रेल्वेपुढील आव्हाने…

0
36

वेध
रेल्वेतील अव्यवस्था आणि ढिसाळपणा हे राष्ट्रीय चिंतेचे मोठे कारण ठरत आहे. देशाचा कणा, महत्त्वपूर्ण आधार आणि सशक्त माध्यम म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेक प्रकारच्या सोयीसुविधा असूनही आणि आधुनिक तंत्रज्ञान अवगत करूनही रेल्वे प्रवाशांना अनेक प्रश्‍नांचा सामना करावा लागतो. रेल्वे प्रवासात जी सर्वात महत्त्वाची गोेष्ट मानली जाते ती म्हणजे भोजन. रेल्वेतील भोजनाच्या दर्जावरून नेहमीच चर्चा होत राहिली आहे. भारतीय रेल्वेचे जेवण निकृष्ट आणि बेचव असल्याचे अनुभव प्रवाशांना आले असून, त्या माध्यमातून प्रसारमाध्यमांनीदेखील रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेबाबत टीका केली आहे. ‘कॅग’च्या अहवालातदेखील रेल्वेच्या जेवणाबाबत ताशेरे ओढले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याबाबत गांभीर्याने विचार करतील, असा विश्‍वास प्रवासीवर्गातून व्यक्त होेत आहे. भारतीय रेल्वेला नवा आणि सशक्त भारतनिर्मितीचा आधार मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रेल्वेचा कायापालट झालेला पाहायचे आहे. देशाची जीवनरेखा असलेल्या रेल्वेला जागतिक दर्जाची सेवा म्हणून तयार करण्यासाठी मोदी सातत्याने रेल्वेप्रशासनाला आठवण करून देत आहेत. यासाठी सुरेश प्रभू यांना नवनवीन प्रयोग करून रेल्वेत सुधारणा करण्याचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत. रेल्वेतील बदलाबाबत अनेक नामवंत लोकांना सल्लागार म्हणून नेमले आहे. रेल्वेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ते रेल्वे प्रशासनाशी सतत संवाद साधत आहेत. तरीही रेल्वेतील ढिसाळपणा, संथ गती, असुरक्षितपणा, स्थानकावरील कचर्‍याचे साम्राज्य, निकृष्ट दर्जाचे जेवण, भ्रष्टाचार, तिकिटांचा काळाबाजार, लाचखोरीचे प्रमाण कायम आहे. एकीकडे देश बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना पायाभूत सुविधादेखील उपलब्ध नाहीत. काही वर्षांपासून भारतीय रेल्वेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परकीय गुंतवणूकदारांना रेल्वेत गुंतवणुकीसाठी आकर्षित केले जात आहे. मात्र, या सर्व दीर्घकाळाच्या योजना असून, त्या दिशेने आणखी काही प्रयत्न झालेले दिसून येत नाही. रेल्वे ही सर्वच बाबतीत उणे असताना सुधारण्याच्या कसोटीवर उतरण्यास रेल्वेला अडथळे येत आहेत. रेल्वेला सामान्य जनतेशी जोडणे महत्त्वाचे आहे. रेल्वेला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी सशक्त आणि धोरणी चारित्र्याची गरज आहे. भारतीय रेल्वेला आधुनिक बनवण्याबरोबरच संवेदनशील आणि शिस्त लावणेही महत्त्वाचे बनले आहे.

आवश्यकता जलपुनर्भरणाची
येथील नैसर्गिक स्रोत म्हणजेच भारताची खरी श्रीमंती! भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील भरपूर पाणी, सुपीक जमीन, जंगले आदी नैसर्गिक स्रोतांनी आपला देश व्यापलेला असल्यामुळेच, त्यावर परकीयांनी कायम वाकडी नजर ठेवली. आज आपण स्वतंत्र आहोत; मात्र नैसर्गिक स्रोतांचे जतन आपण ‘आपले’ समजून करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परिणामी, पाण्यासारखे अनेक नैसर्गिक स्रोत कमी होत चालले आहेत. पाण्याचा उपसा बेसुमार वाढला आहे. विविध कारणांनी भूगर्भातील पाणी मोठ्या प्रमाणावर उपसले जात असून, त्याचे पुनर्भरण मात्र होत नाही, अशी स्थिती आहे. वाढत्या शहरीकरणामुळे जलस्रोतांबरोबरच भूगर्भातील पाणीसाठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ३० ते ४० वर्षांपूर्वी तलाव, विहिरी आणि कूपनलिकांच्या माध्यमातून भूगर्भातील पाणी वापरासाठी उपसले जात असे. मात्र, नद्या आणि पावसाच्या पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरणही तातडीने होत असे. आता पाऊस सातत्याने ओढ देत असल्यामुळे पाण्याचे पुनर्भरण व्यवस्थित होत नाही. तसेच पुनर्भरणाच्या वेगापेक्षा उपशाचा वेग कितीतरी पटींनी अधिक आहे. व्यावसायिक बाबींसाठीचा पाणीउपसा फार मोठा आहे. दुसरीकडे, कॉंक्रिटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरण्यास वावच राहिलेला नाही. त्यामुळे भूगर्भातील स्रोत भरणार कसे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. शेतीसाठीही मोठ्या प्रमाणावर पाणीउपसा होत आहे. ज्या भागात कमी पाऊस पडतो, तेथे कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत, हा संकेत आहे. मात्र, अधिक उत्पन्नाच्या अपेक्षेने अशा भागांमध्येही भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा करून नगदी पिके घेतली जात आहेत. हवामानबदलांमुळे पावसाळ्यातील पावसाचे दिवस कमी झाले आहेत. अनेक ठिकाणी एकतर फार मोठी पर्जन्यवृष्टी कमी कालावधीत होते किंवा अजीबात होत नाही. जिथे एकाच वेळी अधिक पाऊस पडतो, तेथे पडलेले पाणी वाहून जाते, तर जेथे नियमित पाऊस पडत असे, तेथे आता अवर्षणाची परिस्थिती असते. देशात आजमितीस ४ हजार अब्ज घनमीटर स्वच्छ पाणी उपलब्ध आहे. ३९५ अब्ज घनमीटर पाणी भूगर्भात उपलब्ध आहे. यातील १९४७ अब्ज घनमीटर पाण्याचे बाष्प होऊन वातावरणात मिसळते. उपलब्ध पाण्यापैकी १०८० अब्ज घनमीटर पाणी घन किंवा वायुरूपात आहे आणि ११२३ अब्ज घनमीटर पाणीच वापरासाठी उपलब्ध आहे. या आकडेवारीवरून आपल्यावर भावी गंभीर जलसंकटाची कल्पना येते. या संकटासाठी अनेक कारणे जबाबदार आहेत. नद्यांचे पाणलोट क्षेत्र मानवी हस्तक्षेपामुळे नष्टतरी झाले आहे किंवा अत्यंत संकुचित झाले आहे. आधीच राज्यांतर्गत आणि राज्याराज्यांमध्ये पाणीप्रश्‍न पेटला असून, हा प्रश्‍न जटिल बनू लागला आहे. त्यामुळे येत्या १० वर्षांत पाणीप्रश्‍न अधिक समस्यांना जन्म देणारा ठरणार आहे. खार्‍या पाण्याला पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे प्रयोग सुरू आहेत. परंतु, ते फार खर्चीक असल्यामुळे ते भारतासारख्या देशाला परवडणारे नाहीत. म्हणून जलव्यवस्थापन करताना सर्वच पातळीवर लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.
अभिजित वर्तक
९४२२९२३२०१