अब तेरा क्या होगा लालू…

0
17

वाचकपत्रे
‘‘जबतक समोसे मे रहेगा आलू, तब तक बिहार में रहेगा लालू!’’- राजद समर्थक हा नारा जोरकसपणे देत होते. पण, आता परिस्थिती एकदम विपरीत झाली. बिहारमधून लालूंचा सफाया होतोे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुत्रप्रेमापोटी लालूंनी मुलाला म्हणजे तेजस्वीला राजकारणात स्थिर करण्याच्या उद्देशाने त्याला उपमुख्यमंत्री बनवले व बघता बघता त्याने अमाप माया जमवली. नितीश कुमार यांना भ्रष्टाचाराविषयी अत्यंत राग असणारे नेते म्हणून ओळखले जातात. लालूपुत्राचा प्रताप पाहून त्यांनी राजदशी फारकत घेतली व भाजपाशी हातमिळवणी केली. कॉंग्रेसचेही बारा वाजले. लालू हे बिहारमध्ये एकटे पडले. आता ते आयकर आणि ईडीचा कसा सामना करतात, ते पाहायचे.
मनोज वैद्य
८२०८०१७१९०

महिला क्रिकेट संघाला
प्रोत्साहन देण्याची गरज…
नुकत्याच इंग्लंडच्या लॉर्डस् मैदानावर महिला क्रिकेट विश्‍वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघाशी, भारतीय महिला क्रिकेट संघाने चिवट झुंज देऊनही, अवघ्या ९ धावांनी इंग्लंडच्या संघाचा विजय झाला आणि भारतीय संघाचे विश्‍वचषक जिंकायचे स्वप्न भंगले. या निसटत्या पराभवाने क्रिकेटरसिकांनी हळहळ व्यक्त केली असली, तरी अनेक वर्षांनी महिला क्रिकेट संघाने विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मारलेली धडक नक्कीच प्रशंसनीय आहे. संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान मोदींनीही महिला संघाचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेनंतर महिला संघाकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन बदलला आहे. घराघरात महिला क्रिकेट संघ पोचला आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुढच्या काळात महिला क्रिकेट खेळाडूंना अधिक प्रोत्साहन व अधिक प्रशिक्षणाची सुविधा देण्याची अत्यंत गरज आहे.
प्रा. मधुकर चुटे
९४२०५६६४०४
 
राज्यसभेतही आता भाजपा नंबर वन
राज्यसभेत आतापर्यंत कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. पण, भाजपाने त्यावर मात करून सर्वात मोठा पक्ष होण्याची नोंद केली आहे. सध्या कॉंग्रेससमर्थक पक्षांची बेरीज केल्यास राज्यसभेत भाजपाला पूर्ण बहुतम नाही. ते पुढील वर्षी जेव्हा होईल, तेव्हा सर्व महत्त्वाचे निर्णय घेणे सुलभ होईल. तरी सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी मोदींची जादूच कारणीभूत आहे. मोदींनी कार्यभार स्विकारल्यानंतर ज्या अनेक राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यापैकी बहुतेक राज्ये भाजपाने जिंकली. परिणामी आमदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली. हेच आमदार राज्यसभा निवडणुकीत मतदान करतात. आता नितीशकुमार यांचा पक्षही भाजपासोबत आला आहे. तेव्हा हळूहळू एनडीएला राज्यसभेतही बहुमत मिळेल, याबद्दल खात्री वाटते.
विकास देशपांडे
नागपूर

राहुलच्या कारवर दगडफेक
हा प्रकार योग्य नाही
परवा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुजरातमधील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी गेले असता, काही जणांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. हा प्रकार लोकशाहीत निंदनीयच म्हटला पाहिजे. आधीच कॉंग्रेसची पत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यात असे प्रकार करून त्यांचे महत्त्व वाढविण्याची गरज काय? हे एकवेळ समजू शकते की, गुजरातमध्ये पूर आला असताना, त्या भागातील कॉंग्रेस आमदारांना राज्यसभा निवडणुकीसाठी बेंगलुरूला नेले असेल, याची चीड जनतेच्या मनात असेल. पण, त्याचा राग राहुल गांधींच्या कारवर दगडफेक करून काढणे, याचे समर्थन कुणीही करणार नाही. यात काही भाजपाचेही लोक होते असे म्हणतात. असे असेल तर श्रेष्ठींनी त्यांना कानपिचक्या दिल्या पाहिजेत.
प्रकाश पाटील
नागपूर

उत्तरप्रदेशातही सपा, बसपाला गळती
गुजरातमधील कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. आता उत्तरप्रदेशातही समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाचे आमदारही पक्षाचा त्याग करून भाजपात येत आहेत. यापूर्वी बसपाचा एक आणि सपाच्या दोन आमदारांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. परवा सपाच्या आणखी एका महिला आमदाराने विधानपरिषदेचा राजीनामा देऊन भाजपाची वाट धरली आहे. सपाचे सदस्य बुक्कल नवाब यांनी तर मोदी आणि योगी आदित्यनाथ हे राज्यात अतिशय चांगले काम करीत असल्याची पावतीच दिली आहे. त्यांनी राममंदिरासाठी दहा लाखांची देणगी देण्याचीही घोषणा केली आहे. राजकीय वार्‍यांचा प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे, याची स्पष्ट कल्पना या घडामोडींवरून दिसून येते.
विलास रामटेके
गोंदिया