केरळमधील संघस्वयंसेवकांच्या हत्या…

0
12

वाचकपत्रे
केरळमधील कम्युनिस्ट राजवटीच्या आशीर्वादाने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते यांचे जे हत्यासत्र सुरू आहे, त्याकडे परवा लोकसभेत प्रल्हाद पटेल आणि मीनाक्षी लेखी यांनी लक्ष वेधले. या हत्यांची राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत (एनआयए) चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. ज्याप्रमाणे काश्मिरातील अतिरेक्यांना पाकिस्तान मदत करीत आहे, तशीच मदत केरळमधील सरकार आपल्या कार्यकर्त्यांना करीत आहे. आतापर्यंत शेकडो हत्या तेथे झाल्या आहेत आणि शेकडो लोक कायम जायबंदी झाले आहेत. देशातून साम्यवादाचे उच्चाटन होत असताना, आपली केरळमधील सत्तातरी वाचवावी, म्हणून तिथले सरकार राजकीय हत्या करीत आहे. हे हत्यासत्र ताबडतोब थांबण्यासाठी आता केंद्र सरकारनेच कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
वसंत सहस्रबुद्धे
नागपूर
कर्नाटकातील मंत्र्यावर आयकर धाडी!
कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या ६४ प्रतिष्ठानांवर एकाच वेळी आयकर विभागाने धाडी घालून १५ कोटींच्या नोटा व बरेच हिरेजडित आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या शिवकुमारवर आयकर बुडविण्याचा आरोप आहे आणि फेब्रुवारी महिन्यापासून आयकर विभाग त्यांच्या मागावर होता. पण, याला सध्या कॉंग्रेसचे लोक गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीशी जोडत आहेत. कारण, कर्नाटकच्या एका रिसॉर्टमध्ये कॉंग्रेसने ४२ आमदार ठेवले आहेत. त्यांना हे १५ कोटी देण्यात येणार असल्याच्या अफवाही पसरल्या आहेत. पण, त्यात तथ्य नाही. आयकर विभाग आपले काम कित्येक वर्षांपासून करीत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या धाडी आहेत, असे आयकर खात्याने स्पष्टच केले आहे. तेव्हा शंकेला वाव नसावा.
अभिमन्यू देशपांडे
अमरावती

जागतिक बँकेचा पाकिस्तानला दणका!
सिंधू करारानुसार जागतिक बँकेने आपला निर्णय देताना, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पश्‍चिम भागात भारत जलविद्युत प्रकल्प निर्माण करू शकतो, असा निर्वाळा दिल्याची बातमी तभात वाचली. हा एकप्रकारे भारताचा विजयच आहे. कारण, पाकिस्तान कित्येक महिन्यांपासून या विद्युत प्रकल्पाला विरोध करीत होता. या दोन्ही नद्यांना पूर येतो आणि त्याचे पाणी थेट जम्मू-काश्मीरमध्ये घुसते. त्यामुळे मोठी हानी होते. त्यामुळे भारताने या नद्यांवर धरण बांधून जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण, पाकिस्तानने अडथळा आणल्यामुळे मग सिंधू करारान्वये दोन्ही देश जागतिक बँकेकडे गेले. त्यावर बँकेने भारताच्या बाजूने निर्णय दिला आहे. यामुळे काश्मिरातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
सुभाष देशमुख
नागपूर

गोवा शासनाचा स्तुत्य निर्णय!
गोव्यातील समुद्रकिनार्‍यावर जर कुणी दारू पिऊन आढळल्यास त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा आदेश गोवा शासनाने दिला आहे. गोवा हे देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येेथे हजारो विदेशी पर्यटकही येतात, तसे देशातीलही येतात. पण, भारतीय लोक भर समुद्रकिनार्‍यावर बसून तेथे दारू पितात आणि धिंगाणा घालतात. काही विदेशी लोकांनीही यापूर्वी धिंगाणा घातला आहे. त्यामुळे कुटुंबासह येणार्‍या पर्यटकांना या भीषण समस्येचा सामना करावा लागत होता. तसेच बीचच्या सभोवताल दारू, बीअरच्या बाटल्यांचा खच पडत असे. हे सर्व प्रकार बंद करण्यासाठी गोवा शासनाने हा निर्णय घेतला आहे आणि काही जणांना आतापर्यंत अटकही केली आहे. गोवा सरकारच्या या निर्णयाचे स्वागत!
विनोद रहाटे
नागपूर

दिग्विजयसिंह यांचे काही खरे नाही!
कॉंग्रेसचे, वायफळ बडबड करणारे नेते दिग्विजयसिंह यांच्याकडे गोवा आणि कर्नाटक राज्यांची आधी जबाबदारी होती. ती काढून घेऊन त्यांच्याकडे तेलंगणाचा कार्यभार दिला होता. पण, या राज्याचीही जबाबदारी आता हिसकण्यात आली असून, आता केवळ आंध्रप्रदेश तेवढा त्यांच्याकडे देण्यात आला आहे. गोव्यात हातातोंडाशी आलेली सत्ता गमावण्यात दिग्विजयसिंह हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा ठपका त्यांच्यावर कॉंग्रेस श्रेष्ठींनी ठेवला होता. मंत्री कुणाला बनायचे, या प्रश्‍नातून हा सगळा घोळ केला आणि भाजपाने नेमका डाव साधला. कॉंग्रेसची राजकीय वर्तुळात छी! थू! झाली. कॉंग्रेस एक छोटेसे राज्यसुद्धा सांभाळू शकत नाही, असा संदेश राजकीय वर्तुळात गेला. आता दिग्गीचे पंख छाटणे सुरू झाले आहे.
अविनाश पवार
नागपूर