फार्मा क्षेत्राची स्थिती बिघडतेय्?

0
45

मुंबई, ४ ऑगस्ट 
फार्मा क्षेत्रातील कंपन्यांसमोरील अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, भारतीय फार्मा कंपन्यांना अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (यूएसएफडीए) सतत येणार्‍या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी शेअर बाजारात बर्‍याच फार्मा कंपन्यांच्या बाजारभांडवलात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे.
सन फार्माची अमेरिकेतील उपकंपनी असणार्‍या टेवा कंपनीचा शेअर अमेरिकी बाजारात २४ टक्क्यांनी घसरला आहे. टेवा, जेनरिक औषध बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. मात्र अमेरिकेत जेनरिक औषधांच्या विक्रीत घसरण झाल्याने टेवाच्या नफ्यात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात ७००० लोकांना कामावरून कमी करण्याचा कंपनीचा विचार आहे. कंपनीचे १५ औषध प्रकल्प देखील बंद करण्यात येणार आहे.
डॉ रेड्डीजची उत्तर अमेरिकेतील विक्री ४ टक्के घसरुन १४९४.६ कोटींवर पोहोचली आहे. डॉ रेड्डीजला एकूण विक्रीतील ४५ टक्के हिस्सेदारी उत्तर अमेरिकेतून मिळते. जूनच्या तिमाहीमध्ये लुपिनच्या उत्तर अमेरिकेतील विक्रीत २६.८ टक्क्यांनी घट होऊन ती १६०२ कोटी झाली आहे. लुपिनच्या देखील एकूण विक्रीतील ४५ टक्के हिस्सा उत्तर अमेरिकेतून प्राप्त होतो. (वृत्तसंस्था)