नितीशकुमार यांचे राजकीय शहाणपण!

0
62

दिल्लीचे वार्तापत्र
महाआघाडीतील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत नितीशकुमार यांनी राजदचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांना चांगलीच धोबीपछाड दिली आहे. या धक्क्यातून लालूप्रसाद यादव अद्याप सावरले नसल्याचे त्यांच्या मंगळवारच्या, तर त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या बुधवारच्या पत्रपरिषदेवरून दिसून आले आहे. या दोन्ही पत्रपरिषदेत या बापलेकांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. लालूप्रसाद यादव यांनी तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा उल्लेख ‘राजकारणातील पलटूराम’ असा केला आहे. तर, तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा असल्याचा आरोप केला. नितीशकुमार यांच्यासोबत सरकार चालवताना लालूप्रसाद आणि तेजस्वी यादव यांना या आरोपाचे स्मरण का झाले नाही?
नितीशकुमार यांच्या राजीनाम्याने लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव दुखावले गेले, हे स्पष्ट आहे. सामान्यपणे जो राजीनामा देतो, त्याचे नुकसान होत असल्याचे राजकारणात मानले जाते. पण, नितीशकुमार यांच्या राजीनाम्याने राजकारणात कधी नव्हे एवढा चमत्कार झाला. राजीनामा देऊनही नितीशकुमार यांचे कोणतेही नुकसान झाले नाही, उलट त्यांचा फायदाच झाला. नितीशकुमार यांच्या राजीनाम्याचा सर्वाधिक फटका लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसला, तर फायदा मात्र भाजपाला झाला. आणखी एका राज्यात भाजपाचे सरकार आले.
लालूप्रसाद यादव आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब भ्रष्टाचारात आंकठ बुडाले आहे. लालूप्रसाद यादव यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी जनावरांचा चाराही सोडला नाही! त्यांच्या उपमुख्यमंत्री राहिलेल्या मुलाने वाळू घोटाळा केला. अशा भ्रष्ट व्यक्तीशी आणि त्याच्या पक्षाशी युती करत नितीशकुमार यांनी आपल्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी घोडचूक केली होती. राजीनामा देऊन त्या चुकीचे प्रायश्‍चित्त नितीशकुमार यांनी केले आहे. राजकारणात आपली चूक कबूल करण्याची आणि प्रायश्‍चित्त घेण्याची कोणाचीच तयारी नसते. पण, नितीशकुमार यांनी तेवढी हिंमत दाखवली, याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. त्यामुळे लालूप्रसाद आणि तेजस्वी यादव आता कितीही आदळआपट करत असले, नितीशकुमार यांच्यावर नाही नाही ते आरोप करत असले, तरी त्याला अर्थ नाही. लालूप्रसाद यादव यांनी आधीच संयमाने आणि कौशल्याने परिस्थिती हाताळली असती, तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती. पण, त्या वेळी सत्तेची मस्ती लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या डोक्यात गेली होती.
लालूप्रसाद यादव यांच्यासोबतची महाआघाडी आपण फार काळ चालवू शकणार नाही, हे नितीशकुमार यांच्या कधीच लक्षात आले होते. लालूप्रसाद यादव यांनी आपल्या वागणुकीत सुधारणा केली नाही तर आपल्याला वेगळा मार्ग निवडावा लागेल, याचे संकेत नितीशकुमार यांनी वेळोवेळी दिले होते. संपूर्ण विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राईकच्या निर्णयावर तुटून पडला असताना नितीशकुमार यांनी या दोन्ही निर्णयांचे स्वागत केले होते.
कधीकाळी नरेंद्र मोदी यांच्याशी ३६ चा आकडा असणार्‍या नितीशकुमार यांनी, पंतप्रधान मोदी यांच्याशी आपल्या भविष्यातील राजकारणासाठी जुळवून घेतले आहे. हे लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या स्वत:ला अतिशय धूर्त आणि चाणाक्ष समजणार्‍या राजकारण्याच्या लक्षात येऊ नये, याचे आश्‍चर्य वाटते. लालूप्रसाद यादव यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी नितीशकुमार योग्य वेळेची आणि संधीची वाट पाहात होते. तशी संधी तेजस्वी यादव आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य लोकांविरुद्ध हॉटेलच्या बदल्यात जमीन प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यावर त्यांना मिळाली.
लालूप्रसाद यादव आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय भ्रष्टाचाराने बरबटले असताना त्यांच्याशी नितीशकुमार यांनी महाआघाडी कशी केली, याचे त्याच वेळी राजकीय निरीक्षकांना आश्‍चर्य वाटले होते. कारण नितीशकुमार यांच्या आतापर्यंतच्या राजकीय आयुष्यात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्याशी आघाडी केल्यामुळे नितीशकुमार यांची भ्रष्टाचाराच्या मुद्यावर ‘झीरो टॉलरन्स’ असलेली प्रतिमा धोक्यात आली.
तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याच्या प्रकरणात आपण झुकण्यापेक्षा नितीशकुमार यांना झुकवू, असे लालूप्रसाद यादव यांना वाटत होते. पण, त्यांचा हा अंदाज चुकला. कारण नितीशकुमार यांच्याकडे भाजपाच्या पाठिंब्याचा हुकमाचा एक्का आहे, याचा लालूप्रसाद यादव यांना विसर पडला. त्यामुळे तेजस्वी यादव राजीनामा देणार नाही, अशी आडमुठी भूमिका लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी घेताच, नितीशकुमार यांनी स्वत:च राजीनामा देत लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या भ्रष्टाचारी कुटुंबाला रस्त्यावर आणले. नितीशकुमार यांच्यासमोर भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा नेता, अशी आपली प्रतिमा कायम ठेवण्यासाठी राजीनामा देण्याशिवाय पर्यायच नव्हता. नितीशकुमार यांचा हा निर्णय राजकीय शहाणपणाचा म्हणावा लागेल.
विद्यमान पेचप्रसंगात नितीशकुमार यांच्यासमोर दोन पर्याय होते, पहिला म्हणजे तेजस्वी यादव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्‌टी करण्याचा तर दुसरा पर्याय होता, स्वत: राजीनामा देण्याचा. तेजस्वी यादव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्‌टी करूनही नितीशकुमार यांच्यासमोरील अडचणी संपल्या नसत्या. नितीशकुमार यांच्यासमोरील सर्वात मोठी समस्या होती लालूप्रसाद यादव यांचे राज्यात तयार झालेले घटनाबाह्य सत्ताकेंद्र. सरकारच्या कारभारात लालूप्रसादांचा हस्तक्षेप वाढला होता. आपल्या सरकारच्या कारभारात असा कोणताही हस्तक्षेप नितीशकुमार यांना मान्य नव्हता. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी नितीशकुमार यांनी राजीनामा देत ‘न रहेंगा बास न बजेंगी बासुरी’ अशी भूमिका घेतली.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपा तसेच नितीशकुमार यांनी एकमेकांवर ज्या शब्दांत आणि भाषेत टीका केली, त्यामुळे हे दोघेही पुन्हा कधी एकत्र येऊ शकतील, अशी कल्पनाही कोणी केली नाही. मात्र, राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो, तर परिस्थितीनुसार शत्रू आणि मित्र ठरत असतात, हे नितीशकुमार आणि भाजपा पुन्हा जवळ आल्यामुळे दिसून आले आहे. मुळात नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी केलेली आघाडी ही अनैसर्गिक होती, तर भाजपासोबतची युती ही नैसर्गिक.
नितीशकुमार यांनी भाजपासोबतची युती तोडल्यामुळे त्या वेळी बिहारसोबत देशातील जनतेलाही वाईट वाटले होते. कारण ही युती बिहारच्याच नाही, तर देशाच्याही हिताची होती. कधीकाळी नरेंद्र मोदी हे नितीशकुमार यांचे कट्‌टर राजकीय विरोधक होते. मोदींवर तुटून पडण्याची एकही संधी नितीशकुमार यांनी सोडली नाही. पण, आता मात्र देशातील राजकीय परिस्थितीचा खर्‍या अर्थाने अंदाज नितीशकुमार यांना आला आहे. त्यामुळे २०१९ मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, पंतप्रधानपदासाठी त्यांच्यापेक्षा दुसरा कोणताही सक्षम पर्याय आज देशासमोर नाही, या शब्दांत नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.
नितीशकुमार यांच्यासारखा एकेकाळचा कट्‌टर राजकीय शत्रू नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळतो, यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आणि कार्यक्षमतेला मिळालेली दुसरी मोठी पावती नाही! नरेंद्र मोदी जोपर्यंत आहेत, तोपर्यंत पंतप्रधानपद आपल्याला मिळू शकत नाही, त्यामुळे जे मिळू शकत नाही, त्यामागे धावण्यापेक्षा जे मुख्यमंत्रिपद आपल्याकडे आहे, ते चांगल्या पद्धतीने टिकवण्याचे व पुन्हा एकदा बिहारचा मुख्यमंत्री होण्याचे आपल्या आवाक्यातील स्वप्न नितीशकुमार यांनी पाहिले, तर त्यांना दोष कसा द्यायचा?
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७