धावपटू दुतीचंद विश्‍व ऍथलेटिक्स स्पर्धेतून बाहेर

0
14

लंडन, ५ ऑगस्ट
जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने आपल्या अभियानाची निराशाजनक सुरुवात केली. महिला धावपटू दुतीचंद आणि रिले धावपटू मोहम्मद अनस याह्या प्रथम सत्रातच स्पर्धेबाहेर पडले. शनिवारी दुसर्‍या दिवशी सात स्पर्धांच्या हेप्टाथलनमध्ये स्वप्ना बर्मनची कामगिरीही निराशाजनक राहिली.
पात्रता गाठण्याइतके गुण मिळाले नसूनही कोट्यातून स्पर्धेत प्रवेश करणारी दुतीचंद महिलांच्या १०० मीटर स्पर्धेच्या पहिल्या सत्रातील पाचव्या हीटमध्ये सहाव्या स्थानावर राहिली. हे अंतर पार करायला तिला १२.०७ सेकंद लागले. यापूर्वीच्या आपल्या सर्वश्रेष्ठ कामगिरीचीही (११.३० सेकंद) पुनरावृत्तीही ती करू शकली नाही. हलकासा पाऊस आल्यामुळे ट्रॅक दमट झाला होता आणि तापमानही २० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. ४८ धावपटूंमधून तिचा ३८ वा क्रमांक होता. सहाव्या लेनमधून धावणारी दुती म्हणाली, चुकीची सुरुवात केल्यामुळे पाचव्या लेनमधील जर्मन धावपटू ततजाना पिंटोला अपात्र घोषित केल्यामुळे मी घाबरले होते. त्यामुळे मी अपेक्षित वेगात धावू शकले नाही. तसेच तापमानही थंड होते. मी भारतात वेगाने धावू शकले कारण तापमान उष्ण होते. दुतीने ११.२६ सेकंदचे पात्रता गुण मिळविले नव्हते. मात्र, कोट्यामार्फत ती जागतिक स्पर्धेत स्थान मिळविण्यात यशस्वी राहिली.