भाजपाची परीक्षा!

0
51

वेध
केंद्रात आणि विभिन्न राज्यांत भारतीय जनता पार्टीची सरकारे जशी सत्तेवर येत आहेत, तशी भाजपामध्ये प्रवेश करणार्‍या इच्छुकांची संख्या वाढत आहे. काहींनी तर मूळ पक्षाला जय श्रीराम म्हणत भाजपामध्ये प्रवेशसुद्धा मिळविलेला आहे. इलेक्टिव्ह मेरिटच्या धर्तीवर हे प्रवेश होत आहेत. महाराष्ट्रातही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये येण्याचा प्रवाह अनुभवायला आला. वर्षानुवर्षे कॉंग्रेसचे म्हणून ओळखले जाणारे परिवार भाजपावासी झाले. पक्षाचा बेस वाढतोय्, पक्षाची ताकद वाढतेय्, विचारधारा व्यापक होतेय् आणि ही विचारधारा पचनी पडतेय् म्हणून ही मंडळी भाजपामध्ये चालून येत आहेत, असे समजणे अगदी मूर्खपणाचे ठरेल. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या अभूतपूर्व विजयामुळे इतर पक्षातील अनेक जुने-जाणते नेते आणि कार्यकर्ते भाजपाचा झेंडा खांद्यावर मिरवताना दिसत आहेत. अशीच लाट उत्तरप्रदेशातही बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीच्या ३ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला. आजच आणखी एका महिला आमदाराने भाजपाचा झेंडा हाती घेतला. सूत्रांच्या मते, येत्या काही दिवसात सपाचे आणखी काही मोठे मासे भाजपाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला काही भवितव्य नाही, अशी धारणा झाल्याने कॉंग्रेसचे ६ आमदार भाजपावासी झाले असून, आणखी काही आमदार फुटून बाहेर निघण्याच्या तयारीत आहेत. बिहारमध्ये तर नितीशकुमार यांच्या रूपात भाजपाला एक जबरदस्त मित्रपक्ष मिळाला आहे. थोडीबहुत अशीच स्थिती देशात सर्वत्र बघायला मिळत आहे. तामिळनाडूत अण्णाद्रमुकच्या रूपात भाजपाला दक्षिणेत एक नवा मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे सारे प्रशंसनीय असले, तरी नव्याने पक्षात येणार्‍या मंडळींना भाजपा काय चीज आहे, हे समजावून सांगण्याची खरी गरज राहणार आहे. राष्ट्रीयत्वाबाबत, लोकशाहीबाबत, आर्थिक धोरणांबाबत, स्वदेशीबाबत, या देशातील हुतात्म्यांबाबत, सैनिकांबाबत, हिंदुत्वाबाबत भाजपाची ध्येयधोरणे काय, हे त्यांच्या गळी उतरवावे लागणार आहे. मैं नही आप आणि व्यक्तीपूर्वी देशाचे महत्त्व जाणून घेण्याची सवय त्यांच्यात बाणवावी लागेल. असे करून ही मंडळी टिकून राहिली, तरच भाजपाला आलेली तरारी भविष्यातही कायम राहील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणार्‍या कार्यकर्त्यांनाही सांभाळण्याची मोठी जबाबदारी भाजपावर आहे.
हॅकर्सपासून सावधान!
भारतातील विभिन्न संकेतस्थळे हॅक करण्याचे प्रकार काही नवे नाहीत. आपल्या घटनात्मक संस्थांची संकेतस्थळे हॉक होत नसली, तरी काही सरकारी संस्थांची संकेतस्थळे एखाद्वेळी हॅक होण्याच्या घटना घडत असतात. मूलतः ही संकेतस्थळे हॅक करण्यात अतिरेकी कारवाया करणारे, त्यांना धोरणात्मक समर्थन देणारे आणि प्रसंगी अशा कारवाया व्हाव्यात म्हणून प्रयत्नरत असलेल्या गुप्तचर संस्थांची डोकी काम करत असतात. ही संकेतस्थळे ज्या संस्था-संघटनांची असतील, त्यांची गोपनीय माहिती मिळविणे, हा त्यामागचा हेतू असतो. भारतातील काही विद्यापीठांची, तर कधी सरकारी विभागांची संकेतस्थळे हॅक झालेली आहेत. पण, सायबर क्राईम या नव्या आयामाची जबाबदारी असलेल्या तंत्रज्ञांच्या साह्याने या हॅकिंगपासून त्या त्या संस्थांना बाहेर काढण्यात आपल्या देशातील संगणकतज्ज्ञांना यश आले आहे आणि अशी संकेतस्थळे नंतर हॅकफ्री पद्धतीने कामदेखील करू लागली आहेत. पण, आता पाकिस्तान सरकारची अधिकृत वेबसाईट अज्ञात हॅकरने हॅक केली असून, त्यावर भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि १५ ऑगस्टच्या शुभेच्छा पोस्ट केल्या आहेत.
दहशतवाद्यांनी प्रायोजित केलेल्या हॅकर्सना असे वाटत असेल की, आपण भारताच्या वेबसाईट केव्हाही हॅक करून, त्यांच्यावर वरदहस्त असलेल्यांच्या वेबसाईट सुरक्षित ठेवू शकतो, तर तो त्यांचा भ्रम आहे, हे या अज्ञात हॅकर्सनी दाखवून दिले आहे. चार महिन्यांपूर्वी एका पाकप्रेमी हॅकरने भारतातील नामवंत शैक्षणिक संस्थांची संकेतस्थळे हॅक करून खळबळ उडवून दिली होती. आता अज्ञान हॅकरने दस्तुरखुद्द पाकिस्तान सरकारचेच संकेतस्थळ हॅक केले आहे. हॅकरने त्यावर ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत आणि ‘हॅपी इंडिपेण्डेन्स डे’ अशा शुभेच्छा टाकून पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. सोबतच या हॅकरने तिरंग्यासोबत असलेल्या अशोकचक्रावर महात्मा गांधी आणि भगतसिंग यांची छायाचित्रे टाकून स्वातंत्र्यासाठी लढलेल्या राष्ट्रपुरुषांची आठवण पाकिस्तानला करून दिली आहे. देशोदेशी आता संगणकीय गुन्हेगारीशी लढा देण्यासाठी पोलिसांमध्ये आणि चौकशी संस्थांमध्ये सायबर सेल कार्यरत झाले आहेत. संगणकाशी संबंधित कुठलेही गुन्हे हाताळण्यासाठी या सेलमधील लोकांना शिक्षित केले जाते.
संकेतस्थळे हॅक करणार्‍या हॅकर्सना कायद्याच्या कचाट्यात कसे अडकवायचे, याचा त्यांना चांगला अनुभव असतो. ई-मेल्सद्वारे होणारी फसवणूक, फेसबुक, व्हॉटस् ऍप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल वेबसाईटच्या माध्यमातून होणारी गुन्हेगारी नियंत्रणात आणणे आणि आरोपींच्या अटकेसाठी साह्यभूत ठरण्याचे काम ही शाखा करते. आपल्याला केवळ हॅकर्सपासून सावध राहण्यासाठी सातत्याने पासवर्ड बदलणे, कुणालाही माहिती शेअर न करणे, कुणाच्या समोर त्याबाबत वाच्यता न करणे अशा उपाययोजना तेवढ्या करायच्या असतात. तेवढे स्मार्ट होऊन हॅकर्सना चार हात दूर ठेवू या!
चारुदत्त कहू
९९२२९४६७७४