वेध

0
35
भ्रष्टवादी नेते

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष. शरद पवार हे महाराष्ट्राचे निर्विवाद नेते कधीच नव्हते. शरद पवार प्रत्यक्ष पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकले नसले, तरी त्यांनी तेवढा दबदबा मात्र या देशात स्वत:चा तयार केला, हे मात्र खरे आहे. आयुष्यभर विधिनिषेधशून्य राजकारण करून, भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालून, जातिपातीचे, विभागाचे राजकारण करूनही त्यापासून अलिप्त असल्याचे भासवण्यात यशस्वी नेते म्हणून शरद पवारांना ओळखतात. या कौशल्यातूनच त्यांना काही लोक ‘जाणता राजा’ वगैरेही म्हणतात.
महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या चार प्रमुख राजकीय पक्षांपैकी सर्वाधिक वादग्रस्त, सर्वात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते याच शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पूर्वी तुरुंगाची हवा खाणारे सुरेश कलमाडी, सुरेश जैन हे नेते याच पवारांच्या तालमीत तयार झाले होते, हा इतिहास आहे. आज तुरुंगात खितपत पडलेले छगन भुजबळ, रमेश कदम हे तर आजही याच ‘जाणत्या राजा’चे पाईक म्हणून ओळखले जातात. सिंचन घोटाळ्यात तर अनेक मोठे नेते अडकले आहेत.
सध्या महाराष्ट्राच्या तुरुंगात मुक्कामी असलेल्या छगन भुजबळ आणि रमेश कदम या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी परवाच झालेल्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान केले. या दोघांनाही तुरुंग अधिकार्‍यांनी मतदानासाठी आणले आणि परत नेले. याच कारणामुळे दोघेही प्रसारमाध्यमांचे ‘आकर्षण’ बनले होते. भुजबळ कसे हताश, कसे थकलेले दिसत होते; तर कदम कसे बेफिकीर, मस्तवाल वाटत होते, हे प्रसारमाध्यमांनी अधोरेखित केले आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून आमदार रमेश कदम तुरुंगवासी आहेत. पोलिसांच्या बंदोबस्तात हातकड्यांशिवाय आणलेले आ. कदम एक तासासाठी मोकळे सोडले होते, पण मोकाट नाही. त्यामुळे पोलिसांचा गराडा अर्थातच होता, कैदी असल्यामुळे एका तासात परत नेऊन डांबण्याची जबाबदारी पोलिसांचीच होती. पण, पोलिसांच्या गराड्यातही आ. रमेश कदमांची देहबोली मगरूर, जणूकाही ते समर्थकांच्याच गराड्यात आहेत, अशीच होती, असे प्रसारमाध्यमांनी आवर्जून नोंदवले आहे.

‘पॉवर’फुल…

‘पद्‌मविभूषण’ शरद पवारांचे तर निकटवर्तीही, त्यांच्याजवळ निष्ठापूर्वक असणारेही ‘पवारफुल’ म्हणजेच ‘पॉवरफुल’ असतात, असे मानले जाते आणि तसाच अनुभवही आहे. पवारांपासून दूर गेल्यावर पवारच त्यांचा सुरेश कलमाडी किंवा सुरेश जैन करून टाकतात, असे महाराष्ट्रात मानले जाते. अशा दूर गेलेल्यांना किंवा पवारांनाही टोपी टाकण्याचा प्रयत्न करणार्‍यांना तुरुंगाची हवा खावी लागते, असा प्रघातच असल्यासारखे आहे. २०१४ पूर्वी देशात आणि राज्यात कॉंग्रेसी सत्ता असताना तर कुणाला कुठे ठेवायचे, आत की बाहेर? हे पवारसाहेबच ठरवायचे, असे मानतात. त्यातूनच कलमाडी, जैनांना तुरुंगात सडवले गेले. पण, २०१४ नंतर मात्र स्थिती बदलली. पूर्वीइतके नियंत्रण पवारांचे राहिले नाही. सीबीआय, गुन्हे अन्वेषण विभागासारख्या यंत्रणा नियमांनुसार काम करू लागल्या. त्यातूनच छगन भुजबळ, रमेश कदमांचे आज सुरू आहे.
या पक्षात किंवा याच पवारांसोबत राहूनही बर्‍यापैकी स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि कमावलेल्या प्रफुल्ल पटेलांच्याही मागे आता सीबीआयच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले आहे. हे पटेल कॉंग्रेसी कार्यकाळात हवाई नागरी वाहतूक मंत्री होते, २०१४ पर्यंत. त्यांच्या कार्यकाळात सरकारची म्हणजेच भारताची आर्थिक स्थिती नसतानाही ७० हजार कोटी रुपयांची १११ विमाने खरेदी करणे, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स यांचे विलीनीकरण असे २००६ ते २००८ या काळातील गैरप्रकारांचे आरोप आहेत. सोबतच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खाजगी विमान वाहतूक कंपन्यांना देणे, अशाही संदर्भात प्रफुल्ल पटेलांकडे बोट दाखविले जाते. भारताच्या महालेखापाल आणि नियंत्रकांनी (कॅग) २०११ मध्येच यावर ठपका ठेवला होता. संसदीय समितीनेही या व्यवहारांच्या प्रतिकूल मते नोंदविली होती. त्याच वेळी प्रफुल्ल पटेलांकडून हवाई मंत्रालय काढून अवजड उद्योग मंत्रालय दिले गेले होते. त्या वेळी भारत सरकारने ‘ऑर्डर’ दिलेल्या ‘या’ १११ पैकी फक्त २३ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात आली आहेत, अशीही भानगड आहे.
या विविध प्रकरणी सीबीआयने तीन एफआयआर मे २०१७ मध्ये दाखल केले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी या एफआयआरवर प्रतिक्रिया देताना, ‘हे’ निर्णय मी एकट्याने घेतलेले नाहीत, असा दावा केला होता. १११ विमाने खरेदीचा निर्णय चिदम्बरम् यांच्या अध्यक्षतेतील मंत्रिगटाने घेतला होता, असे पटेल यांनी सांगितले होते. सीबीआयच्या एफआयआरमध्ये कुणाचेही नाव नसल्यामुळे मी या कारवाईबद्दल बोलणार नाही, असेही प्रफुल्ल पटेल यांनी तेव्हा म्हटले होते. अर्थातच, ही भूमिका त्यांच्या सोयीची असल्यामुळे त्यांनी घेतली आहे, हे उघड आहे. पण, या एफआयआरवर कारवाई सुरू होईल त्या वेळी त्यात त्या मंत्रालयाचे प्रमुख म्हणून आरोपी क्रमांक एक प्रफुल्ल पटेलच राहणार आहेत, हेही नाकारण्यात अर्थ नाही.
अनिरुद्ध पांडे
९८८१७१७८२९