिम्पिक खेळ नसल्यामुळे त्याचा या स्पर्धेत समावेश केला जाऊ शकत नाही, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. अलीकडच्या काळात क्रिकेट आणि इतरही खेळांबाबतीत भारतात व्यावसायिकता वाढू लागली आहे. क्रिकेटचे तर जणू वेडच लागले आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे मन वळविणे गरजेचे आहे. आणखी एका बाजूचा विचार केला, तर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर भारताचे पदकतालिकेतील स्थान निश्‍चित समजले जाऊ शकते. त्यामुळे पदकतालिकेतही भारत थोडा वर सरकू शकतो.
पुन्हा चर्चा
२९ ऑगस्ट जवळ येऊ लागला आहे. हा दिवस क्रीडाक्षेत्रासाठी मोठा महत्त्वाचा दिवस आहे. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस… हा दिवस संपूर्ण भारतभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणूनही साजरा केला जातो. ज्या व्यक्तीने भारताला हॉकीत सोनेरी दिवस दाखविले… ज्या व्यक्तीचा पुतळा राजधानी नवी दिल्लीतील स्टेडियममध्ये उभा करण्यात आला आहे… ज्या व्यक्तीचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो… अशा व्यक्तीला- भारताच्या रत्नाला- अजूनपर्यंत केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केलेले नाही. त्यांच्या जयंतीचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतशी ‘भारतरत्न’ची मागणी पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागली आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार ‘भारतरत्न’च्या यादीत खेळाचा समावेश नव्हता. या आधीच्या सरकारच्या काळात नियमात बदल करून त्यात खेळाचा समावेश करण्यात आला. तेव्हा ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ बहाल केला जावा, अशा मागणीने जोर धरला होता. मात्र, तत्कालीन संपुआ सरकारने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ किताब बहाल करून या वादावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ध्यानचंद यांच्या चाहत्यांनी तसेच हॉकीप्रेमींनी त्याबाबत आपली नाराजी जाहीरपणे प्रकट केली होती. आता पुन्हा एकदा ही मागणी पुढे करण्यात आली आहे. त्या वेळी सचिनऐवजी ध्यानचंद यांना हा सन्मान बहाल करण्यात आला असता आणि भविष्यात सचिनलाही त्या पुरस्काराने सन्मानित केले गेले असते तर काही बिघडले नसते. मात्र, कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारने तेव्हाही खेळाचा वापर राजकारणासाठी करून बघितला. आगामी लोकसभा निवडणुकीत सचिनच्या चाहत्यांचे आपल्याला समर्थन प्राप्त होईल व आपण मोदीलाटेत टिकाव धरू शकू, अशी कदाचित कॉंग्रेसची अपेक्षा होती. मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला. मोदीलाटेत कॉंग्रेस पुरती वाहून गेली. आता मोदी सरकार आले आहे. हे सरकार आले तेव्हापासून दरवर्षी साधारणत: ऑगस्ट महिन्यात ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ किताब बहाल करावा, ही मागणी जोर धरत असते. राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा झाला रे झाला की, मग मात्र ही मागणी मागे पडते. जेव्हा केव्हा ‘भारतरत्न’ची घोषणा अपेक्षित असते तेव्हा पुन्हा ही मागणी जोर धरते. यापेक्षा चाहत्यांनी वर्षभर ही मागणी लावून धरली, तर त्याचा निश्‍चित फायदा होईल, असे वाटते. या शिवाय सरकारनेही या प्रकरणी जास्त ताणून न धरता क्रीडाप्रेमींच्या मागणीचा मान ठेवून तसेच ध्यानचंद यांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ बहाल करण्यास काहीच हरकत नाही. ज्या व्यक्तीच्या जन्मदिनी खेळातील सर्र्वोच्च पुरस्कार बहाल केले जातात अशी व्यक्ती देशातील सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरू शकत नाही, हे दुर्दैव आहे. यातून केंद्र सरकारने मार्ग काढायला हवा किंवा मग ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देता येऊ शकत नाही, हे कारणांसह जाहीर करून टाकावे व या संदर्भातील मागणीवर कायम पडदा पाडून टाकावा, असेच या निमित्ताने म्हणावेसे वाटते.
– महेंद्र आकांत
९८८१७१७८०३