संघाचे स्वप्न

0
55

वेध
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या भारतीय गणराज्याच्या तीन सर्वोच्च पदावर भाजपाच्या व्यक्ती पदासीन झाल्यानंतर, राजकीय पंडितांचे विश्‍लेषण सुरू झाले आहे. स्वत:ला वैचारिक प्रवाहाचा अग्रदूत मानणार्‍या वृत्तपत्राने, ‘संघाचे ९२ वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले’ अशा शीर्षकाचा लेखही प्रकाशित केला आहे. त्यांच्या मते या तीनही सर्वोच्च पदावर स्वयंसेवक आरूढ व्हावे हे संघाचे स्वप्न होते. खरेच का असे संघाचे स्वप्न होते? जर ते खरे मानले तर, ते पूर्ण होण्यास संघाला ९२ वर्षे लागावीत! इतके सुस्त व संथ कार्य संघाचे असावे! केजरीवाल जर दोन वर्षांत मुख्यमंत्री होऊ शकतो, तर संघाला इतकी वर्षे लागायलाच नको. मुळात संघाचे असे काही स्वप्नच नाही. आम्ही संघाची इतकी पुस्तके वाचलीत, बौद्धिके ऐकलीत, अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांशी अनौपचारिक चर्चा केली, पण केव्हाही संघाचे हे स्वप्न असल्याचे जाणवलेही नाही. संघाचे स्वप्न आहेच; नसून कसे चालले? पण ते फार म्हणजे फारच व्यापक आहे. या स्वप्नाची व्यापकता अल्पदृष्टी राजकीय पंडितांना येत नसेल, तर त्यात संघाचा दोष नाही. या लोकांना ते सांगूनही काही फायदा नाही. विहिरीतल्या बेडकाला, समुद्राच्या विशालतेची, अथांगतेची कल्पना कशी येणार? तुम्ही कितीही वर्णन करून सांगितले तरी, या बेडकांची विशालतेची आणि अथांगतेची कल्पना विहिरीच्या पलीकडे जाणारच नाही ना! सार्वजनिक जीवनात कार्य करायचे, तर ते राजकीय पदप्राप्तीसाठीच करायचे असते, अशी यांची धारणा असते. त्यामुळे संघ देखील, कितीही लपविण्याचा प्रयत्न करीत असला तरी, याच स्वप्नासाठी कार्य करीत आहे, हे यांच्या मनात ठसले आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देश नाही, तर विश्‍वगुरुपदी भारताने पुन्हा आरूढ व्हावे, असे संघाला वाटते. यासाठी तो स्थापन झाला आणि आजतागायत अव्याहत कार्यरत आहे. देशाच्या तीनही सर्वोच्च स्थानी स्वयंसेवक आरूढ होणे, ही त्यातली एक पायरी असू शकते; ध्येय नाही. संघाचे स्वयंसेवक हे जाणून आहेत. त्यामुळे या यशाने अभिभूत होणे वगैरे प्रकार संघात होणारच नाही. मनाला दिलासा देणारी ही घटना आहे, इतकेच. संघाचा हा स्वभाव असल्यामुळेच संघेतरांना संघ अगम्य वाटतो. त्यांना कळतच नाही, संघ नावाचे रसायन नेमके काय आहे! आणि मग हे लोक त्यांच्या मनातील एखाद्या सांस्कृतिक संघटनेच्या मोजपट्‌ट्या संघाला लावून, त्याचे मूल्यमापन करीत बसतात. आताही तसेच झाले आणि यापुढेही तसेच होणार.

निर्दयी घाव
गुजरातमधील कॉंग्रेसचे आमदार बलवंतसिंह राजपूत आणि तेजश्रीबेन पटेल यांनी कॉंग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला. एवढेच नाही तर, राजपूत हे राज्यसभेसाठी भाजपाचे उमेदवार म्हणून उभे राहिले, ही घडामोड अहमद पटेलांच्यासाठी फार मोठा धक्का आहे. राजपूत यांचे संपूर्ण राजकीय साम्राज्य, तसेच खेड्यातील एक किराणा दुकानदार ते खाद्यतेल सम्राटपर्यंतचा त्यांचा प्रवास, अहमद पटेलांच्याच कृपेने झालेला आहे. राजपूत यांच्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये अहमद पटेल यांचे भव्य छायाचित्र प्रकर्षाने लावलेले असते. राज्यसभेसाठीच्या या निवडणुकीत अहमद पटेल यांच्या प्रचाराची धुरा बहुतांशी राजपूत यांच्याच खांद्यावर असती. परंतु, २२ जुलै रोजी दिल्लीत अहमद पटेलांशी चर्चा करून अहमदाबादेला परतलेल्या बलवंतसिंह राजपूत यांचा दूरध्वनी ७२ तास बंद होता, म्हणतात. त्यानंतर झाला तो एक धमाकेदार स्फोट! अहमद पटेल यांच्याविरुद्ध राजपूत हे भाजपाचे उमेदवार म्हणून घोषित झाले. कॉंग्रेस पक्षात अहमद पटेल हे विरोधकांची धुळधाण करणारे डावपेच आखण्यात वस्ताद समजले जातात. आता त्याच पटेलांना धोबीपछाड बसली आणि तीही त्यांच्या अत्यंत विश्‍वासू सहकार्‍याकडून! तेजश्रीबेन पटेल यांची कहाणी तर अजूनच गंमतीदार आहे. राज्यसभेसाठीच्या निवडणुकीसाठी अहमद पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून तेजश्रीबेन यांची स्वाक्षरी आहे. त्यांनीच आता अहमद पटेलांना वार्‍यावर सोडले आहे. अहमद पटेलांचे गुजरात हे गृहराज्य आहे. तिथे आपल्या पश्‍चात काय घडत आहे, याची सुतराम कल्पनाही त्यांना नसावी, यावरून अहमदांच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह लागू शकते. ज्यांना आपल्या अत्यंत विश्‍वासू सहकार्‍यांच्या मनात काय चालले आहे, तेही कळत नाही, ते अहमद पटेल सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आहेत म्हणे! बिच्चार्‍या सोनिया गांधी! दुसरे म्हणजे, तेजश्रीबेन या, पाटीदार समाजाचा अतिचर्चित नेता हार्दिक पटेलच्या मुख्य आधारस्तंभ होत्या. हार्दिक पटेलने त्याच्या आंदोलनाची सुरवातच मुळी तेजश्रीबेन यांच्या घरातून केली होती. आता भाजपाच्या अमित शाहांनी कॉंग्रेसच्या मर्मस्थानावर किती निर्दयी घाव घातला आहे, हे लक्षात येईल. येत्या डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक आहे. त्याचा काय निकाल लागणार, हे आताच स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस पक्षाने फुगविलेला हार्दिक पटेलचा फुगा फुटला आहे. गुजरातच्या शक्तिशाली खाद्यतेल लॉबीचे प्रमुख बलवंतसिंह राजपूत भाजपाचे राज्यसभेसाठी उमेदवार आहेत. गुजरातची ही आगामी निवडणूक तर सोडाच, पण लोकसभेची आगामी निवडणूक देखील लोक नरेंद्र मोदींच्या झोळीत आजच टाकत आहेत. खिळखिळी झालेल्या कॉंग्रेस पक्षाला भुईसपाट करण्याचे काम, उत्तरप्रदेशात भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व विजयामुळे फारच सोपे झाले आहे. कॉंग्रेस पक्ष आता जवळपास बुडालेल्या जहाजासारखा झाला आहे. आपले आमदार कॉंग्रेस पक्षाने बंगळुरूत का नेऊन ठेवले आहेत, याचा आता उलगडा झाला असेल.
श्रीनिवास वैद्य
९८८१७१७८३८