इम्तियाज शाहरुखला ‘शरण’ ढेपाळलेला ‘जब हॅरी मेट सेजल’

0
136

बॉलीवूड सध्या एका मोठ्या हिटच्या प्रतीक्षेत आहे आणि शाहरुख-अनुष्कासारखी स्टारकास्ट असलेला ‘जब हॅरी मेट सेजल’ मुळे साहजिकच अपेक्षा वाढल्या होत्या. पण, मैत्रीदिनाचे औचित्य साधून या शुक्रवारी प्रदर्शित झालेला हा चित्रपट फुसका बार ठरला आहे. त्याच्या ट्रेलरवरूनही पूर्ण कथानक लक्षात येण्याइतकी वाईट स्थिती आहे. करियरच्या या टप्प्यावर शाहरुख आणि अनुष्काने ‘असा’ चित्रपट करावा, हे वाईट आहे. मुळात शाहरुख खान चित्रपटातील भूमिकेच्या वयापेक्षा खूप मोठा दिसतो. केवळ इम्तियाज अलीसाठी त्याने ही भूमिका केली असेल तर ही प्रेक्षकांसाठीच शिक्षा आहे. गुंतागुंतीच्या प्रेमकथा ही इम्तियाज अलीची विशेषता असली तरी प्रेक्षक वर्षातून तीन वेळा तेच ते कथानक वेगळ्या कलाकारांसोबत बघू शकत नाहीत.
अतिशय ‘प्रेडिक्टेबल’ असलेल्या या चित्रपटात आपल्या कुटुंबासोबत युरोपमध्ये फिरायला आलेल्या सेजल (अनुष्का शर्मा) या गुजराती मुलीची साखरपुड्याची अंगठी हरवते. अंगठी सापडेपर्यंत भारतात परतणार नसल्याचा निर्णय सेजल घेते. या कामात हरिंदर सिंग ऊर्फ हॅरी हा टुरिस्ट गाईड तिला मदत करतो. मूळचा पंजाबी हॅरी मनातून दु:खी आहे आणि वरवर आनंदी दिसणार्‍या सेजलला स्वत:चाच शोध घ्यायचा आहे. अंगठी शोधत बुडापेस्ट, प्राग, बर्लिन, लिस्बेन आणि व्हिएन्ना असे देशविदेशात फिरणारे हॅरी आणि सेजल एकमेकांच्या प्रेमात पडतात. आपल्याला झोप येत असली तरी हे देश आणि ठिकाणे बघण्यासारखी असल्याने पडद्यावरून नजर हटत नाही. ‘जीवन बदलणारी आणखी एक युरोप टूर’ असेच म्हणावे लागेल. त्यात चित्रपटात ढीगभर गाणी आहेत आणि त्यामुळे प्रेक्षक कनेक्ट होऊ शकत नाहीत. या चित्रपटामुळे शाहरुख, अनुष्का आणि इम्तियाजच्या करियरमध्ये एक वाईट्ट चित्रपट जोडल्या गेला आहे. असा रद्दी चित्रपट बनवला नसता तरी बॉलीवूडला काहीच फरक पडला नसता.
शाहरुखच्या रोमॅण्टिक हिरोच्या इमेजच्या प्रेमात पडून इम्तियाज अलीने चित्रपट नाही तर शाहरुख‘पट’ बनवला आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. राखीपौर्णिमा आणि शनिवार-रविवार अशी लागून सुटी आली असतानाही हा चित्रपट फार गती पकडेल, असे वाटत नाही. मुळात शुक्रवारी प्रदर्शनाच्या दिवशीच चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे, हे विशेष !
रेवती जोशी-अंधारे