नितीशचा चमत्कार भ्रष्टाचाराला नमस्कार!

0
28

प्रासंगिक
दुरावलेला राजकीय सहयोगी जेव्हा इतर पक्षातील व्यभिचार, दुराचार, भ्रष्टाचाराचा कटु अनुभव घेऊन शहाणा होतो, असंगाचा संग सोडून पूर्व संस्कृतीत परततो तो सुदिन, व्यक्ती, समाज व राष्ट्रीय जीवनात अत्यंत महत्त्वाचा व दूरगामी सकारात्मक संदेश देणारा चिरस्मरणीय ठरतो. तब्बल १७ वर्षे राष्ट्रधर्म, राष्ट्रीय अस्मिता जोपासणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या छत्रछायेखाली सामाजिक, राजकीय संसार समर्थपणे मांडला. संत्री ते मंत्रिपदाचा सन्मान प्राप्त केला. त्या भाजपाचा राजकीय महत्त्वाकांक्षेपायी नितीशांनी काडीमोड घेेतला.
भाजपाला पर्याय म्हणून नितीशांनी परिवारवादी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लालूप्रसादांचा रालोद व राहुल गांधीच्या कॉंग्रेससोबत दुसरा घरठाव केला. महागठबंधन केले. ही अभद्र, अतार्किक आघाडी अपेक्षेप्रमाणे अल्पायुषी ठरली. २०१५ च्या विधानसभेत भाजपाचा पराभव केला. रालोद-कॉंग्रेससोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली. नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. मोबदल्यात राजकीय जीवनात पदार्पण करणार्‍या अनुभवशून्य दोन मुलांसाठी, उपमुख्यमंत्रिपद व कॅबिनेट मंत्र्याचा सौदा केला. या दोन मुलांच्या माध्यमातून आपलं बिहारच्या राजकारणातील वर्चस्व कायम ठेवलं. अगतिकतेने हे सर्व नितीशांना मान्य कराव लागलं.
मुळातच लालूप्रसाद व नितीशकुमार ही राजकारणातील दोन विरुद्ध टोके आहेत. लालूप्रसाद भ्रष्टाचाराला चालना देणारे, गुन्हेगारीला आश्रय देणारे; तर नितीशकुमार सदाचारी, भ्रष्टाचाराचा डाग नसलेले समाजवादी नेते. भिन्न विचारधारा व मानसिकता असलेल्या दोन सत्ताकेंद्रांचं सरकार हे संघर्षमय व राज्य हिताला बाधक होते. त्यात एकवाक्यता व मनोमिलनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत होता. लालूंचा राज्यकारभारातील हस्तक्षेप यामुळे नितीशकुमार अस्वस्थ होते. सदाचार व भ्रष्टाचार या परस्परविरोधी सिद्धान्तामुळे नितीशची कोंडी झाली होती. केविलवाणी अवस्था झाली होती. यातच भर म्हणून लालूप्रसाद कुटुंबीयांची १००० कोटींची बेनामी संपत्ती, भ्रष्टाचार, आर्थिक हेराफेरीची प्रकरणे उघडकीस आली. एफआयआर दाखल झाले. त्यात त्यांचे सहयोगी उपमुख्यमंत्री लालूपुत्र तेजस्वी यादव हे आरोपी म्हणून गोवले गेले.
अहंभावी, सत्ताधुंद, भ्रष्टाचारसम्राट लालूप्रसादांनी हे सर्व आरोप नाकारले. मी तो नव्हेच, भाजपा सरकारचे लालूविरोधातील कुटिल कारस्थान, असा कांगावा केला. जनतेला गुमराह करण्याचा प्रयास केला. परंतु, ही बेनामी संपत्ती नाकारण्याचे किंवा त्याचे आर्थिक स्रोत उघड करण्याचे नैतिक धाडस झाले नाही. तेजस्वी यादव सत्ता सोडायला तयार नव्हते. हकालपट्टी केली तर राजकीय संकट निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे अगदी नाट्यमय रीत्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन भ्रष्टाचाराला पर्यायाने लालूप्रसाद, कॉंग्रेसला त्यांनी नमस्कार केला. भाजपाची कास धरली आणि मुख्यमंत्रिपदी पुन्हा विराजमान झाले. भ्रष्टाचारविरहित वातावरणात मोकळा श्‍वास घेतला. सुटकेचा निःश्‍वास सोडला.
नितीशांचा राजीनामा हा मास्टर स्ट्रोक होता. भ्रष्टाचारविरोधी एक प्रकारची लष्करी कारवाईच होती. भ्रष्टाचारविरोधातील ती राजकीय क्रांती होती. भारतीय लोकशाहीत आता भ्रष्टाचाराला स्थान नाही, ही सांगणारी बोलकी घटना होती. भ्रष्टाचारमुक्त भावी राजकीय धु्रवीकरणाची ती नांदी होती. भारताच्या सामाजिक, राजकीय जडणघडणीत बिहार राज्याचे सक्रिय योगदान राहिले आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण, कर्पुरी ठाकूर यासारख्या समाजवादी, साम्यवादी विचारधारेचा प्रभाव राष्ट्रीय राजकारणात क्रांतिकारक ठरला होता. नितीशकुमार हे याच विचारधारेत विकसित झालेले राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. भ्रष्टाचारविरोधी क्रांतीतील एक सेनानी म्हणून त्यांचा नामनिर्देश केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तसे बघितले तर लालूप्रसाद हेदेखील समाजवादी सांप्रदायिक. परंतु, स्वार्थ, सत्ता, संपत्तीच्या अभिलाषेने त्यांनी साम्यवादी सिद्धान्ताला तिलांजली दिली. भांडवलशाही व भ्रष्टाचार या लांच्छनीय वर्गाचा व मंत्राचा अंगीकार केला.
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जातीय समीकरणांचा आणि मंडल आयोगाच्या शिफारशींचा सर्वात अधिक (गैर)फायदा घेऊन लालूप्रसादांनी बिहारमध्ये सत्तासाम्राज्य प्रस्थापित केले. बिहारच्या राजकारणात मजबूत स्थान केले. समाजवादी तत्त्वांचा त्याग करून परिवारवाद, घराणेशाही, भांडवलशाही व भ्रष्टाचाराला जन्म दिला. ‘जब तक बिहार में लालू तब तक भ्रष्टाचार चालू,’ हे नवीन अभद्र समीकरण उदयाला आले. भ्रष्टाचार हा सर्वमान्य शिष्टाचार झाला. आपल्या मुलांना भ्रष्टाचाराचा कानमंत्र देऊन लालूंनी त्यांचे राजकीय भवितव्य अंधारमय केले आहे. त्यामुळे नितीशकुमारांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. भारतीय राजकारणाला नवीन दिशा, आयाम देणारा आहे.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या कॉंग्रेस, सपा, बसपाकडून नितीशकुमारांवर टीकेची झोड उठली आहे. ती स्वाभाविक आहे. कारण भ्रष्टाचार हीच ज्याच्या राजकीय जीवनाची एकमेव संस्कृती आहे त्यावर हा वज्राघात आहे. शिवाय नितीशकुमारांच्या एनडीए प्रवेशामुळे महागठबंधन धोक्यात आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव हे दिवास्वप्न ठरणार आहे. नितीशकुमारांनी या क्रांतिकारी निर्णयाशी प्रामाणिक राहून पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचारमुक्त भारत या अभिनव अभियानाचा श्रीगणेशा बिहारपासून करावा. बिहार राज्याला भ्रष्टाचारमुक्त करावे. एक नवीन आदर्श देशापुढे प्रस्थापित करावा, हीच अपेक्षा!
दिगंबर शं. पांडे
९४०३३४३२३९