खडसे पुन्हा विधानसभेत कडाडले

0
90

मुंबई, ४ ऑगस्ट 
एमआयडीसीच्या जमिनीसंदर्भात सन १९९५ च्या संदर्भातील परिपत्रक मेले की जिवंत, ते सांगा म्हणून गेल्या अधिवेशनापासून मागणी करतोय्. अशी काय मजबुरी आहे की माहिती देण्याऐवजी सरकार माहिती लपवत आहे, अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले.
एकनाथ खडसे म्हणाले, गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारलेली माहिती या अधिवेशनात मिळणार आहे का? अर्थसंकल्पीय अधिवेशनात माहिती मागितली, परंतु ती मिळाली नाही. यंदाच्या अधिवेशनात तरी ही माहिती मिळणार आहे का? शासन परिपत्रके मृत झाली की रद्द झाली, हे जाणून घेण्याचा माझा हक्क आहे.
एमआयडीसीसाठी राज्यातील शेतकर्‍यांच्या घेतलेल्या हजारो एकर जमिनी घेतल्या आहेत. त्यापैकी किती जमिनी परत दिल्या आहेत, याची माहिती मी मागवली आहे. मला सहा सहा महिने कागदपत्रे मिळत नाहीत.
एक वर्ष झाले शासन माहिती का लपवत आहे? माहिती का दडवली जात आहे? काय त्यात गुपित आहे? ही माहिती सरकार जाणीवपूर्वक लपवत आहे, असा माझा आरोप आहे.
एकनाथ खडसेंची बाजू घेत राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार म्हणाले, एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी केलेले काम सगळ्या राज्याने पाहिले आहे.
सत्ताधारी पक्षाचे आमदार माहिती मागते आहेत. तरीही त्यांना ती माहिती दिली जात नाही. आम्हीही ती माहिती मागत आहोत, आम्हालाही माहिती दिली जात नाही. असे जर जाणीवपूर्वक केले जात असेल तर, आम्ही हक्कभंग आणू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अखेर तालिकाध्यक्ष योगेश सागर यांनी आधिवेशन संपण्यापूर्वी माहिती सभागृहात देण्याचे आदेश सरकारला दिले. (तभा वृत्तसेवा)