वेंकय्या नायडू यांचे अभिनंदन

0
65

अग्रलेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी आपल्या भाषणात एक मुद्दा आवर्जून मांडतात. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नेत्यांचा नाही. कार्यकर्ता हाच आमचा केंद्रबिंदू आहे, तोच पक्षाचा खरा आधार आहे आणि गुणवत्तेनुसार त्याच्याकडे योग्य ती जबाबदारी सोपविली जात असते. आमच्या पक्षात पक्षश्रेष्ठी, हायकमांड वगैरे प्रकार नाही. सर्व निवडी या पक्षीय निवडणुकीतून होतात आणि सामूहिक निर्णय घेतले जातात… त्यांच्या या मताला उजाळा देण्याचे कारण हे की, वेंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतिपदी झालेली निवड. अगदी विद्यार्थीदशेपासून त्यांची समाजसेवेला झालेली सुरुवात, त्यातून मिळत गेलेला वेगवेगळा अनुभव, त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विविध जबाबदार्‍या पूर्ण ताकदीने सांभाळत आज ते उपराष्ट्रपतिपदावर विराजमान झाले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष असा त्यांचा प्रवास वाखाणण्यासारखा आहे. अतिशय उच्चविद्याविभूषित असलेले नायडू यांनी राज्यशास्त्र आणि मुत्सद्देगिरीचा अभ्यास या विषयात पदवी संपादन केली. आतंरराष्ट्रीय कायदा या विषयात त्यांनी एल. एल. बी ही पदवी संपादन केली. विद्यार्थीदशेतच ते अभाविपशी जुळले आणि व्ही. आर. कॉलेजचे ते अध्यक्ष निवडून आले. अतिशय उत्तम वक्ते आणि संघटक म्हणून ते ख्यात पावले. याच काळात नंतर त्यांनी रा. स्व. संघाचे स्वयंसेवक म्हणून स्थानिक पातळीवर अनेक जबाबदार्‍या स्विकारल्या. वर्षभर चाललेल्या जय आंध्र मुव्हमेंटमध्ये त्यांनी सक्रिय भाग घेऊन प्रदीर्घ लढा दिला. १९७४ साली जयप्रकाश नारायण यांनी नारा दिलेल्या भ्रष्टाचारविरोधी छात्र संघर्ष समितीचे संयोजक म्हणून त्यांनी मोठे आंदोलन उभारले. लगोलग आलेल्या आणिबाणीत त्यांनी आंदोलनात भाग घेतल्याने त्यांना अटक झाली आणि त्यांना कारावास भोगावा लागला. अतिशय उत्तम वक्तृत्व असलेले नायडू यांनी शेतकरी आणि मागास समुदायाच्या समस्यांसाठी सातत्याने लढे दिले. याच काळात ते १९७८ साली पहिल्यांदा आंध्र विधानसभेवर निवडून गेले. १९८० साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. १९८३ साली भाजपाच्या तिकीटावर ते पुन्हा विधानसभेवर निर्वाचित झाले. पक्षाचे गटनेते म्हणून त्यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली. आंध्र प्रदेशातील अतिशय लोकप्रिय जननेते म्हणून त्यांनी ख्याती अर्जित केली.  त्यांच्याकडे आंध्रप्रदेश भाजपा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. १९९६ साली त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याची जबाबदारी सोपविण्यात आली. ती २००० पर्यंत सतत कायम होती. १९९८ साली त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना २००४ व २०१० साली कर्नाटकमधून सतत दोनदा राज्यसभेवर घेण्यात आले. वेंकय्या नायडूंचे खास वैशिष्ट्य म्हणजे, दक्षिणेत हिंदी भाषेचा दुस्वास करण्याची परंपरा असताना, त्यांनी हिंदी भाषा आत्मसात केली आणि ते हिंदीत भाषणे देऊ लागले. उत्तर भारतात दक्षिणेतील नेता हिंदीत भाषणे देतो, ही बाब तिथल्या जनतेला खूपच भावली. १९९९ साली पहिल्यांदा केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आल्यानंतर नायडू यांच्याकडे ग्रामविकास हे कॅबिनेट पद सोपविण्यात आले. या कार्यकाळात त्यांनी ग्रामविकासाच्या अनेक नव्या योजना आणल्या आणि त्या कार्यान्वित केल्या. त्यातील प्रमुख म्हणजे प्रधान मंत्री ग्राम सडक योजना. आज या योजनेखाली अनेक गावात रस्ते झाले आहेत. त्याचे श्रेय नायडू यांच्याकडे जाते. २००३ साली त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. या संपूर्ण तीन वर्षांच्या काळात त्यांनी अतिशय चांगले काम केले. देशभर दौरे करून संघटनबांधणीसाठी प्रयत्न केले. २०१४ साली पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर केंद्रात त्यांच्याकडे नगरविकास व सांसदीय कामकाज हे खाते सोपविण्यात आले. याच काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कारभारही सांभाळला. २०१६ मध्ये त्यांना पुन्हा राजस्थानमधून राज्यसभेवर पाठविण्यात आले. अतिशय मितभाषी आणि तळागाळातील जनतेविषयी त्यांच्या मनात असलेली तळमळ कधी लपून राहिली नाही. या समुदायासाठी त्यांनी खूप काही केले. नेल्लोर येथे त्यांनी स्वर्ण भारत ट्रस्ट स्थापन करून तेथे गरीब, अनाथ, मतिमंद, महिला यांच्यासाठी शाळा काढली. त्यांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने राबविले. त्यांना आवश्यक साधने उपलब्ध करून दिली. आज त्यांची सुशिक्षित मुलगी या ट्रस्टची देखभाल करते. अतिशय कुटुंबवत्सल अशी त्यांची ओळख आहे. आपल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ते आपल्या घरी वेळेत वेळ काढून भेट देतात. पत्नी उषा आणि कुटुंबियांनीही त्यांना मोठा आधार दिला. आंध्र प्रदेश भाजपाध्यक्ष, राष्ट्रीय महासचिव, उपाध्यक्ष ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असा प्रवास करणार्‍या या सामान्य कार्यकर्त्याचा आज सन्मान म्हणून त्यांना पक्षाने उपराष्ट्रपतिपद बहाल केले आहे. गडकरी म्हणतात, त्याप्रमाणे पक्षवाढीसाठी खस्ता खाल्लेले सामान्य कार्यकर्ते हेच पक्षाचा खरा आधार कसे आहेत, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वेंकय्या नायडू. आज याच पक्षाचे अतिशय गरिबीतून वर आलेले रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतींच्या आसनावर विराजमान झाले आहेत. इंदूरमधून आठव्यांदा लोकसभेवर निर्वाचित झालेल्या सुमित्राताई महाजन यांना लोकसभेचे सभापतिपद देऊन या महिला कार्यकर्त्याचा पक्षाने यथोचित गौरव केला. आज नितीन गडकरी यांचे उदाहरण द्यायचे झाल्यास, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पक्षबांधणी आणि पक्षाची वाढ करणार्‍या या सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान म्हणून त्यांच्याकडे अतिशय महत्त्वाचे महामार्ग, रस्ते व जहाजबांधणी हे खाते सोपविण्यात आले आहे. एखाद्या मंत्रालयाचे आणि आपल्या जबाबदारीचे सोने कसे करायचे हे सर्व विरोधी नेत्यांनी गडकरींकडून शिकायला हवे. भेदभाव न करणे ही भारतीय जनता पक्षाची पहिली शिकवण आहे, सर्वांना समान न्याय हे भाजपाचे तत्व आहे, असे ते नेहमी सांगतात. म्हणून विरोधकही त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा करताना दिसतात, ते यासाठी. आज अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही भाजपाचे सामान्य कार्यकर्ताच होते. आज वेंकय्या नायडू हे त्यांच्यासारखेच सामान्य कार्यकर्ते उपराष्ट्रपतिपदी निर्वाचित झाले आहेत. त्यांच्याकडे राज्यसभेचे अध्यक्षपद ही जबाबदारी सुद्धा आहे. राज्यसभेत विविध क्षेत्रातून आलेले अनुभवी व तज्ञ सदस्य असतात. त्यामुळे हे वरिष्ठ सभागृह म्हणून गणले जाते. नायडू यांना संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. सोबतच देशातील राजकारणाचाही त्यांचा दांडगा अभ्यास आहे. निर्वाचित झाल्यानंतर नायडू म्हणालेही, ‘आता मी कोणत्याच पक्षात नाही.’ त्यांचे हे उद्गार राज्यसभा चालविताना समान न्याय देणारे ठरेल यात शंका नाही.