व्हॉसॉंग १४ – नवा अग्निबाण

0
628

विश्‍वसंचार
गेल्या महिन्यात म्हणजे ४ जुलै, २०१७ रोजी उत्तर कोरियाने आपल्या व्हॉसॉंग-१४ या नव्या अग्निबाणाची किंवा प्रक्षेपणास्त्राची चाचणी केली. डागलं गेल्यावर हे प्रक्षेपणास्त्र २,८०० किमी उंचीवर पोहोचलं. मग आडव्या रेषेत त्याने पूर्वेकडे ९३० किमी प्रवास केला आणि ते पॅसिफिक महासागरात कोसळलं. ही सर्व प्रक्रिया फक्त ३७ मिनिटांत घडली.
२०१७ च्या जानेवारी महिन्यात उत्तर कोरियाने जाहीर केलं होतं की, आमचे वैज्ञानिक आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्र विकसित करण्याच्या अंतिमटप्प्यावर आहेत. त्यावेळी अमेरिकेचे नयेनवेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दाव्याची खिल्ली उडवली होती. जणू काही त्याचं प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने ४ जुलै हाच दिवस चाचणीसाठी निवडला असावा. कारण तो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन असतो.
अमेरिकेत मॅसेच्युसेटस् राज्यात केंब्रिज या ठिकाणी युनियन ऑफ कन्सर्न्ड सायन्टिस्ट्‌स नावाची एक संस्था आहे. जगभरच्या वैज्ञानिक संशोधनावर ती लक्ष ठेवून असते. या यूसीएसचा एक तज्ज्ञ डेव्हिड राईट म्हणतो, २८०० किमी उंच उडून मग आडव्या रेषेत प्रवास करण्याऐवजी हे प्रक्षेपणास्त्र अगोदरच आडवं झालं असतं, तर त्याने उत्तर कोरियापासून ६७००० किमीचं अंतर गाठलं असतं. याचा अर्थ उत्तर कोरियाच्या किनार्‌यावरून पॅसिफिक महासागर ओलांडून ते अमेरिकेच्या अति वायव्येकडील अलास्का प्रांतावर धडकू शकेल. पण अमेरिकेच्या पश्‍चिमकिनार्‍यावरचा कॅलिफोर्निया प्रांत किँवा पूर्व किनार्‍यावरचा न्यूयॉर्क प्रांत त्याच्यासाठी दूरच आहे.
३८ नॉर्थ नावाची अशीच एक संस्था आहे. तिचा तज्ज्ञ जॉन शीलिंग म्हणतो, ही चाचणी म्हणजे, १५ एप्रिल, २०१७ रोजी उत्तर कोरियाने एक प्रकट लष्करी संचलनात ट्रकवरून मिरविलेल्या व्हॉसॉंग १२ या प्रक्षेपणास्त्राची, थोडीशी कमी दर्जाची परीक्षा होती. आता ३८ नॉर्थ या नावाची गंमत पाहा. हे नाव उगीच दिलेलं नाही. दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरच्या काळात सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्या सेना पूर्वेकडचे जपानने व्यापलेले देश मुक्त करीत होत्या. आपापसात संघर्ष होऊ नये म्हणून उभय बाजूंच्या सेनापतींनी निर्णय घेतला की, नकाशावर ३८ अक्षांश उत्तर या ठिकाणी उभय सेना थांबतील. या निर्णयामुळे कोरिया देशाची फाळणी झाली. उत्तरेकडचा भाग, सोव्हिएत रशियाचं बाहुलं असलेल्या किमजॉंग इल या कोरियन हुकूमशहाच्या ताब्यात गेला. त्याची राजधानी प्योगॉंग झाली, तर दक्षिण भाग अमेरिकाप्रणीत लोकशाही शासनाच्या ताब्यात गेला. त्याची राजधानी सेऊल किंवा सोल झाली. १९५० साली दोन्ही कोरियांमध्ये यादवी युद्धदेखील झालं. तेव्हापासून उत्तर कोरियाच्या सर्व हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेने एक संस्थाच निर्माण केली. तिचं नाव ३८ नॉर्थ. एका छोट्याशा नावात केवढा इतिहास दडलाय पाहा.
अलीकडे लोकांना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी ट्विटर हे एक नवं माध्यममिळालंय. अमिताभ बच्चनपासून डोनाल्ड ट्रम्पपर्यंत अनेक व्हीव्हीआयपीची (व्हेरी व्हेरी इपॉर्टन्ट पर्सन) लोक जगातल्या कोणत्याही घटनेबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत असतात. ४ जुलैच्या उत्तर कोरियन प्रक्षेपणास्त्र चाचणीबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. या प्राण्याला (म्हणजे उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष किमजॉंग उन) दुसरे उद्योग नाहीत काय? मला नाही वाटत दक्षिण कोरिया आणि जपान त्याचे हे चाळे फार काळं खपवून घेतील किंवा खरं म्हणजे चीनच काही तरी जोरदार हालचाल करेल आणि हा विषय कायमचा संपवून टाकेल. म्हणजे, अमेरिकेने आपले मित्र देश दक्षिण कोरिया आणि जर्मनी यांना उत्तर कोरियावर सोडलंच आहे, पण चीननेही त्याच्यावर सुटावं म्हणून उचकवलं आहे. कुणी तरी एखादा महत्त्वाकांक्षी माणूस हर प्रयत्नांनी फार मोठी शक्ती मिळवतो. तिच्या जोरावर तो जगावर राज्य करू पाहतो. सर्वांना तो दे माय धरणी ठाय करून सोडतो. पण काही काळाने त्याला कुणी तरी सव्वाशेर भेटतो आणि जग सुटकेचा श्‍वास टाकतं, अशा नमुन्याच्या कथा जगातल्या सर्व संस्कृतींच्या प्राचीन पुराणांमध्ये आढळतात. यांची अगदी हल्लीची उदाहरणं म्हणजे हिटलरची नाझी राजवट आणि लेनिन, स्टॅलिन, ब्रेझनेव्ह यांची साम्यवादी राजवट.
उत्तर कोरिया हा त्याच साम्यवादी राजवटीचा उर्वरित अंश आहे. अवघ्या एक लाख, २० हजार चौ. किमी क्षेत्रफळाचा (म्हणजे आपल्या तामिळनाडू किंवा छत्तीसगड या राज्यांपेक्षाही कमीच) आणि दोन कोटी, ४८ लक्ष लोकसंख्येचा देश. उंदराच्या कानाएवढा किंवा उंदराच्या दातएवढा देश! पण उंदराचे दात जसे फार तीक्ष्ण असतात, तसा हा उत्तर कोरिया आज त्याच्या आसमंतातल्या दक्षिण कोरिया, जपान तैवान यांना तर वेडावून दाखवतोच आहे, पण या तिघांची पाठिराखी जी अमेरिका तिच्यावर क्षेपणास्त्र डागण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो आहे. चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमा लागूनच आहेत. तशीच छोट्याशा भागापुरती का होईना, रशिया आणि उत्तर कोरियाची सीमाही लागून आहे. रशियात आज साम्यवादी राजवट नाही. उलट चीनमध्ये साम्यवादी राजवट आहे. पण उत्तर कोरियाचा साम्यवादी हुकुमशहा किमजॉंग उन हा चीनलाही जुमानत नाही. उत्तर कोरियाला एवढी मस्ती चढण्याचं कारण तो अण्वस्त्रसज्ज देश आहे. उत्तर कोरियाचा अमेरिकेवर राग असण्याचं कारण तिच्यामुळे दक्षिण कोरियात लोकशाही राजवट स्थिर झाली आहे, अन्यथा व्हिएतनामप्रमाणेच उत्तर आणि दक्षिण अशी फाळणी रद्द करून संपूर्ण कोरिया एक व्हावा आणि तो आपल्या म्हणजे साम्यवादी राजवटीच्या हातात यावा, अशी उत्तर कोरियाची इच्छा होती. पण अमेरिकेमुळे ते जमलं नाही. एवढंच नव्हे, तर अमेरिकेच्या पाठिंब्यावर दक्षिण कोरियाची चांगलीच आर्थिक भरभराट झाली. त्याचे वैज्ञानिकही उत्तमकामगिरी करतायत. हे पाहून साम्यवादी उत्तर कोरियन भागातले नागरिक, लोकशाहीवादी दक्षिण कोरियात स्थलांतर करू पाहतायत. आता असं व्हायला लागलं, तर किम जॉंग उनने राज्य करायचं कोणावर? म्हणून तो तक्षकाय स्वाहा, इंद्राय स्वाहा या न्यायाने दक्षिण कोरिया, जपान, तैवान, अमेरिका आणि चीन या सगळ्यांनाच आपली ताकद दाखवतोय. खबरदार माझ्याकडे पॅसिफिक महासागर ओलांडणारी आंतरखहीय प्रक्षेपणास्त्र आहेत. त्यांच्यावर अण्वस्त्र लावली की, तुमच्या मोठमोठ्या संपन्न शहरांची नुसती वाफ होऊन जाईल. तेव्हा माझ्या भानगडीत पडू नका.
कोरियापासून अमेरिकेच्या पश्‍चिमवा पूर्व किनार्‍यापर्यंत उड्डाण करणारी प्रक्षेपणास्त्र बनविणं हा एक भाग झाला. या प्रक्षेपणास्त्रांवर बसतील अशी छोटी अण्वस्त्रं बनवणं हा दुसरा भाग आहे. आणि अशी अण्वस्त्रयुक्त प्रक्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणातून भ्रमण करीत अचूक लक्ष्यावर पोहोचून मगचं त्यांचा स्फोट होणं, म्हणजे मध्येच कुठे तरी स्फोट न होणं, हा तिसरा भाग आहे. हे सगळेच भाग एकापेक्षा एक नाजूक आहेत. ते सगळे भाग योग्यरित्या विकसित करण्यासाठी उत्तर कोरियन वैज्ञानिक येत्या काळात सतत अशी चाचणी-परीक्षणं करत राहणार हे नक्की आहे. कारण, त्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळविण्यासाठी प्रत्यक्ष परीक्षण हे अत्यावश्यक आहे.
आता, यावर उत्तर काय आहे? ट्रम्प यांनी आपल्या ट्विटरमध्ये चीनला उचकवण्याचा प्रयत्न केलाय. पण चीन आता तरी कोणतीही कारवाई करण्याची शक्यता नाही. मग अमेरिका काय करेल? इराकच्या सद्दामहुसेनने अतिघातक अशी जैवरासायनिक अस्त्रं बनविली आहेत, असा आरोप करीत अमेरिकेने इराकवर प्रत्यक्ष लष्करी हल्ला केला. सद्दामला फासावर लटकावला, पण जैवरासायनिक शस्त्रं-अस्त्रं एक बोटभरदेखील कुठे सापडली नाहीत. अमेरिकन सेना मात्र इराकमध्ये अडकून पडत्येय. गेले दीड दशक चालू असलेला हा भीषण संघर्ष आजही चालूचं आहे. त्याचे अमेरिकेवर झालेले राजकीय, आर्थिक सामाजिक परिणामही भीषणच आहेत. त्यामुळे अमेरिका उत्तर कोरियावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा मूर्खपणा करणार नाही. अमेरिकन संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस म्हणाले की, असं करण्यामुळे हाहाकार होईल आणि अमेरिकन जनतेला अत्यंत वाईट अशा समर प्रसंगाला तोंड द्यावं लागेल.
मग उपाय काय? उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यामध्ये जगातला सर्वात मोठा असा पॅसिफिक महासागर पसरलाय आणि त्यात आज तरी जगातलं सर्वात मोठं आणि सर्वात बलाढ्य असणारं अमेरिकन नौदल सतत कार्यरत आहे. जगातलं कुठलंही आंतरखंडीय क्षेपणास्त्र मध्येच भेदून पाडणारी क्षेपणास्त्रे म्हणजे इंटरसेप्टर मिसाईल्स अमेरिकन नौदलाकडे आहेतच.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज ही जगभरच्या सैनिकी क्षेत्राचा सतत अभ्यास करणारी एक ब्रिटिश संस्था म्हणजे सध्याच्या भाषेत थिंक टँक आहे. या आयआयएसएसचा तज्ज्ञ मायकेल एलमन म्हणतो, सध्या सेवेत असलेली अमेरिकन नौदलाची इंटरसेप्टर मिसाईल्स ही पुरेशी वेगवान नाहीत. उत्तर कोरिया ज्या वेगाने व्हॉसॉंग-१४ विकसित करतो आहे, ते पाहता, हे प्रक्षेपणास्त्र डागलं जात असताना किंवा त्याने उड्डाण करताक्षणी इंटरसेप्टर अस्त्र त्यावर आदळलं पाहिजे, अवकाशात पोहोचल्यावर नव्हे, त्यासाठी अमेरिकन इंटरसेप्टरची कार्यक्षमता आजच्या ५० पट वाढायला हवी आहे.
ट्रम्प सरकारला ही कार्यवाही वेगाने करावीच लागेल, तरच ते ट्रम्प म्हणजे हुकूमाचं पान ठरू शकतील.

मल्हार कृष्ण गोखले