‘कोट्यधीश राजा’ होणार होता कर्जबाजारी

0
106

मुंबई, ६ ऑगस्ट 
लालबागच्या राजाची ओळख मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून होते. दरवर्षी १५ ते १६ कोटी रुपयांची देणगी गोळा होणार्‍या या मंडळाला ५ कोटी ८० लाखांचे कर्ज हवे होते आणि ते देखील भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतीतील जागा खरेदी करण्यासाठी, पण धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मंडळाला याबाबत परवानगी देण्यास नकार दिला आहे.
लालबागचा राजा ज्याठिकाणी विराजमान होतो, त्याच ठिकाणी लागून असलेल्या विजया रेसिडेन्सीमधील दुसर्‍या मजल्यावरील सुमारे १८०० चौरस फुट जागा खरेदी करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला होता. मंडळाने ७ कोटी ३१ लाख रुपये एकूण किंमत असलेली ही जागा खरेदी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून ५ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज काढण्याचे ठरवले. चार वर्षात दीड कोटींप्रमाणे कर्ज फेडण्याचीही हमी यावेळी मंडळाकडून देण्यात आली. त्यानुसार सप्टेंबर २०१६ मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे परवानगीसाठी अर्जही करण्यात आला. परंतु ज्या इमारतीमधील जागा मंडळ खरेदी करणार होते त्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रच नसल्याचे समोर आले. त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये धर्मादाय आयुक्तांंनी मंडळाला कर्ज घेण्याची परवानगी नाकारली.
देणगीच्या रूपाने दरवर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे सरासरी १५ कोटी रुपये जमा होत असताना मंडळावर कर्ज काढण्याची गरज का पडली आणि जागा खरेदीसाठी भोगवटा प्रमाणपत्र नसलेली इमारतच का निवडण्यात आली, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. याबाबत  गणेशोत्सव मंडळांचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्याशी संवाद साधला असता, मंडळाने कर्ज काढण्याचा निर्णय घेतल्याच्या बातमीला त्यांनी दुजोरा दिला, पण याबाबतीत धर्मादाय आयुक्तांंकडून परवानगी न मिळाल्याने जागा खरेदीच केली नाही. त्यामुळे जे घडलेच नाही, त्याविषयी काहीच बोलू शकत नसल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)