वेंगनूरच्या ग्रामसभेचा उघड्यावरच संसार

0
43

मुक्तेश्‍वर म्हशाखेत्री
गडचिरोली, ४ ऑगस्ट
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त, आदिवासीबहूल, अविकसित म्हणून ओळखल्या जाणार्‍या गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम व जंगलव्याप्त वेंगनूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही एका झाडाखालीच भरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शासनस्तरावरून विविध योजना राबविण्यात येत असल्या तरीदेखील या जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये अद्यापही विकासाची गंगा पोहचलीच नसल्याचे चित्र यावरून दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून ८५ ते ९० किमी, तर मुलचेरा तालुक्यापासून ३० ते ३५ किमी अंतरावर पाच सदस्यीय वेंगनूर गटग्रामपंचायत असून, यामध्ये वेंगनूर, सुरगाव, अंडगेपल्ली या गावांचा समावेश आहे.
८०० ते १००० लोकसंख्या असलेल्या वेंगनूर येथे ग्रामपंचायत भवन नसल्याने या ग्रामपंचायतीचा कारभार समाज मंदिरातूनच चालविला जात असून, ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या बैठका तिथेच घेतल्या जातात. मात्र ग्रामस्थांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणार्‍या ग्रामसभा मात्र गावातील एका झाडाखालीच भरविली जाते, हे विशेष. ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी सुरक्षित अशी इमारत नसल्याने संबंधित ग्रामसेवक आपल्या घरीच रेकॉर्ड ठेवत असल्याची बाबही उजेडात आली आहे.
स्वातंत्र्याच्या तब्बल ७० वर्षानंतरही वेंगनूर गावाचा अपेक्षित विकास घडून आला नाही. वेंगनूरला जाण्यासाठी रस्ते नसून इतर विविध समस्यांचा डोंगर आहे. रस्ते व पुलाअभावी वेंगनूरसह परिसरातील गावांचा पावसाळ्यात तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटतो. त्यामुळे सुद्धा ही गावे विकासापासून कोसोदूर आहेत.
वेंगनूर येथे एक छोटीची ग्रामपंचायत इमारत होती. मात्र मागील १० ते १२ वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी ती इमारत व ग्रामपंचायतीचा रेकॉर्डची जाळपोळ केली. तेव्हापासून गावाचा कारभार चालविण्यासाठी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी ग्रामपंचायत भवन उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार गावातील समाज मंदिरातूनच चालविला जातो. नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व विविध समस्यांनी ग्रासल्याने वेंगनूरला अद्यापही स्वातंत्र्याचा सूर्य उगवला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
बादलशहा मडावींचा दुजोरा
यासंदर्भात मुलचेरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी यांना विचारणा केली असता, वेंगनूर येथे ग्रामपंचायत भवन नसल्याने या गटग्रामपंचायतीचा कारभार समाज भवनातूनच चालविला जात असल्याचे आणि ग्रामसेवकाच्या घरीच ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड ठेवला जात असल्याने गावात नव्याने ग्रामपंचायत भवन उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.