मायवतींविरुद्ध बंडाचे निशाण!

0
83

अग्रलेख
उत्तरप्रदेशच्या मनात काय शिजते, काही कळायला मार्ग नसतो. कधी या प्रदेशातील मंडळी कांशीराम-मायावतींना डोक्यावर घेते, तर कधी मुलायमसिंह-अखिलेशच्या सायकलवर स्वार होते. कधी त्यांना कमळाची साथ बरी वाटते, तर कधी कॉंग्रेसचा पंजा त्यांना प्यारा असतो आणि या सार्‍यांचा उबग आला तर त्रिशंकू विधानसभा निवडून देण्यासही ते मागेपुढे पाहात नाहीत. उत्तरप्रदेशने हे सारे अनुभवले आहे. राजकारणाच्या याच सारिपाटावरून देशाला पंतप्रधान दिले, संरक्षणमंत्री दिले, राष्ट्रपती दिले आणि मायावतींच्या रूपात पहिली दलित महिला मुख्यमंत्रीसुद्धा दिली. चार महिन्यांपूर्वी झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत या राज्यातील जनतेने योगी आदित्यनाथ यांच्या रूपात एका संन्यस्त व्यक्तीला मुख्यमंत्रिपदावर बसविले. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले आणि राज्यातील विरोधी पक्षांना एकापाठोपाठ एक हादरे बसू लागले. समाजवादी पक्षाच्या चार आमदारांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आणि बसपामध्येही अंतर्गत खदखद जाणवू लागली; पण ही खदखद दस्तुरखुद्द बहेनजींविरुद्धच असल्याचे काल १६ दलित, ओबीसी आणि मुस्लिमांच्या गटांच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थानी ठेवून कांशीराम यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली होती. त्या वेळी मायावती दिल्लीत शिकत होत्या. त्यांच्यातील संभाषण आणि संघटनकौशल्य कांशीराम यांनी हेरले आणि त्यांना बसपामध्ये सामील करवून घेतले. पुढे मायावती यांना खासदार म्हणून निवडूनदेखील आणले. कांशीराम आणि मायावती जोडीने राष्ट्रीय राजकारणावरही छाप पाडली. आरक्षणाची लढाई गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेली. आरक्षणाचा बॅकलॉग दूर करण्यासाठी संघर्ष केला आणि राज्याराज्यात पाळेमुळे रुजविली. प्रचंड मोठे मोर्चे आणि निळ्या झेंड्यांनी मैदानही लपून जावे असा बसपाचा थाटमाट होता. एकदा समाजवादी पक्षाच्या सहकार्याने नंतर भाजपाच्या पाठिंब्याने मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. चार वेळा त्यांनी या राज्याचे मुख्यमंत्रिपद पटकावले. खासदारकी मिळवून त्या संसदेतही पोहोचल्या. त्यांचे प्रस्थ देशाच्या राजकारणात इतके वाढले की, त्यांच्याकडे शक्तिशाली दलित नेत्या आणि पंतप्रधानपदाच्या सबळ दावेदार म्हणूनही बघितले जाऊ लागले. मायावतींचा प्रभाव बघून देशातील मागासवर्गीय, दलितांच्या संघटना आणि छोटे-मोठे पक्षदेखील त्यांच्याशी दोस्ती करते झाले. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षांच्या गटातटाला कंटाळलेल्या अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठांनी हत्तीची साथ केली; पण एकीकडे त्यांची वैयक्तिक विकासाची कमान वाढत असताना पक्षाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. स्वतःच्या वाढदिवसाला पक्षकार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा करणे, मोठमोठे केक कापणे, पैशांचे हार गळ्यात घालणे, मोठ्या संख्येत कार्यकर्ते जमविणे ही किमयादेखील त्यांना खासच जमली. उत्तरप्रदेशात त्यांनी सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग करून सत्ता मिळविली. सोबतीला उत्तरप्रदेशातील ब्राह्मण समाजातील नेत्यांना घेतले. त्यांचा हा प्रयोग देशात सर्वत्र गाजला आणि त्याचे गोडवे गायले जाऊ लागले; पण ते सोशल इंजिनीअरिंग नव्हते, तर सत्तेसाठी केलेली तडजोड होती, हे नंतरच्या राजकारणाने सिद्ध केले. मायावतींचा हा प्रयोग नंतरच्या काळात फसला आणि त्यांच्या हातून उत्तरप्रदेशची सत्ता गेली. या दरम्यान देशभरात पोहोचलेल्या बसपाचे उमेदवार ठिकठिकाणी निवडून येऊ लागले; पण सत्ताप्राप्ती हाच एकमेव सिद्धान्त असल्याने, ही मंडळी पक्षात टिकली नाही. उत्तरप्रदेशात तर बहेनजींना मोठे झालेले नेते नकोच होते. त्यांनी एकेक करून जवळच्या सार्‍या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आणि आता गेल्या निवडणुकीत लाखाच्या सभा घेऊनही मायावतींच्या पदरात केवळ १९ जागा पडल्या! मायावतींनी नुकताच राज्यसभेचा राजीनामा दिलेला आहे. राज्यसभेत सत्ताधारी बोलू देत नसल्याचा आरोप करून त्यांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे; पण याचा त्यांना वैयक्तिक अथवा पक्षासाठी कितपत लाभ होईल, हे आजच सांगता येणे शक्य नाही. त्यांनी ही कृती करताना ना कुणाला विश्‍वासात घेतले, ना कुणा ज्येष्ठ नेत्याचा सल्ला घेतला. त्यामुळे पक्षकार्यकर्ते संभ्रमात आहेत, की बहेजनजींनी हे टोकाचे पाऊल का उचलले? त्यांच्या दरार्‍यामुळे त्यांना हा प्रश्‍न कुणी विचारू धजणार नाही; पण पक्षाची आणि एकंदरीत व्यक्तिगत विकासाची चिंता लागल्याने अनेक दलित, मागासवर्गीय आणि मुस्लिम संघटनांनी मायावतींविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले आहे. हे सारे नेते बसपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मायावतींना पक्षाबाहेर काढून बसपाच्या व्होट बँकेवर कब्जा करण्याचा या मंडळींचा होरा आहे. मायवतींनी बाहेरचा रस्ता दाखविलेले नासिरुद्दिन सिद्दिकी यांनी नव्या नॅशनल बहुजन अलायन्सच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला असून, पक्षाचे माजी खासदार प्रमोद कुरील यांना संयोजक म्हणून पुढे करण्यात आले आहे. कुरील यांचातर मायावतींवर इतका राग आहे की, ते म्हणाले, मी बसपामध्येच आहे, पण मला मायवतींना बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. या मंडळींचा भारतीय जनता पक्षात जाण्याचा कल नसला, तरी भाजपाची नेतेमंडळी त्यांच्या संपर्कात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम यांचे नाव घेणार्‍या तसेच मनुवादी म्हणून भारतीय जनता पक्षाला सतत डागण्या देणार्‍या मायवतींनी गेल्या काही दिवसांत प्रचंड संपत्ती गोळा केली आणि पक्षाच्या अनुभवी नेत्यांचे पंख छाटले, हे सर्वविदितच आहे. पण मायवतींचा पूर्वीचा दाबदबा, त्यांच्याभोवतीचे कार्यकर्त्यांचे मोहोळ आता आटले असून, त्या एककल्ली झाल्याचा नेत्यांचा अनुभव आहे. काही नेत्यांनी स्वतःच त्यांच्यापासून स्वतःला दूर केले; पण ही मंडळी मायावतींमुळे पक्षापासून दूर गेली असली, तरी त्यांचा कांशीराम यांच्या विचारांवर विश्‍वास आहे. पक्षापासून दुरावलेले हे नेते आजवर विखुरलेले असल्याने मायावतींविरुद्ध बोलायला कचरत होते. पण, आता परिस्थिती बदलली असून, या नेत्यांनी एकत्र मूठ बांधून बंडाचे निशाण फडकावले आहे. आजच्या परिस्थितीत मायवतींच्या पक्षाचा एकही खासदार लोकसभेत नाही आणि उत्तरप्रदेशातील १९ आमदारांच्या भरोशावर राज्यसभेत जाण्याची त्यांची शक्यतादेखील मावळली आहे. राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे महत्त्वदेखील कमी झाले आहे. कुठे पंतप्रदानपदाची स्वप्नं बघणार्‍या मायावती आणि कुठे सत्ताच्युत झालेल्या मायावती, असा सवाल सध्या विचारला जात आहे. विरोधी पक्षाचे नेते मोदींविरोधात सशक्त नेता शोधत असताना, नितीशुकमार यांची विकेट गेली. ते स्वतःच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाले. दुसर्‍या नेत्या मायवती स्वतः राष्ट्रीय राजकारणातून मागे पडल्या. लालूंनी तर भ्रष्टाचाराची सीमा ओलांडल्याने तेदेखील जायबंदी झाले आहेत. मुलामयसिंहांनी तर सार्‍या आशाच सोडल्या आहेत. आता उरल्या ममता बॅनर्जी. त्यादेखील विभिन्न घोटाळ्यांमध्ये त्यांच्या सहकार्‍यांचे नाव आल्याने बॅकफुटवर आहेत. केंद्रात विरोधकांमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असताना मायवतींना ती भरून काढण्याची संधी होती. पण, सोबतीला ना खासदार, ना आमदार राहिल्याने त्यांच्या हाती निराशेशिवाय काहीच उरलेले नाही आणि आता स्वपक्षातील लोकच त्यांच्याविरोधात उठाव करून उठले आहेत. यात मायवतींचा हत्ती त्यांच्यासोबत राहतो की नवी आघाडी त्यालादेखील उडवून घेेऊन जाते, हे बघायचे आहे…!