१४ वर्षांखालील गोविंदांना मज्जाव

0
55

– मानवी मनोर्‍यांच्या उंचीवर निर्बंध नाही
– मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
मुंबई, ७ ऑगस्ट  
जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव अवघ्या एका आठवड्यावर असताना, मुंबई उच्च न्यायालयाने आज सोमवारी राज्यातील दहीहंडी मंडळांना मोठा दिलासा दिला. १४ वर्षांखालील गोविंदा दहीहंडी उत्सवात सहभागी होणार नाही, ही राज्य सरकारची भूमिका मान्य करतानाच न्यायालयाने दहीहंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणार्‍या मानवी मनोर्‍यांच्या उंचीवर कुठलेही निर्बंध राहणार नाही, असा महत्त्वाचा निकाल दिला.
दहीहंडी उत्सवात १४ वर्षांखालील गोविंदांना सहभागी करण्यात येणार नाही, अशा आशयाचे शपथपत्र राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे सोपविल्यानंतर न्या. भूषण गवई आणि न्या. एम. एस. कार्णिक यांच्या खंडपीठाने सरकारची शपथपत्रातील भूमिका मान्य केली.
दहीहंडीचा उत्सव राज्यभरात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो. या उत्सवात सहभागी होण्याकरिता वयाची मर्यादा किती असावी आणि मानवी मनोरे किती उंच असावे, यावर आमचे न्यायालय कोणतेही निर्बंध लादणार नाही. कारण, हा विषय आमच्या नव्हे, तर राज्य विधिमंडळाच्या अखत्यारीतला आहे. आम्ही राज्य सरकारचे शपथपत्र स्वीकारत आहोत, असे न्या. गवई यांनी आपल्या निकालात स्पष्ट केले.यावेळी राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, सरकारने गेल्या वर्षी दहीहंडी उत्सवाला साहसी क्रीडा प्रकारात समाविष्ट केले असल्यामुळे बाल मजुरी (प्रतिबंध आणि नियामन) कायद्यानुसार या उत्सवात १४ वर्षांखालील मुलांना सहभागी होण्याची परवानगी स्वत: सरकारनेच नाकारली आहे. या प्रकरणावरील सुनावणीच्या सुरुवातीलाच, आधीचे निर्णय विचारात घेतले जाणार नाही, तर नव्याने सुनावणी करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दहीहंडीत आयोजकांना ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करावे लागेल, मद्यपान करणार्‍यांना प्रवेश नाकारण्यात यावा, गोविंदाच्या सुरक्षेच्या साधनांची नोंद केली जाईल आणि हेल्मेट, सुरक्षा बेल्ट, छातीचे सुरक्षा कवच बंधनकारक असतील, अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयाला दिली. (वृत्तसंस्था)