चिनी राख्यांचा श्‍वास कोंडला!

0
28

वाचकपत्रे
चिनी राख्यांवर बंदी घालण्याचे हत्यार उपसले तरी कुठूनसा हा माल ठिकठिकाणच्या बाजारपेठेत थोड्या प्रमाणात का असेना आला. पण, यावेळी नागरिकांनी निर्धारच केला असल्याने चिनी राख्यांकडे ग्राहकांनी पाठच फिरविली. त्यामुळे राख्यांची मागणी जशी घटली तसा विक्रीवरदेखील परिणाम झाला. पारतंत्र्यात असताना महात्मा गांधींनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचे अस्त्र उगारले होते. त्यातून भारतीयांनी जात-धर्म बाजूला ठेवून विदेशी वस्त्रांची होळी केली. तसाच राष्ट्रभाव चिनी वस्तूंवरील बंदीमुळे मनामनांत जागा झाला आहे. माता-भगिनींचे या आंदोलनातील योगदान कौतुकास्पद म्हणावे लागेल. चिनी राख्यांचा श्‍वास कोंडण्याचे खरे श्रेय त्यांनाच द्यायला हवे!
रंजिता भानू
अहेरी

व्यापारी जीएसटीचा चुकीचा अर्थ काढताहेत
जीएसटीचे दर सरकारने निश्‍चित करून दिलेले आहेत. त्यामुळे तुरळक वस्तू वगळता प्रत्येक वस्तूच्या खरेदीवर लागणारा वस्तू आणि सेवाकर निश्‍चित झाला आहे. पण, काही व्यापारी शून्य जीएसटी लागू असलेल्या वस्तूंच्या खरेदीवरही जीएसटी लावून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. हा प्रकार अनुचित असून, त्यावर आळा घातला जायला हवा. सरकारने अशा व्यापार्‍यांचे परवाने रद्द करण्याची करावाई केल्यास इतरांना कायमचा धडा मिळेल.
रचना मांगे
जानेफळ

पतंजलीच्या जीन्सची सार्‍यांनाच प्रतीक्षा!
कॉस्मेटिक्स, खाद्यपदार्थ, मिठाया, टूथपेस्ट, आयुर्वेदिक उत्पादने, धान्य, शीतपेये आदी क्षेत्रांवर वर्चस्व जमवल्यानंतर, रामदेवबाबांचा पतंजली उद्योगसमूह जीन्स उत्पादनाच्या क्षेत्रातही उतरणार, हे ऐकून आनंद झाला आणि त्यांच्या धाडसाचे कौतुकही वाटले. ज्या कल्पना इतरांना सुचणे अशक्य आहे, त्या पतंजलीला सुचतात आणि त्याची अंमलबजावणीदेखील तत्परतेने होते. रामदेवबाबांची प्रेरणा आणि कंपनीचे निःस्वार्थ भावनेने कार्य करणारे कार्यकर्ते यांच्याच भरोशावर हे सारे सुरू आहे. कंपनीचे हे नवे उत्पादनदेखील ग्राहक उचलून धरतील, असा विश्‍वास वाटतो. या कंपनीची उत्पादने खरेदी केल्यामुळे मिळणारा नफा देशांतर्गत खेळता राहतो आणि स्वदेशी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगारदेखील मिळतो, ही बाब ध्यानात घेतली जायला हवी. आम्ही सारे मित्र पतंजलीच्या जीन्सची प्रतीक्षा करीत आहोत.
मनोहर बाजपे
मूर्तिजापूर

विजेंदर सिंगची कमाल
भारतीय बॉक्सर विजेंदर सिंगचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेटच्या जेतेपदाच्या चुरशीच्या लढतीत शनिवारी विजेंदरने चीनचा प्रतिस्पर्धी झुल्फिकार मायमायतियालीवर मात करून भारताची शान वाढविली. सीमारेषेवर चीनच्या सुरू असलेल्या कुरापती पाहता हा विजय चीनला एक ठोसा लगावण्यासारखाच आहे. तशाही चिनी बनावटीच्या वस्तू फार काळ टिकत नाही, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्रॉंझ पदक मिळवून देणार्‍या विजेंदर सिंगचा हा व्यावसायिक बॉक्सिंगमधील सलग नववा विजय ठरला आहे. विजेंदर सिंगचे सर्व भारतीयांतर्फे पुन्हा एकदा अभिनंदन.
विजय कुळकर्णी
नागपूर

नागपूरची मेट्रो; स्वप्नपूर्ती जवळच!
सगळ्यांना उत्सुकता लागून असलेली नागपूरची मेट्रो रेल्वे केव्हा सुरू होणार, हा प्रत्येक नागपूरकरांच्या मनातील प्रश्‍न आहे. पण, आता फार काळ प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. मेट्रोच्या टेस्टिंगला सुरुवात झाली असून, त्यानंतर लगेच मेट्रोची ट्रायल घेण्यात येणार आहे. नुकतेच हैदराबादहून मेट्रोचे तीन डबे नागपुरात दाखल झाले आहेत. त्याचे परीक्षण करणे सुरू आहे. रशियावरून आणलेले रूळ आता जवळपास टाकून पूर्ण झाले आहेत. इतर कामांचीसुद्धा युद्धपातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे लवकरच नागपूरकरांचे स्वप्न असलेली मेट्रो धावेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.
आनंद तिवसकर
नागपूर