संस्कृतिसंवर्धन

0
27

प्रबोधन
हिंदू वा वैदिक परंपरा या संस्कृतीचे जतन करणार्‍या आहेत. संस्कृतीची नेमकी व्याख्या करायची झाल्यास विस्तारपूर्वक सांगावे लागेल. मुख्यत: संस्कृती ही आचरणातून प्रकट होत असते. मानवाने गरजेपुरते घेणे ही प्रकृती आहे, गरजेपेक्षा जास्त घेणे ही विकृती आहे, तर गरजेपेक्षा कमी घेणे ही संस्कृती आहे. काश्मीरपासून तो कन्याकुमारीपर्यंतच्या हिंदुस्थानातील कुटुंबव्यवस्था ही संस्कृतीचे प्रतीक आहे. मुलाचे जेवण राहिले म्हणून जेवणाकरिता ताटकळणारी आई तसेच पतीच्या आवडीनिवडी स्वत:करिता स्वीकारणारी पत्नी या संस्कृतिरक्षकांमध्येच गणल्या जातात. त्यागातून संस्कृती जोपासली जाते, हे त्याचे सूत्र आहे.
सीतेचे हरण करून आकाशमार्गे रथ हाकणार्‍या रावणाशी, नि:शस्त्र व वृद्ध असलेल्या जटायूने लढाई करून प्राणाचे मोल दिले. कारण अबलेचे संरक्षण करणे ही आपली संस्कृती आहे. आज अनेक दुर्घटना घडत असताना व घडल्यावर अनेक जण मोबाईलवर व्हिडीओ चित्रीकरण करून दूरचित्रवाहिन्यांना पाठविण्यात धन्यता मानतात. जसे आहोत तसे, साधने जवळ असोत वा नसोत, पण कोणत्याही परिस्थितीत समाजाची मदत करायला पाहिजे, या जाणिवा धूसर होत आहेत, याची चिंता वाटते. शक्ती असतानाही शक्तीचा वापर विवेकाने करायचा असतो. त्यामुळेच कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची सन्मानपूर्वक रवानगी करणारे छत्रपती हे संस्कृतिरक्षणाचे पाईक म्हणून आदरणीय आहेत.
कोलकाता पोलिस अकादमीतील एक प्रसंग भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा आहे. एकदा पाकीटमारी या विषयाचे सत्र घेण्याकरिता कोलकातामधील पाकीटमारांच्या म्होरक्याला बोलविण्यात आले. व्यासपीठावर पाकीटमारदादाला आयजी व प्रबोधिनी संचालक यांच्यामधील आसनाची जागा देण्यात आली. त्याने एवढेच सांगितले की, मायबाप मी काहीही केलेले नाही. मला सोडा. सत्र संपताच आयजी व प्रबोधिनी संचालकांच्या लक्षात आले की, त्यांची पाकिटे गहाळ झाली आहेत. पाकीटमारदादाने त्याचे हस्तलाघव कधी दाखविले ते दोन्ही अधिकार्‍यांच्या लक्षात आले नव्हते. पाकीटमारजवळ पाकिटे सापडल्यावर त्यातील रक्कम त्याला बक्षीस देण्यात आली. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकार्‍यांनी त्यावर टाळ्यांचा गजर केला. आयजी दर्जाच्या अधिकार्‍याचे पाकीट मारणारा पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर काय होऊ शकते याची कल्पना आपण करू शकतो, पण पोलिसांनी ‘अतिथी देवो भव:’ या संस्कृतीचे पालन केले. कायद्याचा अर्थ एका टोकावर जाऊन लावायचा की परिस्थितीच्या सापेक्षत्वात लावायचा, हे संस्कृती शिकविते.
हिंदुस्थानचा दुस्वास करीत पाकिस्तानचा जन्म झाला. आजपर्यंत पाकने चार वेळा भारताशी युद्ध केले व सपाटून मार खाल्ला. याउपरही पाकिस्तानसोबत भारताचे वागणे वैदिक संस्कृतीचे पालन करणारे आहे. कुलभूषण जाधव या भारतीय माजी नौदल अधिकार्‍याची हत्या करण्याचा घाट पाकिस्तानने घातला असण्याच्या पार्श्‍वभूमीवर, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काही पाक गरजू नागरिकांना नियमांचा अडसर बाजूला सारत व्हिसा दिला. पाक सैन्याने भारतीय जवानांच्या देहाची विटंबना केली असतानाही भारतीय सैन्यदलाने भारतीय हद्दीत मारल्या गेलेल्या पाक अतिरेकी, सैन्य जवानांचे मृतदेह सन्मानपूर्वक परत केले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच दुजाना नावाच्या अतिरेक्याला भारतीय सैन्याने घेरले. दुजानाजवळ शस्त्रास्त्रे होती. रोजच्या कवायतीमुळे सळसळणारे रक्त, हातात मशीनगन असे असतानाही भारतीय लष्कर अधिकार्‍याने दुजानाला गोळ्या न घालता मोबाईलवरून संपर्क केला व शरण येण्याचे आवाहन केले. दुजाना नावाचा अतिरेकी सांगता झाला की, तो जर शरण आला तर त्याच्या कुटुंबीयांना पाक पुरस्कृत अतिरेकी ठार मारतील! पाक आणि भारतीय सरकारांच्या व्यवहारात नेमका हा सांस्कृतिक फरक उठून दिसतो.
वर्तमान स्थितीत संस्कृती आचरणाचे महत्त्व अधिक महत्त्वाचे ठरते. चीनची दादागिरी सुरू असताना चिनी वस्तूच्या बहिष्काराबाबत आपण कणखर असायला पाहिजे. कणखरपणा येण्याकरिता निग्रहाची सवय पाहिजे. भोगाची आसक्ती वाढली तर निग्रह करणे कठीण ठरते. आय वाढली म्हणून पर्यटनाच्या नावाखाली डोंगर-दर्‍यात जाऊन दारू पिणे, सेल्फी काढताना अपघाती मरण स्वीकारणे, एखाद्या धबधब्याखालील आंघोळीचे फोटो फेसबुकवर शेअर करणे हे तरुण पिढीचे वर्तन ना संस्कृतिसंवर्धक आहे, ना देशप्रेमाला पोषक आहे. भोगाला मर्यादा नाहीत आणि भोगामुळे मानसिक सौख्य मिळत नाही, हे आपल्या संस्कृतीमध्ये ठासून सांगितले आहे. काळाच्या ओघात अनेक बदल होतात, काही बदल स्वीकारावे लागतात, पण आपले वर्तन हे समाज व देशहित यांच्याशी सांगड घालणारे असावे, ही अपेक्षा.
हेमंत पुरुषोत्तम कद्रे
९४२२२१५३४३