स्वाभिमानीतून सदाभाऊंना काढले

0
43

शेतकर्‍यांविषयीची निष्ठा संशयास्पद असल्याचा आरोप
पुणे, ७ ऑगस्ट 
कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची शेतकर्‍यांविषयी असलेली निष्ठा संशयास्पद आहे, असा स्पष्ट आरोप करीत त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आज सोमवारी हकालपट्टी करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी पुण्यात आयोजित पत्रपरिषदेत ही घोषणा केली. सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपदावर असताना कधीच शेतकर्‍यांच्या बाजूने भूमिका मांडली नाही. गेल्या महिन्यात चौकशी समितीसमोर अत्यंत तांत्रिक उत्तरे त्यांनी दिली. या सर्व बाबींचा अभ्यास करीत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सावंत यांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपप्रणीत रालोआत सहभागी झाल्यानंतर पक्षाच्या कोट्यातून खोत यांना मंत्रिपद
मिळाले होते. मात्र, सरकारमध्ये गेल्यानंतर ते संघटनेपासून दूर गेले. त्यातच संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते. कर्जमुक्तीसाठी राज्यातील शेतकर्‍यांनी काढलेल्या मोर्चाच्या काळात खोत यांनी सरकारला अनुकूल भूमिका घेतल्याने मतभेद अधिकच तीव्र झाले. तेव्हापासून खोत यांच्या हकालपट्टीची चर्चा होती. मात्र, राजू शेट्टी यांनी कोणताही निर्णय न घेता चार सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली. खोत यांनी या चौकशी समितीपुढे आपली भूमिका सादर केली. त्यानंतरही ते संघटनेपासून अंतर राखून होते. परिणामी त्यांना संघटनेतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
सत्तेला चिटकून राहण्याची त्यांची धडपड समितीच्या बैठकीतील उत्तरांमधून दिसून आली. सदाभाऊंनीच पुणतांब्यातील शेतकार्‍यांचे आंदोलन फोडले होते. स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी देशभरातील संघटना एकत्र आल्या. मात्र, हा केंद्राच्या अखत्यारीतील विषय असल्याचे सांगत खोत आलिप्त राहिले, असा ठपकाही ठेवण्यात आला.
खोत यांच्यावर सातत्याने होणार्‍या आरोपांमुळे संघटनेची बदनामी होत आहे, असा दावा दशरथ सावंत यांनी केला. खोत यांनी आता तत्काळ मंत्रिमंडळातील जागा रिकामी करावी, अशी सूचनाही त्यांना करण्यात आली.
सरकारमध्ये राहायचे की नाही
भाजपा-शिवसेना युतीच्या या सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राहायचे की नाही, याबाबतचा निर्णय येत्या आठ दिवसांत घेतला जाईल, असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्याच प्रतिक्रिया नाही : खोत
दरम्यान, संघटनेने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देण्यास खोत यांनी नकार दिला. सध्या तरी मी काहीही भाष्य करण्याच्या स्थितीत नाही. योग्य वेळी मी आपली भूमिका मांडणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.