सांग सांग भोलानाथ…

0
63

अग्रलेख

हे गाणे लहानपणी खूप ऐकले आहे. म्हणजे प्रत्येकाच्याच लहानपणी त्याने हे गाणे ऐकले असावे… ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?’ आता हे गाणे आठवण्याचे कारण सध्या पाऊसच पडत नाही अन् येत्या काळात पाऊस पडेल, याची काही शाश्‍वती नाही. म्हणजे हवामानखात्याचा अंदाज आहे… हो, तेच हे हवामानखाते ज्यांचे हवामानाचे अंदाज हमखास चुकत असतात. या पावसाळ्याच्या सुरुवातीला या खात्याने सरासरीइतका पाऊस पडेल. उत्तम पाऊस पडेल, असे सांगितले होते. आता तेच हवामानखाते म्हणत आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत पाऊस अजिबात पडणार नाही. याचा अर्थ आता पाऊस पडणार आहे. कारण हवामानखात्यानेच सांगितले आहे की, पाऊस पडणार नाही, म्हणजे पाऊस पडणार आहे.पण… आता तुम्ही म्हणाल हवामानखात्यावर इतका विश्‍वास आहे तुमचा आणि पुन्हा पण, कशाचा? तर हा विषय आठवण्याचे कारण पाऊस पडत नाही, हा नाहीच. पावसाचे काय असते, तो अनेकांना अनेक संदर्भात हवा असतो. शेतकर्‍यांना शेतीसाठी हवा असतो, शहरात राहणार्‍या नागरिकांना तो धरणे भरण्यासाठी हवा असतो. आता धरणे शेतीसाठी नाही तर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, याच्यासाठी असतो. शेतकर्‍यांचे काय कधी त्यांना कोरडा दुष्काळ असतो अन् कधी ओला… आता पाऊस येत नाहीय् तर कोरडा दुष्काळ असू शकतो अन् मग नाहीतरी शेतात दुष्काळ आलाच आहे तर किमान आता दणक्यात पाऊस पडून थोडीथोडकी पिके गेली तर चालतात पण धरणे भरली पाहिजेत. किमान प्यायला पाणी असेल. खायला अन्न काय केव्हाही अन् कुठूनही आणता येते. गहु अमेरिकेतून, तांदुळ जपानमधून, डाळी मलेशिया, चीनमधून आणता येतात. पाणी नाही आणता येत. ते येतं असतं. बहुदा ते डोळ्यातच येतं अन् डोळ्यांना नळ योजना नसते. त्यामुळे शहरवासियांना पाऊस हवा आहे तो पिण्याच्या पाण्यासाठी. शेतकरी नाहीतरी असेही खड्‌ड्यात जात असतात आणि तसेही जातच असतात. आता प्रेमीकांना पाऊस हवा असतो, पण तो एका छत्रीत अर्धे अर्धे भिजण्यासाठी आणि भिजता भिजता जवळ येण्याची संधी निर्माण होत असते म्हणून… कवींनाही पाऊस हवा असतो. एरवी कुणी कविता ऐकत नाही, मात्र पावसाळ्यात पाऊस दणक्यात येत असला की, ‘गरम भजी आणि चहा काव्य महोत्सव’, घेतला जातो. पाऊस येत असला की दोन-चार फायदे होतात. अनेकजण ऑफिसला अन् त्यांच्या कामाच्या ठिकाणांना दांडी मारतात. मग ही दांडीयात्रा असे काही कार्यक्रम शोधत असते. बरे पाऊस रस्त्यातच जोराने आला की आडोसा हवा असतो. मग असा काही कार्यक्रम असला की ज्यांना कवितेशी काहीही घेणे-देणे नसते, अशीही माणसे सभागृहात शिरतात. कविता ऐकल्याच पाहिजेत असे नसतेच. ती ऐकण्याचे नाटक करत असताना आयती कांदा भजी आणि चहा मिळतो. बरे जे कविता ऐकायला आले असतात (खरे तर आणवले गेले असतात, नाते संबंधांमुळे ज्यांना यावे लागले असते) अशी माणसे कविता बोअर होताहेत, भजी-चहा नको पण कविता आवर, अशी ज्यांनी स्थिती होते, असेही लोक बाहेर पाऊस पडत असल्याने आत अडकून पडले असतात. मग तेही ‘इफ यू डोन्ह अव्हाईड, देन एन्जॉय’ या तत्वावर आतच बसून राहतात. पाऊस आपला बाहेर कोसळत असतो आणि यांच्यावर कविता कोसळत असतात. – तर कविंना पाऊस यासाठी हवा असतो. पाऊस कर्मचार्‍यांनाही हवाच असतो. पाऊस आला अन् भिजलो म्हणत मग व्हायरलची साथही येते. सर्दी, पडसे, ताप, मलेरिया अन् त्याचे डेंग्युपर्यंतचे ऍडव्हान्स व्हर्जन्सही आता आले आहेत. ऑफिसला ऐनवेळी फोन करून नाहीच मलेरिया तर किमान डायरिया झाल्याचेही सांगता येते. ज्याला सांगायचे त्यालाही माहिती असते की आजारपण पोलिटिकल आहे; पण त्यालाही त्याचा कधीमधी आधार घ्यावाच लागत असतो अन् हा नाही, तो नाही म्हणत मग तोही ऑफिसला काही काम न करता बसून राहतो. पाऊस बेटा बाहेर कोसळत राहतो… तसा पाऊस शेतमजुरांनाही हवाच असतो. काय आहे ऐन पावसात फार कामे निघत नाहीत. पाऊस आला की डवरणीची कामे येतात. कामावर गेले की मग पाऊस येतो अन् मग शेतातल्या खोपटात बसून चहा, विड्या अन् जमलेच तर नवटाक मारता येते. झोपडीत जर्मनच्या ‘गिलासात’ देह गरम करणारे द्रव फेसाळत असते आणि बाहेर शेतात पाऊस पडत असतो… पाऊस तसा बिल्डरांना हवा असतो, तरुणांना हवा असतो, तरुणींनाही हवा असतो तसा तो विद्यार्थ्यांनाही हवाच असतो. त्या काळात आजच्या सारख्या पंचतारांकित शाळा नव्हत्या, त्यामुळे शाळेभोवती तळे साचायचे. मग शाळेला सुट्‌टी मिळायची. म्हणून मग हे गाणे आले-सांग, सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?शाळेभोवते तळे साचून सुट्टी मिळेल काय?आता भोलानाथ काय सांगणार पाऊस पडेल की नाही, मात्र याला आज शाळेत जाण्याचा कंटाळा आला आहे, हे मात्र नक्की कळत होते. त्या काळात पक्क्या भिंतींच्या अन् कॉंक्रीटच्या छतांच्या शाळा नव्हत्या. आमची तर झेडपीची शाळा होती. लाकडाच्या फलट्यांच्या भिंती आणि टिणाचे छत होते. टिणाच्या छतावर पाऊस कोसळू लागला की काहीही ऐकू यायचे नाही. गाण्यात म्हणायला ठीक आहे की, ‘बजता है जलतरंग, टिन की छत पे जब मोतोयो जैसा जल बरसे…’ कसचे काय जलतरंग? टिणावर पाऊस पडायला लागला की कान फाटेल असा गोंगाटच होतो. या कवींना ना काहीही सूचत असते. टिणाचे छत होते अन् त्यालाही छिद्र होती. मुलं मग पावसाळ्यात छत्री आणून बेंचवर चढायची आणि छत्रीच्या टोकाने छताच्या टिणाची छिद्र मोठी करायची. त्यामुळे वर्गातच जलधारा बरसू लागायच्या. एकतर टिणांचा आवाज आणि मग वर्गातच पाऊस आलेला. चिखल व्हायचा. शिक्षकांनाही काही बोलता यायचे नाही. आव्वाज कुणाचा? तर पावसाचा, हेच उत्तर असायचे. मुलं आपली कोरड्या बेंचांवर दुबकी मारून बसलेली असायची अन् शिक्षक वर्गाच्या कोरड्या कोपर्‍यात खुर्चीवर बसले असायचे. चपराश्याच्या हातून चहा बोलवायचे, मुलांना ‘‘वाचन करा रेऽऽ’’असा दम भरून एखादी विडी- सिगारेट मारून घ्यायचे. पाऊस बेटा बाहेर कोसळत राहायचा… पावसाळा आला की शाळा कशाला भरते, असा सवाल होताच. खरेतर या दिवसात मुलांना शेतीची कामे असायची. नसली तरीही त्यांना शेतात हुंदडायचे असायचे. उन्हाळ्यात शेतीची कामे नसताना खरेतर शाळा हवी होती. आपली भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. त्यामुळे शेतीची कामे असतात त्या दिवसात शाळा नको होत्या. किमान जुलै- ऑगस्ट या दोन महिन्यात शाळांना सुट्‌ट्या हव्या होत्या. शेतात ऐन मे महिन्यात उन्हं सहन करण्यापेक्षा शाळेच्या छताखाली सावलीत शाळा बरी वाटली असती. भोलानाथाला प्रार्थनाही करावी लागली नसती. मात्र, या इंग्रजांनी पार लोचा करून टाकला ना. त्यांना उन्हं सहन होत नसल्याने त्यांनी शाळा, कोर्ट यांना उन्हाळ्यात व्हॅकेशन दिल्या. खरेतर त्या पावसाळ्यात हव्या होत्या. शेतकर्‍यांना धुर्‍यावरून उद्भवलेल्या भांडणांसाठी ऐन पावसाळ्यात कोर्टात जावे लागते अन् उन्हाळ्यात कामे नसताना घरी बसून रहावे लागते. शेतात कामे करायला मुले हवी असताना ती शाळेत जातात अन् मुलं पावसात शाळेच्या खिडकीतून बघत असताना बाहेर बेटा पाऊस कोसळत राहतो!भोलानाथाने कसेकाय सांगायचे की पाऊस पडेल की नाही? तळे साचेल की नाही? आजकाल तळी साचतील, तलाव भरतील अन् पिकं येतील तरारून असा पाऊसच येत नाही ना…