७१ गावे डिजिटल करण्याचे आयसीआयसीआयचे लक्ष्य

0
34

पुणे, ४ ऑगस्ट 
आयसीआयसाआय बँक राज्यातील आणखी ७१ गावांना डिजिटिल गाव बनवणार असून, बँकेने ग्रामीण भारताचा विकास घडवून देशाची प्रगती करायचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या उपक्रमामध्ये सर्व व्यवहारांचे संपूर्ण डिजिटलायझेशन करण्यात येणार असून, इतर व्यावसायिक उपक्रमांमार्फत गावकर्‍यांना प्रशिक्षण पुरवणे, कर्जाचे वाटप करणे आणि गावकर्‍यांना बाजारपेठ मिळवून देत त्यांच्या शाश्‍वत अर्थार्जनास मदत करणे यांचा समावेश आहे. या उपक्रमाअंतर्गत बँकेने आतापर्यंत १४ गावांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.आयसीआयसाआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले की, समृद्ध राष्ट्र उभारणी ही केवळ गावांच्या सक्षमीकरणातून येऊ शकते यावर आमचा विश्‍वास आहे. आम्ही महाराष्ट्रातील १४ गावे डिजिटल बनवली असून, डिसेंबर १७ पर्यंत हा आकडा ८५ पर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. राज्यात बँकेने आतापर्यंत १४ गावांमधून ५० हजार लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे. सात गावांमधील स्थानिक को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांचे डिजिटायझेशन करून आणि मायक्रो एटीएमसह ३५ पॉइंट ऑफ सेल बसवून बँकेने हे साध्य केले आहे. यामुळे गावातील लोकांना बँकिंग व पेमेंट व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करणे शक्य झाले आहे. त्यांना आता आधारवर आधारित ई-केवायसी वापरून बँक खाती उघडता येतात, रिटेल दुकानांमध्ये पॉइंट ऑफ सेल मिशन वापरून कॅशलेस व्यवहार करता येतात आणि एसएमएसवर आधारित मोबाइल सोल्यूशन वापरता येतात. तसेच गावकर्‍यांना घरबसल्या ठेवी ठेवता येतात तसेच पैसेही काढता येतात. गावातील डेयरी को-ऑपरेटिव्ह युनिट्सच्या डिजिटायझेशनमुळे सोसायटीला आपल्या सदस्यांना डिजिटली आणि थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे देणेही आता शक्य झाले आहे.
याशिवाय बँकेच्या आयसीआयसाआय फाउंडेशन फॉर इनक्लुसिव्ह ग्रोथ या संस्थेने गावातील लोकांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचीही सोय केली आहे. बँकेने या १४ गावांतील २४०० लोकांना प्रशिक्षित करून शाश्‍वत रोजगार मिळवण्याची संधी दिली आहे. त्यात डेस डिझायनिंग, दुग्धउत्पादन आणि व्हर्मी कंपोस्टिंग, सर्वसमावेशक शेती, शेतकी उपकरणांची दुरुस्ती व सर्व्हिसिंग यांचा समावेश आहे. कित्येक गावकर्‍यांना सातत्यपूर्ण रोजगार मिळवण्यास मदत व्हावी म्हणून सहजपणे कर्जही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तसेच भारतात आयसीआयसीआय अकॅडमी फॉर स्किल्सची २३ केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यातील महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच चार केंद्रे असून, ती पुणे, मुंबई, नागपूर आणि नरसोबावाडी येथे आहेत. या केंद्रांमार्फत राज्यातील १३,३०० वंचित तरुण तरुणींना व्यावसायिक प्रशिक्षण दिले गेले आहे.  इतर राज्यांच्या तुलनेत या उपक्रमाद्वारे लाभ झालेल्या तरुणांची संख्या ही सर्वाधिक आहे.
या केंद्रांमध्ये ऑफिस प्रशासन, विक्रीसाठी आवश्यक कौशल्ये, पंप आणि मोटर रिपेयर, इलेक्ट्रिकल आणि घरघुती उपकरणांची दुरुस्ती व रेफ्रिजरेशन आणि एसी दुरुस्ती इत्यादी अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच या संस्थेने मार्च २०१८ पर्यंत महाराष्ट्रातील ५१०० तरुणांना प्रशिक्षित करण्याचे ध्येय ठेवले आहे. (वृत्तसंस्था)